‘कोरोना’ प्रतिबंधक औषधांसाठी मनोज कोटक यांचे प्रयत्न

28 May 2021 14:13:57

Kotak _1  H x W

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धुमाकूळ घातला आहे. वाढती रुग्णसंख्या व त्या रुग्ण्संख्येला पुरवल्या जात असलेल्या वैद्यकीय सेवा यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे. एका बाजूला कोरोना व दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक औषधांची दिवसेंदिवस भासणारी कमतरता, यामुळे सर्वसामान्य या दुहीत भरडला जात आहे.
 
 
दरम्यान, गुरुवार, दि. २७ मे रोजी भाजपचे खासदार तथा ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स मजदूर संघा’चे अध्यक्ष मनोज कोटक कोरोना प्रतिबंधक लसींसमवेत ‘रेमडेसिवीर’ आणि ‘ब्लॅक फंगस’ या औषधांचे उत्पादन सुरू करण्यासाठी ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड’च्या व्यवस्थापकीय संचालक नीरजा सराफ यांच्यासमवेत पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश लांडगेही उपस्थित होते.
 
 
“केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मांडविया आणि आयएएस जेएस एचके हजोन यांच्याशी याबाबत दूरध्वनीवर चर्चा झाली आहे. यासंदर्भात ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड’ने दिलेल्या प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा देण्याचे काम आम्ही करू जेणेकरून याची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल आणि लोकांना त्वरित दिलासा मिळेल,” असे खासदार मनोज कोटक म्हणाले.



Powered By Sangraha 9.0