क्रांतिकारक वामन नारायण जोशी (दाजी काका)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2021
Total Views |

१११_1  H x W: 0




वास्तविक दाजी (वामनराव) हे सावरकर बंधूंचे शिष्य; शिष्य कसले ते भक्तच होते. तरीही त्यांना हा मान मिळाला. कारण, त्यांनी केलेले कृत्य हे दशकातील शतकृत्य होते.
 
 
प्रत्येक राष्ट्रभक्तासाठी अंदमान हे अयोध्येइतकेच पवित्र आहे. काहीजण प्रतिवर्षी वारीला जावे तसे तेथे भक्तिभावाने जातात व थोर क्रांतिकारकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात. पण, तेथे जाऊन आलेल्यांपैकी अनेकांना दाजी जोशी माहिती नसतात किंवा नाव माहीत असते, पण त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसते.
 
 
वास्तविक, तेथील कुप्रसिद्ध सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगलेल्या महान क्रांतिकारकांची जी सूची लावलेली आहे, त्यात अगदी शीर्षभागी नाव आहे, दाजी नारायण जोशी. त्यानंतर दुसरे नाव आहे ते गणेश दामोदर सावरकर आणि तिसरे नाव आहे ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर.
 
 
ही तीनही नावे प्रात:स्मरणीय आहेत. वंदनीय आहेत. वास्तविक दाजी (वामनराव) हे सावरकर बंधूंचे शिष्य; शिष्य कसले ते भक्तच होते. तरीही त्यांना हा मान मिळाला. कारण, त्यांनी केलेले कृत्य हे दशकातील शतकृत्य होते. (र. के. पटवर्धन)
तो काळ असा होता की, ब्रिटिशांनी आमच्या पवित्र हिंदूभूमीवर अत्याचारांचा हैदोस घातला होता. हिंदू म्हणजे ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून हिंदूंच्या मानबिंदूंना पायदळी तुडवणे हा ब्रिटिशांचा आवडता खेळ झाला होता. भारतभर जे होत होते, तेच नाशिकला झाले. पण, हे नाशिक होते हे ब्रिटिश विसरले. हा ज्वलजहाल क्रांतिकारकांचा बालेकिल्ला होता. त्यांचा किल्लेदार होता गणेश दामोदर सावरकर म्हणजेच बाबाराव आणि सेनापती कोण होता ते वेगळे सांगायला हवे का? अर्थातच, ते होते स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि ‘रणावीण स्वातंत्र्य कुणा मिळाले?’ हा त्यांचा महामंत्र होता.
 
 

Savarkar_4  H x 
 
 
त्यावेळी १९०९ साली विल्यम नावाच्या मग्रूर अधिकार्‍याने, आपल्या घोडागाडीला पुढे जाऊ दिले नाही, या क्षुल्लक कारणासाठी एका गरीब गाडीवानाला लाथाबुक्क्यांनी तुडवून ठार मारले. त्याच्यावर ब्रिटिश सरकारने काहीच कारवाई केली नाही. तो मुजोर तोंड वरकरून शहरात फिरत होता. हे सळसळत्या रक्ताच्या सावरकर भक्तांना कसे सहन होणार?
 
 
दुसर्‍या एका गोर्‍या अधिकार्‍याने शिकार करताना गोळी झाडली, ती एका गरीब वनवासीला लागली व तो मेला. हा अधिकारी मस्तीत मोकळा फिरत होता. नाशिकमध्ये असंतोषाचा आगडोंब उसळला. मग ब्रिटिश सरकारने खटला भरल्याचे नाटक केले. तो आरोपी निर्दोष सुटला आणि नाशिकमध्ये हिंडू लागला.
 
 
त्यात कीर्तन, प्रवचनांवर, कालिका मातेच्या यात्रेवर बंदी आणली गेली. देशभक्तीच्या चार कविता छापल्या म्हणून बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तात्यारावांना पाच खटल्यांमध्ये गोवले.
 
 
वरील सर्व कारणांमुळे सावरकर शिष्यांचा भडका उडाला. त्यावेळी नाशिकचा कलेक्टर होता जॅक्सन. तोच या सर्व अत्याचाराला जबाबदार होता. अत्याचारांची हद्द झाली होती. म्हणून ब्रिटिश शासकांना हे दाखवून देणे गरजेचे होते की, आम्ही भारतीय बुळचट नाही, देव, देश आणि धर्माचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. म्हणून जॅक्सनचा वध करण्याचे निश्चित झाले.
 

Savarkar_1  H x 
 
 
नेमकी त्याच वेळी पॅरिसहून मागवलेली ‘ब्राऊनिंग’ पिस्तुले नाशिकच्या क्रांतिकारकांच्या हाती आली. मग त्याच पिस्तुलांनी २१ डिसेंबर, १९०९ रोजी विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या कोवळ्या मुलाने (वय १७) जॅक्सनचा वध केला. हा वध म्हणजे ब्रिटिश साम्राज्याला मारलेली सणसणीत थप्पड होती.
 
 
 
अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे यांना जागेवरच अटक झाली. कृष्णाजी कर्वे तेथून निसटले, पण पुढे पकडले गेले. गणू वैद्य, शंकरराव सोमण यांनाही अटक झाली. २६ डिसेंबर रोजी कृष्णाजी कर्वे यांनाही अटक झाली. त्याचदिवशी वामनराव उर्फ दाजी जोशी यांनाही येवले येथून अटक झाली. त्यांना काढण्या घालून उघड्या अंगाने फटके मारत मारत नाशिकला आणण्यात आले.
या पुढची कहाणी अत्यंत दारुण आहे. पकडले गेलेल्या सर्व तरुणांचे प्रचंड हाल करण्यात आले. त्यासाठी अलिखान नावाच्या क्रूरकर्म्याची खास नेमणूक करण्यात आली होती. त्यास ‘काहीही करून कबुली जबाब घे,’ अशी खास सवलत देण्यात आली होती.
 
 
 
 
Savarkar_2  H x
 
 
 
या तरुण मुलांनी जे छळ सोसले त्याला तोड नाही. ती वर्णने न्यायालयातील त्यांच्या जबानींत आली आहेत व ती रेकॉर्डवर घेण्यात आली आहेत. ती वाचवत नाहीत. ती वाचताना भावना वेग असह्य होऊन मी स्वतः किती तरी वेळा अगदी सुन्न होऊन नुसताच बसलो आहे. हा खटला वेगाने चालवण्यात आला. खटला सुरू असतानाच विनायक कोल्हटकर पोलिसांच्या मारहाणीने मेले, इतका छळ चालला होता. आरोप सिद्ध झाले, निकाल लागला. त्यानुसार अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे आणि कृष्णाजी कर्वे यांना फाशी, वामन (दाजी) जोशी यांना काळ्या पाण्याची जन्मठेप अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
 
 
गणू वैद्य आणि सोमण यांना दीर्घकालीन शिक्षा दिल्या. सोमण यांचे भायखळ्याच्या तुरुंगातच निधन झाले. अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे आणि कृष्णाजी कर्वे यांना ठाण्याच्या तुरुंगात दि. १९ एप्रिल, १९१० रोजी फाशी देण्यात आली. या देशभक्त हुतात्म्यांची प्रेते तरी मिळावीत म्हणून नातेवाईकांनी केलेले अर्ज फेटाळण्यात आले. खाडी किनारी हुतात्म्यांचे देह जळताना दुरून पाहण्याची परवानगी तेवढी दयाळू सरकारने नातेवाईकांना दिली.
 
 
आरोपी क्रमांक ५- श्री. वामन नारायण जोशी उर्फ दाजी काका. शिक्षा : काळे पाणी-जन्मठेप-अंदमान
अटकेच्या जागीच अनंत कान्हेरे यांच्या खिशात वामनरावांच्या हस्ताक्षरातील चिठ्ठीचे तुकडे मिळाले. पोलिसांनी ते नीट जुळवले. मग जॅक्सन वधाचा सर्व प्लॅन तपशीलवार कळून आला. हा मुख्य पुरावा, याशिवाय फोटोग्राफर परदेशी, जॅक्सनच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या साक्षी यामुळे वामन दाजी यांचा कटातील सहभाग सिद्ध झाला. नुसता सहभागच नव्हे, तर विनायक देशपांडे व दाजी यांनीच कट रचला, अनंतला ट्रेनिंग दिले, त्याची बारीकसारीक तपशीलासह उत्तम तयारी करून घेतली, हे सिद्ध झाले. म्हणून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली.
 
 
बहुतेक सगळ्या इतिहासकारांनी यांचे वर्णन ‘निधड्या छातीचा, बलदंड शरीराचा व युयुत्सु वृत्तीचा’ असेच केलेले आढळते. काही दिवस भायखळ्याच्या तुरुंगात ठेवून नंतर त्यांना काळ्या पाण्याला अंदमानला पाठवण्यात आले. जेलर बारी बाबा आणि त्याची छळछावणी जगप्रसिद्धच आहे. कोलू चालवणे, काथ्या कुटणे, सतत मार खाणे, अपमान, कदान्न भक्षण हे दाजींच्याही नशिबी आले!
 
 
काळ्या ढगाला चंदेरी किनार म्हणजे पूजनीय सावरकर बंधूंचा जेलमधील सहवासही होती. स्वा. सावरकरांचे दाजींवर फार प्रेम होते. प्रेम आणि आदरही होता. सावरकरांनाही ५० वर्षांची शिक्षा झाली. भायखळा जेलमध्ये आल्यावर तात्यांनी दाजी, सोमण व गणू कसे आहेत, याबद्दल आस्थेने चौकशी केली होती.
 
 
पुढे तात्याराव आणि दाजी यांना काळ्या पाण्यावर अंदमानला नेण्यात आले. अंदमानच्या जेलमध्ये त्यांनी वामनरावांना फार प्रेमाने वागवले. वामनरावांनी सावरकर बंधूंची खूप सेवा केली. बाबारावांसाठी स्वयंपाक करावा, तात्यारावांचे कपडे धुवावेत आणि त्यासाठी दोघांचाही कृतक कोप हसत हसत सहन करावा. असा दिनक्रम असे. सारेच क्रांतिकारक तेज तर्रार होते. कुठल्याही परिस्थितीत, कुठेही असो ते स्वाभिमानाची ज्वाळा होते. एकदा वामन दाजींना बरे वाटत नव्हते. कोलू ओढता येत नव्हता. तेथील शिपाई सारखा अंगावर ओरडत होता. दाजी हतबलपणे जमिनीवर बसून होते.
 
 
 
शेवटी तो शिपाई ओरडत अंगावर धावून आला व दाजींचा हात हिसडत म्हणाला, “सुव्वरके बच्चे....” हे शब्द ऐकताच दाजी उसळले व त्यांनी त्या शिपायाच्या मुस्कटात अशी जंगी मारली की, त्याचे दात पडले व तो भुईवर आडवा झाला. इतर शिपाई धावत आले आणि त्यांनी दंडुक्यांनी मारत दाजींना रक्तबंबाळ केले.
 
 
तुरुंगात एकच क्षोभ उसळला, “अरे! जोशी महाराज को मारा, जोशी महाराज को मारा.” सारे कैदी अनावर झाले. संप झाला. शेवटी जेलर बारीला स्वत: यावे लागले. बारीला स्वा. सावरकरांनी खडे बोल सुनावले. बारीला नमते घ्यावे लागले. तेव्हापासून आजारी कैद्यांना काही प्रमाणात सवलती मिळू लागल्या.
 
 
दाजींनी सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली जेलमध्ये अन्न सत्याग्रह, संप, आंदोलने, सर्व हिरिरीने केली. बारीला जेरीस आणले. तेथेही त्यांनी देशभक्तांचे जाळे विणले. त्यामुळे एकदा त्यांना काही देशद्रोही, धर्मद्रोही सावरकरांवर विषप्रयोग करणार असल्याची खबर आधीच लागली. त्यांनी तात्यारावांना सावध केले व मोठे अरिष्ट टळले. (संदर्भ - नाशिकचे दशकातील शतकृत्य रघुनाथ के. पटवर्धन, पृ.१११)
 
 
ते शाळेत मास्तर असल्याने येथेही शाळा उघडली गेली. अनेकांना साक्षर केले. तेथे हिंदू-मुसलमान हा भेद मुळीच ठेवला नाही. सावरकर राजबंद्यांना सोडण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे सतत अर्ज पाठवत असत. त्याचा उपयोग होऊन जे राजबंदी सोडण्यात आले, त्यात वामनरावांचाही नंबर लागला व त्यांना दहा वर्षांनी भारतात पाठवण्यात आले. पण, ते सुटले असे झाले नाही. भारतात त्यांना येरवड्याच्या तुरुंगात आणून ठेवले. तेथे राजबंदी असूनही त्यांना दीड वर्ष खुनी, दरोडेखोर यांच्या बरोबर ठेवले गेले. येथेही अंदमानसारख्याच ‘दंडाबेडी’, ‘आडवीबेडी’ अशा शिक्षा भोगाव्या लागल्या. या अत्याचारांमुळे जेव्हा १९२२ साली त्यांची सुटका झाली, तेव्हा शरीराने ते खूपच दुर्बळ झाले होते, पण मनाने भक्कम होते.
 
 
समशेरपूरला परत आले तेव्हा संपूर्ण कुटुंबाची अगदी वाताहत झाली होती. बंधू, भावजयी, आई निर्वतले होते. भावाची लहान मुले रडत होती. चरितार्थाचा मोठाच प्रश्न होता. वामनरावांनी उर्वरित सर्व कुटुंबीयांना खूप प्रेम दिले, त्यांचा अतिशय प्रेमाने, परंतु शिस्तीने सांभाळ केला.
 
 
 
आपल्या सर्व पुतण्यांना/नातवंडांना मुलगा-मुलगी हा भेद न करता चांगले शिकवले. सर्वजण चांगले शिकले. त्यातील शरयू या उत्तम शिकून शिक्षकी पेशातच गेल्या. पुढे त्यांचा विवाह माझे मामा, भारतीय वायुसेनेतील तंत्रज्ञ प्रकाश बळवंत कुलकर्णी यांच्याशी झाला. प्रकाश कुलकर्णी १९७१च्या युद्धात बांगलादेशात लढले होते. त्यांचे वडील बळवंत गणेश कुलकर्णी (कावनई इगतपुरी) हेदेखील स्वातंत्र्यसैनिक होते. शरयू मामींनी संग्रामपूर येथील घरातून कष्टाने जुनी कागदपत्रे हुडकली, तेव्हा दाजी काकांच्या हस्तलिखितात लिहिलेले आत्मचरित्र मिळाले. त्यांनी अपार मेहनत करून ते नीट लिहिले व दि. २६ जनेवारी २०१६ रोजी भगूर येथे पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. तेव्हा कुठे दाजी काकांचे महात्म प्रकाशात आले.
 
 
वामनराव स्वतः हुशार होते. व्ह. फा. परीक्षेत ते नाशिक शहरात दुसरे व संबंध नाशिक जिल्ह्यात सातवे आले होते. त्यामुळे मुलामुलींनी खूप शिकावे, यासाठी ते आग्रही असत. ते उत्तम चित्रकार होते. संगीताचे भोक्ते होते. स्वतः संवादिनी उत्तम वाजवत. त्यांच्या सहवासातील प्रत्येकाला अगदी घरच्या गाईंनादेखील त्यांनी प्रेम, प्रेम आणि प्रेमच दिले. ते इतके स्वाभिमानी की, त्यांनी कधीही स्वातंत्र्यसैनिक म्हणून अर्ज करून पेन्शन मागितली नाही.
 
 
क्रांतिकारकांवर लिहिणारे देशभक्त वि. श्री. जोशी हे मुद्दाम समशेरपूरला आले, दाजींना भेटले. नंतर त्यांनी पुराव्यानिशी पत्र पाठवले ते थेट स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना - पंडित नेहरूंना. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून एक हजार रुपयांचा चेक आला व पुढे अजून थोडीशी रक्कम आली. बस्स!
 
 
स्वा. सावरकरांचा आणि दाजींचा पत्रव्यवहाराद्वारे संपर्क असे. पुढे १९५५ मध्ये दाजींचे मेव्हणे लक्ष्मण कुलकर्णी यांनी दाजी व तात्यारावांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली. ही श्रीराम-भरत भेट सावरकर सदनात दादर येथे झाली. दोघांनाही अश्रू आवरेनात. त्यांनी एकमेकांना मिठी मारत मनसोक्त रडून घेतले.
 
 
माईंचे निधन झाल्याची दु:खद वार्ता तात्यांनी स्वत: पत्र लिहून दाजींना कळवली होती. त्यात त्यांनी कळवळून म्हटले होते की, “दाजी, आज माझ्या घराची भिंत कोसळली. आता मी कसा राहू? ”
 
 
 
सरकारने उपेक्षा केली, पण राष्ट्रभक्तांच्या हृदयात दाजी काकांना कायमचे मानाचे स्थान मिळाले.
१४ जानेवारी, १९६४... संक्रांत होती. दाजींनी सर्वांना तीळगूळ दिला व आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद दिले आणि आपले पुतणे भास्कर ब्रह्मदेव जोशी यांच्या मांडीवर शांतपणे अखेरचा श्वास घेतला.
 
 
‘नाही चिरा, नाही पणती’ अशा अनाम वीरांच्या मांदियाळीतील अजून एक तारा निखळून पडला.
हा केवळ लेखनप्रपंच नसून सर्व क्रांतिकारकांना, त्यांच्या कुटुंबीयांना घातलेला साष्टांग दंडवत आहे!
 
 
वंदे मातरम्!!!
 
- अनिल पाटील
 
९६१९००९१८९
 
aniljanardan५७@gmail.com
 
संदर्भ :
१) ज्वालामुखीचेअग्निनृत्य - वि. श्री. जोशी, प्रकाशक - मनोरमा प्रकाशन, १९९५
 
२) नाशिकचे दशकातील शतकृत्य - र. के. पटवर्धन, प्रकाशक - र. के. पटवर्धन, नाशिक, १९७२
 
३) स्वा. सावरकरांची प्रभावळ - श्री. र. वर्तक, प्रकाशक - श्री. र. वर्तक, नाशिक, ११ सप्टेंबर १९७२
 
४) पूर्णाहुति आणि वाताहत - वि. श्री. जोशी, प्रकाशक - मनोरमा प्रकाशन, १९९५
 
५) वामनदाजींचे चरित्र - सौ.शरयू प्रकाश कुलकर्णी, प्रकाशक - कर्नाळा ट्रस्ट, २० फेब्रुवारी २०१६ (स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणदिनी भगूर येथे प्रकाशन)
 
 
६) माझी जन्मठेप - वि. दा. सावरकर - प्रकरण २, ९,११, १६.
@@AUTHORINFO_V1@@