सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी सिद्धार्थ पिठानीला अटक

28 May 2021 13:39:25

Sushant_1  H x
 
 
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्याचा मित्र आणि व्यवस्थापक सिद्धार्थ पिठाणीला अटक केली आहे. अमली पदार्थ तस्करीसंदर्भात एनसीबीकडून त्याला हैद्राबादमधून अटक करण्यात आली. यापूर्वीही सिद्धार्थ पिठाणी यांची याची ईडी, एनसीबी व सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अमलीपदार्थ संदर्भात एनसीबीकडून त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.
 
 
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने जून २०२० मध्ये मुंबईतील बांद्रा स्थित घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी याच्या मित्र सिद्धार्थ पिठाणी हादेखील घरामध्ये उपस्थित होता. सुरुवातीपासूनच तो संशयाच्या घेऱ्यामध्ये अडकला होता. ईडीकडून चौकशी केली जात असताना काही व्हाट्सअप चॅट हे अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात मिळाले होते. त्यानंतर सदरचे व्हाट्सअप चॅट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देण्यात आले. पुढे वेगवेगळ्या व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली होती.
 
 
सुशांत सिंग राजपूतला अमली पदार्थांचा पुरवठा करण्याच्या कामात सिद्धांत पिठाणी याचा मुख्य सहभाग असल्याचा एनसीबीच्या तपासात समोर आले. सिद्धार्थ पिठाणी हा हैदराबादमध्ये असल्याचा कळताच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी हैदराबादला जाऊन अटक केली. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. आता पुढे आणखी किती धक्कादायक खुलासे समोर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0