सावरकरांचे अंदमानातील हिंदूराष्ट्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2021
Total Views |

main-qimg-b535180a5f9adf7
आधीच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात अन्याय, अत्याचाराविरुद्ध आणि ध्येयासाठी लढण्यात प्रत्येकाचा समसमान वाटा असेल, असे तात्यारावांना वाटत असे. परंतु, अंदमानात त्यांना दिसलेले वास्तव हे त्यांना व्यथित करणारे होते, म्हणूनच त्यांनी हिंदूंना अधिक बळकट करण्यासाठीची पावले उचलायला सुरुवात केली.
 
 
तात्याराव सावरकर हे एक वेगळंच रसायन होतं, हे आपण जाणतोच. देशसेवेसोबत त्यांनी समाजातील हिंदुत्व सदैव जागृत ठेवण्याचं काम कर्तव्य म्हणून केलं. अगदी काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावरदेखील अंदमानातल्या सेल्युलर जेलमध्ये ते काम जोमाने सुरूच ठेवलं. आपल्याला दुहेरी जन्मठेप झाली आहे, हे वास्तव कुरवाळत न बसता तेथील असलेल्या परिस्थितीशी सामना करून परिवर्तन आणण्याचा चंग त्यांनी बांधला. स्वातंत्र्यासाठीचे योगदान आणि आपल्या स्वप्नातील राष्ट्रनिर्मितीचे पुढे काय होणार, याचे दुःख होणं साहजिक होतं. पण, हार मानतील ते तात्याराव कसले!! या उलट जे जे हाती लागेल त्याचा सदुपयोग त्यांनी हिंदू जनजागृतीसाठी केला.
 
 
सावरकर म्हणजे परमेश्वराने देशसेवेसाठीच जन्माला घातलेला महात्मा. त्यांचे एकंदरच जीवनमान पाहता शिक्षण, धर्म व राष्ट्ररक्षण यासाठीच त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. त्या वेळेस वैदिक धर्मात काळ आणि आवश्यकतेनुसार बदल अपेक्षित आहेत, याची जाण त्यांना होती आणि याचा उल्लेख त्यांच्या अनेक लिखाणांत व भाषणांत आपल्याला दिसून येईल. स्वातंत्र्यासाठीच्या धगधगत्या काळात ज्वलंत हिंदुत्व मांडणारे तात्याराव हे एकमेव हिंदू नेते होते. ‘हिंदू आणि हिंदुत्व’ हा विषय येताच तात्याराव सळसळून उठायचे आणि आपली परखड मतं मांडायचे. हिंदूंमध्ये झालेले विघटन ही पारतंत्र्याची सर्वात मोठी अडचण होती, हे त्यांनी हेरलं होतं. हिंदू तरुणांना एकत्र आणून त्यांना हिंदुत्वाचे महत्त्व पटवून देण्यात ते सदैव तत्पर असत.
 
 
आधीच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात अन्याय, अत्याचाराविरुद्ध आणि ध्येयासाठी लढण्यात प्रत्येकाचा समसमान वाटा असेल, असे तात्यारावांना वाटत असे. परंतु, अंदमानात त्यांना दिसलेले वास्तव हे त्यांना व्यथित करणारे होते, म्हणूनच त्यांनी हिंदूंना अधिक बळकट करण्यासाठीची पावले उचलायला सुरुवात केली. १९०८ साली गोरे सरकार मुसलमानांना अधिक सवलती देत असे. पण, पुढे १९१६ साली हिंदूच त्यांना या सवलती बहाल करू लागले आणि त्यातूनच एक हिंदू-मुस्लीम करार झाला, तो होता ‘लखनौ करार.’ त्यात हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने राहतील, अशी शपथ दोघांमध्ये घेतली गेली. पण, दुर्दैवाने त्याचं पालन केलं ते फक्त हिंदूंनीच. ‘खिलाफत चळवळ’ हिंदूंनी मनोभावे स्वीकारली, कारण गांधींनी त्याला ‘आपली’ मानायला भाग पाडलं. पुढे त्याचंच फलित म्हणून की काय, मलबारमध्ये मोपल्यांकडून हिंदू मुली व महिलांवर जबर अत्याचार करण्यात आले. हिंदूंच्या घरांची होळी पेटवण्यात आली आणि सर्रास धर्मांतर करण्यात आलं.
 
 
अंदमानात पाऊल ठेवताच तात्यारावांना जे चित्र दिसलं, ते अतिशय भयानक होतं. अत्याचाराच्या घटना त्यांनी केवळ पहिल्याच नाही तर त्या अनुभवल्यादेखील. हिंदूंना मिळणारी जाचाची वागणूक व मुसलमान कैद्यांना मिळणारे झुकते माप पाहून तात्यारावांच्या हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या विचारांना क्षणात तडा गेला. कैद्यांवर लक्ष ठेवायला तिथे पठाण होते, त्यामुळे मुसलमानांना नमाजाची सूट आणि त्याच वेळेस हिंदूंवर होणारे अत्याचार हे फारच भयावह होते. तात्याराव प्रखर हिंदुत्ववादी होण्यास तिथली हीच परिस्थिती कारणीभूत होती, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
 
हिंदुस्थानवर तुर्कस्तानच्या सुलतान जर्मन कैसरची स्थापना करणार आणि हिंदुस्थानवर सुलतानाचे राज्य येणार, जे मुसलमान होणार त्यांना माफी आणि हिंदू राहिल्यास नरकयातना नशिबी येणार, अशा बातम्या पेरल्या गेल्या. काही गोष्टींचा पाठपुरवठा केल्यावर तात्यारावांच्या लक्षात आलं की, हे हिंदूंना घाबरवून बिथरवण्याचं कारस्थान आहे. त्यावेळी तात्यारावांच्या मार्गदर्शनाखाली काही हुशार हिंदूंनी वेगळा प्रचार केला की, सुलतान आता आर्य होणार आहे आणि अशाप्रकारे हिंदूंनी ती लढाई मानसिकरीत्या जिंकली. मुसलमानांचा इस्लाम प्रसार व धर्मांतराचे कार्यक्रम जोमात सुरू होते. असं धर्मांतर झालेल्यांना हिंदू पुन्हा बाजूलाही बसवत नव्हते. ती बाब लक्षात घेत तात्यारावांनी त्यांच्या शुद्धीकरणाचे कार्य हाती घेतले. हिंदू सबलीकरणासाठी तात्याराव त्यांना रोज पंगतीत बसवत असत. असं सतत चालू राहिल्याने लोकही त्यांना हळूहळू स्वीकारू लागले.
 
 
एक घटना तर अशी घडली की, त्या काळी अंदमानात हिंदू-मुसलमानांची स्वतंत्र जेवणाची सोय असायची. पण, काही मुसलमान मुद्दाम हिंदूंच्या अन्नपात्रांना स्पर्श करीत असत. मुसलमानांनी स्पर्श केलेले अन्न आपण ग्रहण केले, तर आपण मुसलमान होऊ, या भीतीने अनेक हिंदू चार-पाच दिवस उपाशी राहत. ही बाब जेव्हा तात्यारावांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी तो विषय अतिशय चतुराईने हाताळला. त्यांनी करवंटीत पाणी घेऊन ‘अपवित्र: पवित्रे वा:’ हा मंत्र म्हणत ते संपूर्ण अन्नावर शिंपडले व म्हणाले, “आता हे मंत्रित झाले असून, जो कुणी हे अन्नग्रहण करेल तो हिंदू म्हणवला जाईल,” असं झाल्याने आता मुसलमान कैद्यांवर उपासमारीची वेळ आली होती.
 
 
सावरकरांना १९२०ला अंदमानात तेलकोठाराचे व्यवस्थापक किंवा नराग्रणी (फोरमन) म्हणून नेमण्यात आले होते. (ही नेमणूकही फार उशिरा झालेली होती, सावरकरांपेक्षा अल्पशिक्षित बंदीवान याआधीच मोठमोठे ‘बाबू’ होऊन अधिकार गाजवत होते याची नोंद घेणे आवश्यक आहे.) बंदीवानांचं तेल मोजून घेणे, तेलकामावर देखरेख ठेवणे, बंदीवानांना मारणे, बंदीवानांमध्ये होणार्‍या तेलचोरीवर निर्णय घेणे, तेल कमी भरल्यास शिक्षा करण्याचा अधिकार, असे महत्त्वाचे अधिकार फोरमनला असत.
 
 
त्यामुळे पूर्वी राज्यबंद्यांच्या छळात सगळ्यांच्या पुढे होण्यात चढाओढ करणारे मुसलमान पेटीऑफिसर येऊन अगदी नम्रपणे हात जोडून, सलामच नाही तर हात जोडून, सावरकरांची विनवणी करीत की, “बडे बाबू, अब जान बचाना!” यावर त्यांना सावरकर म्हणत, “तुम्ही मुसलमान म्हणून कोणाला माझ्यापासून त्रास होईल ही भीती सोडून द्या. तुम्ही कोणा हिंदू बंदीस त्रास देऊ नका म्हणजे झाले. कोणाची कवडीही मला नको. केवळ शक्य तितके करून आपले काम नीट करीत जा. मग थोडे तरी मी बघून घेईन. परंतु, जर तुम्ही मी हिंदू म्हणून कोणी कटाने काम कमी कराल किंवा पूर्वीप्रमाणे हिंदू लोकांस पीडा द्याल किंवा पैसे उकळू पहाल तर मात्र ध्यानात धरा!” काही जुन्या पठाणांनी वरिष्ठ अधिकार्‍यांपाशी अशी भीती व्यक्त केली की, “अब तो पोर्टब्लेअर में हिंदुराज हैं, त्यामुळे आमच्यावर खोटे खटले भरतील.” त्यावर सावरकर लिहितात.
 
“ज्या वेळेस यांचे ‘पठाणराज’ होते, तेव्हा हिंदूंना असे खोटे खटले करून निष्कारण छळण्याची ज्यांना खोड होती, त्यांच्यापैकी या अवशिष्ट शिष्टांना आता हिंदूही तेच करतील, अशी भीती वाटणे हे त्यांच्याच दुष्टतेचे प्रतिबिंब होते, हिंदूंच्या नव्हे. कारण, हिंदूंनी निष्कारण कोणास मुसलमानास म्हणून छळले नाही; इतकेच नव्हे तर समंजस आणि धर्मवेडापासून अलिप्त असलेल्या मुसलमान बंधूस आम्ही शेवटपर्यंत पाठिंबाच देत असून, शिकवीत असू आणि आमच्या वशिल्याने होईल तितके कल्याणच करत असू. त्यातील कित्येकांचे अर्ज लिहिले असतील; कित्येकांच्या कामात साहाय्य दिले असेल.” सावरकरांनी अंदमानात मुसलमानांनाही शिक्षण दिले आहे, त्यांच्यातही साक्षरतेचा प्रचार केला आहे. येरवड्यात हिंदू-मुसलमान राजबंदी एकत्र करून ‘एकीची’ व्याख्या आणि स्वतंत्र हिंदुस्थानची घटना यावर चर्चा घडवली होती.
 
अशाप्रकारे काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगतदेखील तात्यारावांनी अंदमानात हिंदू जनजागृती सुरूच ठेवली. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासोबत हिंदू सक्षम आणि साक्षर होणे गरजेचे आहे, हे त्यांनी मनाशी ठाम केले. सावरकरांचे अंदमानातील टीचभर हिंदूराज्य हे असे होते. अशा या युगपुरुषास कोटी कोटी प्रणाम.


- राज कळवणकर
९९२०६४५३१३
@@AUTHORINFO_V1@@