अंदमानात स्फुरलेले महाकाव्य ’कमला’

27 May 2021 17:59:40

FB _1  H x W: 0



‘कमला’ हे सावरकररचित नितांत सुंदर असं खंडकाव्य आहे. अत्यंत नाट्यमय घटनायुक्त असलेल्या या काव्याच्या रचनेचा इतिहासही नाट्यमयच आहे. ५० वर्षांची अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा, बंद कोठडी, सोबतीला केवळ चार भिंती! अशा वेळी काट्याने त्या भिंतीवर सावरकरांनी रचलेले हे काव्य! खरं म्हणजे हे काव्य प्रतिकूलतेच्या पाषाणावर कोरलेलं शिल्पच म्हणावं लागेल. जो कोणी हे काव्य वाचतो, त्याच्याही हृदयावर हे काव्य नक्कीच कोरलं जातं.
 
 
सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे ओज! सूर्यासम प्रखर व्यक्तिमत्व असणारे सावरकर ‘कमला’ काव्यात मात्र चंद्राप्रमाणे शीतल वाटतात. ‘कमला’ काव्याचे गद्य अनुवादक भा. ल. रानडे म्हणतात त्याप्रमाणे, “अन्य साहित्यात सावरकर मर्यादा पुरुषोत्तम रामासारखे उत्तुंग, अतिमानुष वाटतात, तर ‘कमला’मध्ये ते गोपाळकृष्णासारखे खट्याळ, लडिवाळ आणि जवळचे वाटतात.” ‘कमला’ ही या काव्याची नायिका. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कमलेच्या नाजूक भावभावनांचे पापुद्रे अगदी अलगद, हळुवारपणे सावरकर उलगडतात. स्त्री मनाचे आकलन आणि उकल सावरकरांनी इतकी सुंदर केली आहे की विस्मय वाटावा!
 
एका पुरुषालाही स्त्री मन कळू शकतं, मात्र त्यासाठी सावरकरांसारखं संवेदनशील मन असाव लागतं. त्यांच्यासारख्या सहृदयी माणसात या स्त्रीसुलभ भावना उपजतच असाव्यात. साने गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे, “पुरुषाला स्त्री होता आलं पाहिजे.” वयाच्या दहाव्या वर्षीच आईचं जाणं, घरात स्त्रियांची काम करणं, समवयस्क मैत्रीण थोरल्या भावाची पत्नी म्हणून येसूवहिनींचं येणं, यात कुठेतरी अंतरंगातली ऋजुता, कोमलता विकसित होत गेली आणि तीच या काव्यात आपल्याला दिसते. सावरकरांच्या इतर काव्यांमध्ये हेच ते ‘कमला’चे वेगळेपण!
 
 
सावरकरांच्या काव्यावर लहानपणी अभ्यासलेले मोरोपंत, वामनपंडित, श्रीधर, महिपती, विष्णुशास्त्री, कालिदास, भवभूती, पाश्चात्य कवी ऍकिलीस, होमर, मिल्टन, स्कॉट, शेक्सपिअर, शेले, किट्स, बायरन यांसारखे अनेक कवी यांचा परिणाम झाला. त्यांच्या काव्यप्रतिभेबद्दल काय म्हणावे! लहानपणी गाण्याच्या भेंड्या खेळताना एखादे गाणे अडले की सावरकर तिथल्या तिथे ओव्या रचून गायचे, त्यामुळे सावरकरांना आपल्या गटात घेण्यासाठी स्पर्धा असायची.
 
 
‘कमला’ या काव्याची चरणसंख्या ८८० इतकी आहे. अवघे आठ वर्षांचे असताना सावरकरांनी महाकवी होण्याची मनीषा बोलून दाखवली होती. प्राध्यापक प्रा. शं. के. कानेटकर म्हणतात, “कमला, विरहोच्छवासादी काव्ये म्हणजे कल्पनेने निर्माण करू घातलेल्या एका महाकाव्यरूपी द्रोणगिरीची लहान लहान शकले होत. पण, तिही पाहिल्यावर मूळचे विशालत्व व बलशालीत्व कसे असेल, ते तर्किता येते.” महाकाव्य रचण्यासाठी आवश्यक असणारी विद्वत्ता, प्रतिभा, उदात्तता, व्युत्पन्नता, विशालदृष्टी आणि अभिजातता सावरकरांच्या ठायी होती. ‘कमला’विषयी बोलताना बाळशास्त्री हरदास म्हणतात, “हे केवळ एक काव्य जरी त्यांच्या प्रतिभेतून स्फुरते तरी ते महाकवी ठरावे इतक्या योग्यतेचे आहे.” वा. ना. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे, “ते महाकाव्य न लिहिलेले महाकवी आहेत.”
 
‘कमला’ काव्यातही सावरकर आत्मनिवेदन करतात. लग्न झाल्या झाल्या परदेशगमन, ऐन तारुण्याच्या भरात ५० वर्षांची झालेली काळ्या पाण्याची शिक्षा, अशावेळी विरहवेदना साहजिकच जाणवायला लागली. कल्पनेच्या राज्यात त्यांचं मन विहार करू लागलं. परंतु, ही केवळ कल्पनाच नव्हती, ते होतं आयुष्यात आलेलं जळजळीत वास्तव. क्रांतिकारकाने लग्न करावं का, हा प्रश्न त्यांना पडला आहे. येथे आत्माविष्कार करून स्वतःच्याच आयुष्याकडे तटस्थपणे कवीला बघता येतं. कवीचा जीवनविषयक असलेला दृष्टिकोनही कळतो. ‘कमला’ हे सावरकरांच्या क्रांतिकारक आयुष्याचे आत्मनिवेदनच वाटते. प्रेम आणि कर्तव्य या दोन गोष्टी सामान्य माणसाच्या आयुष्यात असतात. माणूस एखादं काम एकतर प्रेम आहे म्हणून करतो अथवा कर्तव्य म्हणून. सावरकरांच्या बाबतीत तर प्रेम आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टी भारतमातेच्या ठायी एकरूप झालेल्या दिसतात.
 
 
श्री. श्यामजी कृष्ण वर्मा म्हणतात त्याप्रमाणे, “If Savarkar had any sweetheart, his country was the only sweetheart he had.” ‘श्रेयस’ आणि ‘प्रेयस’ यांच अद्वैत सावरकर चरित्रात आणि ओघानेच त्यांच्या सर्व वाड्.मयात बघायला मिळतं. भारतमातेवर विलक्षण प्रेम, त्यात मराठा साम्राज्य उभं करून रयतेचं दास्यविमोचन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सावरकरांचे आराध्य दैवत. पेशव्यांचा इतिहास तर मुखोद्गत. या पार्श्वभूमीवर ‘कमला’मध्ये पानिपत युद्धाच्या प्रसंगावर आधारित हिंदूंची शौर्यगाथा, कर्तव्यभावना सावरकरांनी रंगवलेली आहे. ‘कमला’च्या कथानकात कौटुंबिक प्रसंग प्रामुख्याने असले तरी शेवट मात्र ध्येयवादाने, कर्तव्यभावनेने होतो आणि तोच या काव्याला एका उंचीवर नेऊन ठेवतो.
 
 
कथानक अतिशय चित्रमय वर्णनाने रोचक बनले आहे. मुकुंद आणि कमला यांचा बालविवाह झाला होता. कमला तिच्या प्रेमळ सासूच्या सहवासात सुखाने राहत होती. मुकुंद आणि त्याचा जिवलग मित्र मुकुल हे दोघेही सैनिकीपेशाचे तरुण आहेत. पाडव्यानिमित्त घरी आलेला मुकुंद बागेत ‘कमला’ला बघतो आणि गुपचूप तिचे चुंबन घेऊन येतो. त्या स्पर्शाच्या नव्या भावनांनी तिचे मन उमलून येते. दुसर्‍या दिवशी ती ऋतुस्नात होते. चार दिवसांनी होमहवनादी समारंभ घरात होतात. मुकुलचे लग्न होईपर्यंत आपण व्रतस्थ राहू, असे मुकुंद मुकुलला सांगतो.
 
 
मुकुल मुकुंदाची मनधरणी करतो. तेवढ्यात बागेत काही तरुणी आणि प्रेमला येतात. प्रेमला कमलेची बहीण आहे. कमलेच्या सासूने तिलाही जवळ ठेवून घेतले असते. मुकुल आणि प्रेमला यांमध्ये आकर्षण असतं. त्यांच्यामध्ये प्रेमचेष्टा सुरु होते. रात्री कमला आणि मुकुंद यांची प्रेमभेट होते. ‘कमला’ गाढ झोपी जाते. एवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज येतो. बंड करणार्‍यांचे पारिपत्य करण्याच्या मोहिमेवर मुकुल निघाला आहे. भाऊंची आज्ञा वंद्य मानून मुकुंद आणि मुकुल, कमला आणि प्रेमला यांचे रक्षण कर, अशी देवाला प्रार्थना करून निघून जातात. एवढ्यात कमलेला भयंकर स्वप्न पडते. ती दचकून उठते आणि येथेच महाकाव्याचा एक सर्ग संपतो.
 
 
वीररसाने ओतप्रोत असलेल्या सावरकरी काव्यात कमला मात्र शृंगाररसात न्हालेली आहे. वीरता, शौर्य ही त्या काळाची गरज होती. ‘कमला’ काव्यातही वीररस आहे, नाही असं नाही. परंतु, शृंगाररस हा माणसात उपजतच असतो. आपला जन्मही शृंगारातूनच होतो. शृंगारामुळे आयुष्यात रुची उत्पन्न होते. शृंगाराला ‘रसराज’ म्हणतात ते उगाच नाही. उदा. - मुकुंद आणि कमला यांच्या पहिल्या चुंबनाचे वर्णन -
 
चोरट्या कटिला गुंफी कांपता कर तो झणीं,
लाजन्य लागती गाला ओठ लाजत त्याहुनी!
साचीकृतानना, लज्जाचित्र हृद्य अशा तऔं !
प्रियेच्या पहिल्याची तो चुंबनासि युवा पिओ!
प्रियेच्या पहिल्याची हे लज्जाचंचल चुंबना,
कोण प्राणी जगीं कीं जो विसरेल तुझ्या क्षणा!
असूनी पल जो पाजी चुंबना तुझिया रसा
शताब्दांहुनिही होई तरी अपल तो कसा!
तुझ्यांत दिव्य जी चोरी, गार जो चटकाहि कीं
त्वरा थांबविती, सक्ती अष्टि, संमति जी मुकी
चुंबना पहिल्या, दे ती सुखमादकता जशी
प्रियानंअर्पिता मद्यांमाजीही न पुन्हा तशी!

किंवा होमाच्या वेळी एकत्र बसले असतानाचे वर्णन -
पुरोहित वदे, लावा करा स्वपतिच्या करा,
करा तैं अंगुली काही कर अंगुलिंना शिवे
ओष्ठांचें ना तसें लागे मिष्ट चुंबन हें नवें

किंवा एकत्र न्हाऊ घालतानाच वर्णन -
न्हाता ओकासनी असें किती चोरियलीं तरी
अंगे स्वयेंचि अंगांसी लागताति परस्परीं;
मअम असे काही मञ्जू तें सुख लागलें
धरीचिं वक्षिं तो तीतें-झोक जाअनिया बरें!
 
काही वेळा हे वर्णन उत्तान वाटू शकते. परंतु, सावरकरांच्या काव्यावर कालिदास, भवभूती इत्यादी संस्कृत कवींची छाप होती. हे काव्यसुद्धा त्याच पंक्तीत बसणारे आहे. असे असले तरीही शृंगाराच्या जोडीला सावरकरांनी वीररसाची जोड दिल्याने या काव्याने उच्चपातळी गाठली असे दिसते. उदा -
 
 
धीरोदात्तैकसंस्कारी जाती ओकवटूनिया !
की देवांही द्विजांहींही महत्कार्य करू झणी
निर्वाचिता मला केली नियुक्ता मजसी अणी!
अष्टि जें पितरांचे, जें हृष्टवी अखिला मही
जयाच्या विजयासाठी व्हावें लुब्ध विरक्तही,
लोककल्याण साधूं तें सुख केवल ना - परी
अग्निसाक्ष सख्यासंगे कायसें व्रत मी धरी
 
 
काव्याचा शेवट ज्याप्रकारे झाला आहे, त्यानुसार पत्रगत वीररस असला तरीही रसिकमनात करुणरस प्रसवतो. रामायण, महाभारत, भगवद्गीता इत्यादी महाकाव्य ज्या अनुष्टुप वृतात लिहिली आहेत, तेच ‘कमला’ काव्यासाठी सावरकरांनी वापरले आहे.
 
 
‘आत्मनिवेदन’ हा सावरकरांच्या काव्याचा आणखी एक विशेष म्हणावा लागेल. सुरुवातीलाच बागेचे कल्पनारम्य चित्रमय वर्णन आलेले आहे. शेवंती, सोनचाफा, सूर्यफुल, केतकी, धोतरा, निशिगंध, कमळ, गुलाब, बटमोगरा, चाफा, बकुळ अशी अनेक फुलझाडांची वर्णनं, केवळ वर्णनच नाही तर त्यावर केलेल्या ‘उत्प्रेक्षा’ अतिशय विलोभनीय साकारल्या आहेत. फुलं तोडायला गेलेल्या कमलेचे वर्णन सावरकर पुढीलप्रमाणे करतात -
 
 
तदा दिसे समावोनी त्या फुलांत मनोरमा, हिमालयी व्रती जैशी असावी दिसली उमा सावरकरांनी नंतरच्या आयुष्यात सावरकर सदनाच्या परिसरात अनेक फळझाडे आणि फुलझाडे लावली होती आणि ते स्वतः या झाडांची काळजी घेत. संध्याकाळी अंगणात फेरफटका मारायच्या निमित्ताने सावरकर प्रत्येक फुलांशी, पानांशी हितगुज करायचे, अशा वेळी त्यांना जगाचा विसर पडत असे. वारंवार कठोर वाटणारं त्यांचं मन फुलाप्रमाणेच कोमल होतं. फुलाचा सुगंध ज्याप्रमाणे लपून राहत नाही, तद्वत सावरकरांच्या स्वभावाची ही हळवी आणि अपरिचित बाजू ‘कमला’ काव्यात बघायला मिळते.
 
 
मुकुंद आणि मुकुल यांच्यात क्रांतिकारकाने विवाह करावा की नाही, असा जो संवाद आहे, तो ‘कमला’ काव्यात मुकुल याच्या भूमिकेतून सावरकरांनी वदवून घेतला आहे. सावरकर स्वतः ध्येयवादी आणि हौतात्म्य वृत्तीचे होते. त्यांच्या काव्यातली पात्रसुद्धा त्यांनी तशीच रंगवली आहेत. मुकुंद, मुकुल, कमला आणि प्रेमला हे सगळेच राष्ट्रकार्य करतात. सावरकर ‘देव’ आणि ‘देश’ यात अभेद मानत होते. कमालाची सासू तिला म्हणते -
 
 

देवकार्यी, अहाबाले, लतांचीच सुमे किती
यौवनांची सुमे वीरप्रसू तोडुनि अर्पिती।
 
 
सावरकरांनी काव्यामध्ये काही कविसंकेत दिले आहेत. उदा - बकुळीला चूळ भरून पाणी घालणे. अनेक पौराणिक उल्लेखही आलेले आहेत, ज्यांना ते ज्ञात नाहीत त्यांना रसग्रहणात अडचण येते. मात्र, सावरकरांचा अभ्यास, कल्पनेची भव्यता थक्क करून जाते. संस्कृतप्रचुरता, त्यात परकीय शब्द टाळण्याचा जो सावरकरांचा अट्टाहास आहे, त्याने क्लिष्टता येते. काही गोष्टी अस्वाभाविक वाटतात. उदा - कमलेचा बालविवाह होतो, मात्र तिची बहीण प्रेमला मोठी होईपर्यंत अविवाहित आहे. जीवश्च कंठश्च मित्र मुकुलाचे लग्न नाही झाले म्हणून मुकुंदाचे ‘व्रतस्थ राहील’ असे म्हणणे.
 
 
प्रेमलेने मुकुलच्या बोटांत बोटं गुंफून कोणाची कोणती आहेत, हे ओळखण्यास सांगणेसुद्धा त्याकाळाचा विचार करता इतकी मुभा तेव्हा नव्हती. शिवाय मुकुंद कमलेचे सर्व समारंभ, पहिली रात्र या सर्व गोष्टी आता जरी स्वाभाविक वाटल्या तरी एवढे स्वातंत्र्य, मोकळेपणा त्या काळी नव्हता. पहिल्या रात्री कमलेशी बोलताना मुकुंद त्यांच्या मिलनातून जन्माला येणारा श्रीकृष्ण, भीष्म, भास्कराचार्य अशा अनेक विभूतींची नावं घेतो. येथे उगाच शृंगाराच्या समर्थनार्थ ओढाताण होताना दिसते. मात्र, शृंगारातील पावित्र्य त्यांना प्रतीत करायचे आहे.
 
 
काव्याच्या शेवटी मुकुंद आणि मुकुल यांचा त्याग काव्याला उच्चासनी नेतो. कानेटकर म्हणतात त्याप्रमाणे, “रामदासी महाराष्ट्र धर्माची शिकवण घेतलेल्या मुकुंद-मुकुलाची संसारी व राष्ट्रीय वृत्ती ही तत्कालीन मराठ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपाची छायाच आहे असे वाटते.”
 
 
ज्या परिस्तिथीत काव्याची रचना केली, ज्याप्रमाणे भिंतीवर लिहिलेले सहस्रावधी चरण मुखोद्गत करून कारागृहाबाहेर पाठवण्याची जी युक्ती केली, ते पाहता प्रा. भ. श्री. पंडित अभिप्राय देतात की, “मराठी शिवाय जगातल्या इतर कोणत्याही भाषेच्या वाड्.मयाच्या इतिहासात असा अद्भुतरम्य प्रसंग नसेल.”
 
 
- अश्विनी पितळे
Powered By Sangraha 9.0