‘माझी जन्मठेप’ पुस्तकाचे महत्त्व

27 May 2021 17:57:38

XCHG_1  H x W:
 
भारतातील बर्‍याच देशभक्तांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्याची नावे आपल्याला मिळतात. परंतु, ती शिक्षा कशा प्रकारे दिली जायची, किती भयाण प्रकारे दिली जायची, याचे वर्णन असणारे पुस्तक म्हणजे ‘माझी जन्मठेप.’ असं म्हणतात की, ज्या विद्यार्थ्याला आत्महत्या करावीशी वाटत आहे, त्याने एकदा ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक जरूर वाचावे, ती व्यक्ती आयुष्यात परत कधीही ‘आत्महत्या’ हा विचारसुद्धा करणार नाही. असे काय आहे या पुस्तकात? पाहूया...
‘माझी जन्मठेप’ हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अर्थात तात्याराव सावरकर यांचे काळजाचा ठाव घेणारे पुस्तक. स्वातंत्र्यवीर सावरकरांना पहिली जन्मठेपेची शिक्षा २४ डिसेंबर, १९१०ला, तर दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा ३० जानेवारी, १९११ला झाली.
पुस्तकातील आत्मवृत्त
कोठडीतला पहिला आठवडा वाचताना तर अक्षरश: अंगावर काटा येतो. जमादार सात क्रमांकाच्या चाळीत त्यांना बंद करण्यासाठी निघाला होता. वाटेत एक हौद लागला. ‘यात स्नान करा’ आदेश आला. पण, भिजवायचे काय? ‘ही घ्या लंगोटी.’ जमादारासमोर कपडे काढून लंगोटी नेसावी लागली. पण, स्नान कसले? जमादार म्हणाला, “मी ‘लेव पाणी’ म्हटले कीच वाकायचे, एक कटोरा पाणी घ्यायचे. मी ‘अंग मळा’ म्हटले कीच अंग घासायचे आणि ‘और लेव पाणी’ म्हटले की फक्त दोन कटोरे पाणी!” बस, तीन कटोर्‍यात स्नान. हे काळे पाणी आहे.” अहो ही काय लंडन, पॅरिसमधली आंघोळ होती का? ‘मी अंदमानीश बाथची गंमत अनुभवली,’ असे सावरकर लिहितात, तेव्हा दुःख म्हणजे काय, याचा करुण अनुभव मनात दाटतो.
 
अरुंद कोठडी, दरवाजाच्या मागच्या भिंतीला सात-आठ फुटांवर एक झरोक्यासारखी खिडकी, सावरकरांनी अनेक रात्री कोठडीत बसून काढल्या. ज्या कोठडीत तात्याराव सावरकरांसारखे महान देशभक्त व्यक्तिमत्त्वाने शिक्षा भोगली, ते अंदमान आज राष्ट्रीय स्मारक झालं आहे. त्या कोठडीत एका कोपर्‍यात मडकं होतं, कारण नैसर्गिक विधीसाठी दिवसातून एकदाच शौचालयात सोडले जात असे, मडकं भरलं तर कैदी भिंतीवर हे नैसर्गिक विधी करीत. दिवसभर कोलू ओढून अंग पिळवटून येई, पोटाचे आतडे ताठले जात, भोवळ येई, रात्री कोठडीत अंग टाकले की गाढ झोप लागे. सावरकर म्हणतात, “झोपेचे तेवढे सुख मला अंदमानात मिळाले.” म्हणजे अंदमानात त्यांना गाढ झोप लागत असे.
 
गुन्हा काय? मातृभूमीवर प्रेम केले आणि मातृभूमीच्या शृंखला तोडण्यासाठी, तिला बंधमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. ब्रिटिशांच्या जोखडातून तिला सोडविण्यासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या स्वातंत्र्यवीरांना खूप यमयातना भोगाव्या लागल्या. अंगातील संपत चाललेली सहनशक्ती, पावसात काम करून ओलेचिंब झालेले कपडे, थंडीने सारखे कुडकुडणारे अंग अशा स्थितीत एका हातात भिजून चिंब झालेल्या पोळ्या, पावसाने भरलेली आंबटीची भांडी. हे हाल सोसताना प्रतिकार केला तर अधिक हाल, छळ, मार, जेवण मिळत नसे, तसेच उभे राहिल्यास मग ऑर्डर येई, “उठो, खाना हो गया, चलो!” मरा उपाशी, त्यांना काय पडलीय?
 
आत्महत्या तर तुरुंगात सततच्या. इंदुभूषण रॉय यास ‘माणिकतोळा कटा’त तरुण वयात दहा वर्षांची शिक्षा झाली होती. पण, इथल्या त्रासास, छळास कंटाळून त्याने काम करण्यास साफ नकार दिला. सावरकरांनी त्यास धीर देण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केला, काल जो आपल्याशी बोलता बोलता कोठडीत बंद झाला होता, तो इंदुभूषण सकाळी पाहतात तो स्वतः फाशी खाल्लेला, मान मोडलेली, जीभ निघालेली, वाचताना ऊर फाटून जातो.
 
XCHG_1  H x W:
 
ज्या तेलाच्या घाण्याला बैलाकडूनसुद्धा इतके तेल काढून घेतले जात नव्हते, तिथे अंदमानातील कैदी कोलू फिरवून ३० पौंड तेल काढत. त्यात काहीही सवलत नव्हती. ही भयानक शिक्षा भोगताना शरीराला असह्य अशा वेदना होत. या शिक्षेपेक्षा जीवनच नको, असे कधीकधी कैद्यास वाटे. “तापाचे औषध आहे का? रेचाचे औषध आहे का?” म्हणून एका बंदीवानाने दुसर्‍या बंदीवानास दबलेल्या आणि त्रासिक स्वरात विचारले, म्हणजे त्या वाक्याचा अर्थ ताप घालविणारे औषध असा होत नव्हता. अंदमानी जगतात रोगाचे औषध म्हणजे रोग उत्पन्न करणारे औषध असा अर्थ होई. पांढर्‍या कण्हेरीच्या मुळ्या उगाळून घेतल्याने मनुष्य भयंकर तापाने फणफणतो, गुंजेच्या बिया उगाळून खाल्ल्याने रक्ताचे रेच सुरू होतात, घावात सुईने शिवून, भिजवलेला दोरा ओवून ठेवला की घाव सडून सहा महिने खितपत पडता येते, ही माहिती प्रत्येकाच्या तोंडी असे.
 
ती खरी की खोटी, असे विचारता बहुतेक लोक ती स्वानुभवाने अनुभवली आहे म्हणून सांगत. आत कोलूच्या आणि बाहेर लाकूडतोड, जंगलकाट, विणकाम इत्यादी कामांच्या भयाने या बाधक मुळ्या आणि औषधे खाऊन, आपल्या पायावर आपणच घाव करून, त्यात तो घाव सडविणारे दोरे घालून, सुईने आपल्या गळ्यास टोचून त्या रक्ताच्या गुळण्याने रक्ताच्या उलट्या वा थुंकीत छातीतले रक्त येत आहे, असे निमित्त करून किंवा आपणास लागलेले म्हणून पांघरलेले वेड खरे आहे, असे भासविण्यासाठी विष्ठा आणि मूत्र तोंडास फासून आणि क्वचित खाऊनही एकदाची डॉक्टराची समजूत काढीत की, आपण आजारी वा वेडे आहोत, यासाठी बंदीवान धडपडत असत. जेणेकरून ती भयाण कोलू फिरवण्याची शिक्षा कमी होईल.
 
देशाच्या स्वातंत्र्यासाठी दोघा सावरकर बंधूंनी काळे पाण्याची शिक्षा भोगली. कारागृह अधीक्षक (जेलर) बारीचा क्रूर छळ सहन केला; कोलू ओढणे, छिलका कुटणे, दंडाबेडी, खडाबेडी यांसारख्या भयानक शिक्षा भोगल्या. अर्धवट कच्चे अन्न वर्षानुवर्षे खाल्ल्यामुळे दोघा बंधूंची पचनशक्ती कायमची बिघडली. पण, दोघेही बंधू त्या सर्व यातनांना पुरून उरले, इतकेच नाही, तर त्या यातना सहन करत असतानाही सावरकरांना सुरुवातीला नोट्स काढण्यासाठी कागद ठेवण्याची परवानगी नव्हती.
 
अशा परिस्थितीत त्यांनी ‘कमला’सारखे मराठीतील महाकाव्य रचले. त्यासोबतच निरक्षर बंदीवानांना साक्षर करणे, ग्रंथालय उघडणे, पुस्तके जमवणे, तिथे कमी काळासाठी आलेले बंदीवान त्यांना विविध भाषा, अर्थशास्त्र, इत्यादी विषयाचे शिक्षण देणे, अस्पृश्यता-निर्मूलन असे महान समाजकार्यदेखील केले. इतिहासातील विविध उदाहरणे सांगून स्वतःबरोबर इतर सर्व कैद्यांचे मनोधैर्य वाढवत असत. खिडकीला असलेली जाळी म्हणजे कारागृहातील टेलिफोन असे वापरून खाली असलेल्या व्यक्तीशी संवाद साधणे, पायातील बेड्या वाजवून बोलणे, असे प्रयोग केल्याचे सावरकर लिहितात.
 
अंदमानातील शेवटचे दिवस आले असता, कनिष्ठ बंधू भेटावयास आले. ज्येष्ठ बंधूंची प्रकृती अगदी थकत आली होती. अशा वेळी सुटकेची आशा मनात क्षीण असताना असे वाटे की, ही भेट बहुधा शेवटचीच असणार. त्यांनी कनिष्ठ बंधूस “तू शेवटची बातमी ऐकण्यास सिद्ध राहा” हा निरोप दिला. पण, पाहा नियतीचा जाहीरनामा. सावरकर लिहितात -“१९११व्या वर्षी बंद झालेले ते त्या कारागृहाचे दार १९2१ या वर्षी परत एकदा करकरले. त्या जबड्याचे ते तोंड परत एकदा उघडले आणि आम्ही दोघेही बंधू जीवंतपणी आतून बाहेर पडलो.” अंदमानमधून मुंबईला पाठविण्याकरिता ते ‘महाराजा’ नौकेवर चढले तो दिवस २ मे, १९२१.
 
सावरकर अंदमानातून निघताना निरोप देण्यासाठी अनेक लोक दबा धरून बसले होते. शिपायांच्या पहार्‍यात समुद्राकडे दोघे बंधू चालले होते. इतक्यात एक बंदी एकाएकी पुढे झाला, शिपायांना न जुमानता चाफ्याच्या फुलांची फुलमाळ त्या सर्व बंदीवानांच्या वतीने सावरकरांच्या गळ्यात घातली. शिपाई आरडाओरडा करतायत तोवर सावरकरांच्या पायावर डोके ठेवून निघूनही गेला. हा प्रसंग खरंच अंगावर शहारे आणतो.
 

XCHG_1  H x W:
 
यानंतर रत्नागिरी येथील बंदीशाळेमध्ये सावरकरांना ठेवण्यात आले. सुरुवातीला रत्नागिरी येथील काळ खूप अवघड गेला, असं सावरकर सांगतात. शेवटी जी काही सूट अंदमानात मिळाली होती, जेवण थोडं बरं जे मिळत होतं, ते सर्व रत्नागिरीत बंद झाले. वर एकही मनुष्य जवळ नाही, कागद-पेन्सिल नाही, पुस्तके नाहीत. शिक्षा पुन्हा पहिल्यापासून भोगावी लागावी, तसे स्थित्यंतर झाले. पुन्हा निश्चय केला कवितांचे सूत्र मनात आठवले, रत्नागिरीपर्यंतच्या प्रवासात त्यांच्या कारावासाची कठोर कथा संकलित करून त्याचे भागदेखील मनात करून झाले. कारागृहातील आजूबाजूच्या लाल विटांच्या तुकड्याने मुख्य मुद्दे लिहून ठेवण्याचं काम दोन-तीन महिन्यांत झालं आणि त्याच टिपणांमधून मग विस्तृत ग्रंथ सिद्ध केला, तो ग्रंथ म्हणजेच ‘माझी जन्मठेप’ होय.
 
रत्नागिरीनंतर काही दिवसांनी येरवड्याच्या जेलमध्ये सावरकरांना हलवण्यात आले. या दोन्हीही कारागृहात समाजकारण, शुद्धी, राजबंदीना विविध प्रकारचे विषय शिकवणे, विविध क्रांतिकारकांची चरित्र सांगणे, स्वतःचे विविध विषयांवर चिंतन, लिखाण असे उपक्रम सुरू होते. अंदमानपासून नेहमी कोणी न कोणी येऊन सांगे की, “बडे बाबू आपको छुडाने वाले हैं।” किंवा “सावरकर, आता तुम्हाला सोडतील.” परंतु, दर वेळी वाटे की, गेल्या बोलण्याप्रमाणे हे असेच वायफळ असेल. परंतु, यावेळी ६ जानेवारी, १९२४ला पर्यवेक्षक निरोप घेऊन आला, “सावरकर, तुम्ही सुटलात!” तेच सर्व जण आनंदून अभिनंदन करू लागले. काही अटींवरून तेथून सुटका झाली आणि जन्मठेपेच्या सीमेस उल्लंघन करून जीवनाच्या सीमेत सावरकर परत आले.
 
मागील वर्षी आणि आता यावर्षी ‘लॉकडाऊन’मुळे बर्‍याच जणांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पण, यापेक्षाही भयावह परिस्थितीमध्ये अंदमानमध्ये आपल्या क्रांतिकारकांनी अनेक वर्षे काढली आहेत, परिस्थिती किती भीषण होती आणि त्यावर बंदीवान काय उपाय करत, त्यांची मानसिकता काय असेल हे खरंच सद्यःपरिस्थितीत सर्वांनीच वाचायला हवं. आताची परिस्थिती भीषण असली तरी अंदमान इतकी नक्कीच भयंकर नाही, हे लक्षात येते.
 
आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवण्याचे ध्येय, आपल्या देशाविषयीचे उपजत कर्तव्य हे वैयक्तिक स्वार्थापेक्षा कैकपटीने श्रेष्ठ असते, हे या पुस्तकात दिसून येते. आपले ध्येय उदात्त असले की, कितीही अडचणी येऊ देत, त्यावरदेखील आपण विजय मिळवू शकतो. हे सर्व लिहित असताना वारंवार सावरकरांचे शब्द आठवतात....
 
काल स्वयं मुझसे डरा हैं,
मैं काल से नही।
काले पानी का कालाकोट पीकर,
कल से कराल स्तंभो को झकझोर कर,
मैं बार-बार लोट आया हूँ,
और फिर भी मैं जीवित हूँ।
हारी मृत्यू हैं, मैं नही..।
- ऋतुजा देशमुख
Powered By Sangraha 9.0