अंदमान आणि सेल्युलर कारागृहाचा इतिहास

    दिनांक  27-May-2021 18:41:28
|

Untitled _1  H
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्राचा अभ्यास करताना अंदमान बेट आणि सेल्युलर कारागृह हे घटक अविभाज्यपणे प्रभाव पाडतात. याचा प्रचलित भाषेत ‘काळे पाणी’ हा उल्लेख केला जातो. काळ्या पाण्याच्या जीवघेण्या यातनांना पुरून उरणारी जबरदस्त इच्छाशक्ती आणि ठळकपणे उठून दिसणारा त्यांचा आत्मविश्वास याला इतिहासात तोड नाही. ज्या अंदमानाच्या काळ्या पाण्यावर कणखर मनाने परिस्थितीशी झुंजतानासुद्धा त्यांना ‘कमला’सारखे महाकाव्य सुचले होते, त्या अंदमान आणि सेल्युलर जेलचा हा संक्षिप्त इतिहास...
 
 
 
अंदमानची माहिती
 
भौगोलिकदृष्ट्या अंदमान हे मुळात १८४ बेटं आणि ६५ लहान बेटांचे मिळून बनलेले आहे. सीमांमधील लांबी सुमारे ३५५ किलोमीटर आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत बेटांचे पाच समूह आहेत. उत्तर अंदमान (८१ किलोमीटर लांब), मध्य अंदमान (७१ किलोमीटर लांब), दक्षिण अंदमान (८४ किलोमीटर लांब), दक्षिण अंदमानच्या पूर्वेस समांतर असणारे बारटांग (२८ किलोमीटर लांब) आणि शेवटी रुटलॅण्ड (१९ किलोमीटर लांब). रुटलॅण्ड भाग संपूर्णपणे दाट व गडद अरण्यांचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काळातील अंदमानचे वर्णन अभ्यासले असता, हा भाग त्या काळी घनदाट झाडीचा होता.
 
 
सततची दलदल आणि जलमय प्रदेशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव इथे जास्त होतो. या भागात सतत अगदी ग्रीष्मातसुद्धा पावसाची रिपरिप चालू असे. या भागात माशा, जळवा आणि सापसुरळ्या मुबलक प्रमाणात आढळतात. सापसुरळ्या जास्त घातक असून, मनुष्याला चावताच पक्षाघातदेखील होतो. जळवा या माणसांच्या शरीरातील रक्त शोषणार्‍या असतात. अंदमानच्या कैद्यांना जेव्हा जंगलतोड करायला न्यायचे, तेव्हा कैद्यांच्या शरीरावर ढीगभर जळवा लागलेल्या असायच्या. कैदी रक्तबंबाळ झालेले असायचे. एक दोन नाही, तर मूठभर जळवा ओढून काढाव्या लागत असत. असे भयानक वर्णन सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’मध्ये आढळते.
 
 
अंदमानमध्ये जमाती बर्‍याच होत्या. ‘नेग्रिटो’ वंशाचे लोक ही इथे वास्तव्य करणारी मूळ वनवासी जमात असली तरी जमातीविषयी बरेच वाद-विवाद आहेत. काही जमाती ‘छरियर’, ‘कोरा’, ‘टोबा’, ‘येरे’, ‘केडे’, ‘जुवाई’, ‘कोल’, ‘बोजीग्याब’, ‘बलवा’, ‘बी’, ‘ओंगे’ आणि ‘जारवा’ या होत्या. काही नरभक्षकही होते. प्रसिद्ध संज्ञेनुसार ही वसाहत ‘काळे पाणी’ म्हणून ओळखली जात होती. हे केवळ त्यांना मुख्य भूमीपासून वेगळे ठेवण्याच्या उद्देशानेच नव्हे, तर सिंधुबंदी तोडल्यामुळे सामाजिक बहिष्कारही पडत असे. आपण आता जातीबाहेर टाकले गेलो, ही भावना त्रासदायक ठरत असे. (संदर्भ- अ‍ॅलिसन बॅशफोर्ड, करोलीन स्ट्रेंज, आयसोलेशन - ‘प्लेसेस अ‍ॅण्ड प्रॅकटिसेस ऑफ एक्सल्युजन’, सायकोलॉजी प्रेस, पृष्ठ क्रमांक -३७, २ फेब्रुवारी २०१३)
 
सेल्युलर जेलचा इतिहास
 
अंदमानचा आधुनिक इतिहास साधारणपणे १७७६ पासून चालू होतो. त्या अनुषंगानेच सेल्युलर जेलचा आढावा घेता येतो. इतिहासाचा आढावा घेतल्यास असे आढळते की, १७८९ पासून ‘ईस्ट इंडिया’ कंपनीने गुन्हेगारांना ठेवण्यासाठी अंदमानचा वसाहत म्हणून वापर सुरू केला. ज्याच्यावरून बंदराचे नाव ठेवले आहे त्या लेफ्टनंट अर्चिबाल्ड ब्लेअरने बेटांचे सर्वेक्षण केले आणि येथे गुन्हेगारांसाठी वसाहत स्थापन करण्याची शिफारस केली. पण, १७९६ मध्ये म्हणजे केवळ सात वर्षांतच, रोगट वातावरण आणि उच्च मृत्युदराच्या प्रमाणामुळे वापर बंद करण्यात आला. तसेच सेल्युलर जेलचे बांधकाम जरी १८९६ ते १९०६च्या दरम्यान झालेले असले, तरीही अंदमान बेटाचा वापर इंग्रज १८५७च्या उठावानंतर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी करत असत. अंदमान ही ब्रिटिशांनी गुन्हेगारांना जन्मठेपेवर धाडण्यासाठी स्थापन केलेली वसाहत होती.
 
 
वास्तविक, इंडोनेशियातील सुमात्रा येथील बेनकोलेन येथे ब्रिटिश भारतीयांची पहिली बंदीवानांची वसाहत करण्यात आली होती आणि तेथे ‘मार्लबोरो गड’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ठिकाणी १,७८७ गुन्हेगारांची वसाहत करण्यात आली होती. खून, चोरी, फसवणूक, लबाडी इत्यादी आरोप असणार्‍या आरोपींना ‘त्यांच्या वाईट सवयींपासून सुधारण्यासाठी’ या दूरच्या ठिकाणी नेण्यासाठी या जागी त्यांची रवानगी करत. याचबरोबर विनामूल्य कामगार भरती करून घेणे, हेसुद्धा एक कारण होते. तसेच १८२०च्या दशकात ही वसाहत बंद होईपर्यंत बंगाल आणि चेन्नई प्रांतातील जवळजवळ ८००-९०० गुन्हेगार कठोर परिश्रम, मार्ग तयार करणे आणि अरण्ये साफ करण्यात गुंतलेले होते. शेवटी १८२५ मध्ये ‘मार्लबोरो गड’ बंद झाला आणि पेनांग बेटाची निवड करण्यात आली. मलाक्का, तेनास्सेरिम आणि सिंगापूरमध्येही वसाहती स्थापन करण्यात आल्या होत्या. १८३०च्या दशकात भारतातील जवळजवळ १,१००-१,२०० गुन्हेगारांना सिंगापूरला ठेवले होते.
 
 
अंदमानची वसाहत पुन्हा नंतर कार्यरत झाली. तसेच १० मार्च, १८५८ला अंदमानच्या चँथम बेटावर जवळजवळ ७३३ स्वातंत्र्यसैनिकांची पहिली तुकडी दाखल झाली. अलमा फझ्ली हक खैराबादी आणि मौलाना लियाकत अली हे येथे धाडण्यात आलेले महत्त्वाचे नेते होते. तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला. १८६० पासून, वसाहतीची प्रशासकीय व्यवस्था हळूहळू आकार घेऊ लागली, ज्यात जमीन लागवड, कर आकारणीची धोरणे, चलन वापर आणि सैनिकी व पोलीस दलाचे नियम आहेत.
१८६४ ते १८६७ दरम्यान अंदमानातील वायपर बेटावर पहिले कारागृह आणि फाशीचा स्तंभ बांधण्यात आला. तसेच ८० वर्षांहून अधिक काळ रॉस बेट (आताचे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट) हे मुख्यालय होते, वसाहतीचे अधिकारी येथेच राहत होते. १८६३ साली रेव्हरंड हेन्री फिशर कोर्बीन हे अंदमानला आले. त्यांनी ‘अंदमानिज होम’ चालू केले होते. (संदर्भ- जॉर्ज वेबर, ‘पायोनिअर बायग्राफीज ऑफ दि ब्रिटिश पिरेड टू १९४७’, एपेंडिक्स-ए)
 
 
नंतर अंदमानवर २०० गुन्हेगार पाठवले गेले. जेलर डेव्हिड बारी आणि मेजर डॉ. जेम्स पॅट्टीसन वॉल्कर हा लष्करी डॉक्टर आणि वसाहतीचा पहिला अधीक्षक होता. आधी तो आग्रा कारागृहात वॉर्डर होता. त्याने ८० स्वातंत्र्यसैनिकांना एकाच दिवशी फाशी दिली होती. एप्रिल १८६८ला कराचीहून ७३३ जण अंदमानला आणले गेले होते. (‘हिस्ट्री ऑफ अंदमान सेल्युलर जेल’, आर्काईव्ह, १८ जानेवारी, २००७.)
 
 
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अंदमानच्या गुन्हेगार वसाहतीमध्ये वेगवेगळ्या प्रदेश, धर्म आणि जातींमधील जवळपास १२ हजार भारतीय गुन्हेगार होते. यात तीन हजारांहून जास्त १८५७च्या युद्धातील स्वातंत्र्यसैनिक, वहाबी चळवळीतील बंडखोर, वासुदेव बळवंत फडकेंचे अनुयायी आणि १८९१च्या अँग्लो-मणिपूर युद्धानंतर मणिपूरच्या राजघराण्याचे सदस्य यांचा समावेश होता. बेटावर पसरलेल्या विविध वसाहतींमध्ये या प्रत्येक गटाला ठेवण्यात आले होते, तर १८६०च्या दशकापासून महिला गुन्हेगारांनाही येथे स्थलांतरित करण्यात आले होते. १८७२ साली वसाहतीला भेट देण्यास आलेल्या व्हाईसराय लॉर्ड मेयोवर अंदमानला धाडण्यात आलेला वहाबी गुन्हेगार शेर अलीने एक धाडसी झेप घेऊन आणि त्याच्यावर वार करून त्याला ठार मारले होते. १८७४ पासून गुन्हेगारांसाठी प्रशासनाने सूट देण्याची पद्धत ठेवण्यात आली होती. जर एखाद्या जन्मठेपेच्या गुन्हेगाराची वर्तणूक चांगली असेल, तर त्याची २० ते २५ वर्षांत सुटका करण्यात येई.
 
 
काळ्या पाण्याची शिक्षा झालेले देशभक्त
 
काळ्या पाण्याची शिक्षा अनेक देशभक्तांना भोगावी लागली होती. सावरकरांच्या आगमनाच्या तीन वर्षांपूर्वी, १९०८च्या अलिपूर बॉम्ब प्रकरणातील दोषी व्यक्तींना अंदमानात पाठवण्यात आले होते. पण, त्यातील बहुतांश जण जन्मठेपेवर पाठवण्यात आले नव्हते. वास्तविक, १९०६ पासून अशा गुन्हेगारांना अंदमानला धाडणे स्थगित करण्यात आले होते. परंतु, १९१०च्या अखेरीस त्यापैकी काही जणांना अंदमानात पाठवण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकरून ते मुख्य भूमीपासून दूर राहू शकतील. यामागे हेतू हाच होता की, ते इतर क्रांतिकारकांना प्रभावित करू शकणार नाहीत.
 
 
राजकीय बंदीवानांमध्ये सावरकरांचे बंधू गणेश दामोदर सावरकर, वामनराव जोशी यांचा समावेश होता. अलिपूर बॉम्ब प्रकरणातील (किंवा माणिकतोळा कटातील) उल्हासकर दत्त, बारिंद्रकुमार घोष, उपेंद्रनाथ बॅनर्जी, इंदुभूषण रॉय, हेमचंद्र दास, बिभूती भूषण सरकार, हृषीकेश कांजिलाल, सुधीर कुमार सरकार, अबीनाशचंद्र भट्टाचार्य आणि बिरेंद्रचंद्र सेन हे होते; ‘स्वराज’ वृत्तपत्राशी संबंधित संयुक्त प्रांतातील राम हरी, नंदगोपाळ आणि होतीलाल वर्मा आणि ‘युगांतर’शी संबंधित रामचरण पाल हे होते. तेथे सच्चिंद्रनाथ सन्याल, पुलिन दास, नानी गोपाल इत्यादी सुमारे १०० राजकीय बंदीवान होते.
 
 
असे हे काळे पाणी... याचा इतिहास किती तरी क्रूर, अमानवीय शिक्षा आणि मृत्यूला कवटाळलेल्या बंदीवानांच्या कहाण्या, जावरा जमात, नरभक्षक टोळ्या यांनी भरलेला आहे. अंदमान हे ऐतिहासिक धाग्यांनी भारताला जोडले गेलेले आहे. ‘काळे पाणी’ हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय समस्त भारतीयांचा आहे. इंग्रजांच्या अत्याचाराच्या विरोधात ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात आपली आहुती दिली, त्यातील अनेकांनी ‘काळे पाणी’ येथे शिक्षा भोगली होती. सगळ्या यातना सहन करून इंग्रजांना परास्त करणार्‍या सावरकरांनी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा कसे जगावे, याची शिकवण दिली. मृत्यूला शरण जाण्याचा पर्याय दिसत असतानाही जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर परिस्थितीला नमवता येते हे दाखवून दिले. अंदमान आणि सेल्युलर कारागृहाचा इतिहास जनसामान्यांमध्ये अमर झाला तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळेच!
 
 
- रूपाली कुळकर्णी-भुसारी
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.