आता साहेबांनी ‘तोक्ते’ चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना ‘पॅकेज’ जाहीर केले. ‘पॅकेज, पॅकेज’ म्हटलं, नाही तर लोकांना ‘पॅकेट’ वाटतं. काय म्हणता, चहासोबतच्या बिस्कीटचे पॅकेट. नाही नाही तर हे ‘पॅकेज’ आहे ‘पॅकेज.’ ‘तोक्ते’ चक्रीवादळामध्ये ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांना पैसे मिळणार पैसे! मदत मिळणार? काय म्हणता, कधी मिळणार? तर थांबा! नसत्या चौकशा करू नका. ‘पॅकेज मिळणार आहे’ म्हटलं नाही, मग उगीच कधी, केव्हा, असे प्रश्न विचारून त्रास देऊ नका. तुम्ही हे असं करता म्हणून मग त्यांना काही तुमच्यासाठी करावेेसे वाटत नाही. धीर धरा. आज जाहीर केले हे काय कमी आहे? असो. तर ‘तोक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या मदतीमुळे अगदी कोरोनाकाळातही जीवाची पर्वा न करणार्या रिक्षावाल्या बांधवांचा मात्र सबुरीचा बांध फुटत चालला आहे. ते दीड हजार कुठे, कधी कसे मिळणार याबद्दल चौकशी करून करून पदरी निराशाच पडली. पण, वाकणार नाही, असा मराठीबाणा जपणारे मराठमोळे रिक्षावाले बंधू पण त्यात आहेत बरे. रिक्षावर साहेबांचे चित्र आहे, ‘आवाज कोणाचा’ असे पण लिहिलेले आहे. त्यामुळे आपल्याला दयाळू साहेबांनी जाहीर केलेली मदत मिळणारच मिळणार, असे रिक्षाबांधवांना वाटत होते. पण, हाय रे दैवा, रिक्षा बांधवांना ती मदत काही मिळाली नाही. २०१९ पूर्वी बांधाबांधावर जाऊन आम्ही सत्तेत आल्यावर तुम्हाला इतकी मदत करू, तितकी मदत करू म्हणणारे जेव्हा सत्तेवर आले, तेव्हा कोरोनाकाळात आणि ‘निसर्ग’ वादळात उन्मळून पडलेल्या महाराष्ट्राला मदत करण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे आता ‘तोक्ते वादळामध्ये आता मदत कशी मिळेल? काही जळकुटे लोक म्हणतात की, “साहेबांनी चक्रीवादळापेक्षा तुफान वेगात कोकण दौरा केला. दौरा जर इतका जलद असेल, तर मग मदत त्याहीपेक्षा जलद असेल वाटते.” जाऊ दे, ते साहेबांवर जळतात. आमच्या साहेबांचे कामच असे सुपरफास्ट. स्थगिती असो की, फेसबुक लाईव्ह...
संस्कृती रक्षण
“आम्ही लक्षद्वीपच्या सोबत आहोत” इति प्रियांका गांधी आणि राहुल गांधी. पुढे हे दोघे भाऊ-बहीण म्हणतात की, “केंद्र सरकारने लक्षद्वीपची संस्कृती नाश करण्यासाठी पाऊल उचलले आहे. लक्षद्वीपची संस्कृती जपण्यासाठी आम्ही लक्षद्वीपसोबत आहेात. आता यावर लक्षद्वीपच्या प्रशासनाचे म्हणणे आहे की, लक्षद्वीपमधील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर अतिक्रमण रोखण्यासाठी आम्हाला कारवाई करावी लागते. लक्षद्वीपमध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नियम करावेच लागतात आणि पाळावेच लागतात. सध्या लक्षद्वीपमध्ये समुद्रकिनारी असलेली बेकायदेशीर घरं, धंदे तोडण्याची प्रशासनाने मोहीम सुरू केलेली आहे. बरं ही घरं आणि धंदे काही पुरातन संस्कृतीचा ठेवा नाहीत. मग ही बेकायदेशीर घरं तोडल्यावर प्रियांका आणि राहुल गांधी यांना राग का यावा? या दोघांच्या म्हणण्यानुसार लक्षद्वीपमध्ये समुद्रकिनारी असलेली घरं, वस्त्या तोडणे हा कू्ररपणा आहे. पण, वस्ती बेकायदेशीर असली तरी तोडू नये ही कोणती संस्कृती आहे? बेकायदेशीरपणे समुद्राला लागून वसलेल्या वस्त्या या सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहेत हे सांगायलाच हवे का? अजमल कसाब मुंबईत कसा आला, हे ज्यांना माहिती आहे, ते लक्षद्वीपच्या समुद्रकिनार्याला लागून असलेल्या बेकायदेशीर वस्त्यांचे कधीच समर्थन करणार नाहीत. लक्षद्वीपच्या नव्या नियमानुसार तिथे गोमांस खरेदी-विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. पशुसंवर्धन व्हावे म्हणून हा कायदा तिथे करण्यात आला आहे. तसेही तिथले ८० टक्के लोक मासेमारी करतात. मत्स्याहार हा तेथील जीवनाचा आणि जेवणाचा प्रमुख भाग आहे. पण, प्रियांका आणि राहुल गांधींना लक्षद्वीपमध्ये गोमांसबंदी केली म्हणून तिथली संस्कृती धोक्यात आली, असे वाटत आहे. या देशात बहुसंख्य हिंदू आहेत ते गोमांस खात नाहीत. अपवाद असू शकतो. पण, त्यांच्या संस्कृतीला सपशेल विरोध करून तिथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘बिफ पार्टी’ केली आणि करतात. आता लक्षद्वीपमध्ये काँग्रेसने ‘बिफ पार्टी’ आयोजित यात शंका नाही. काय म्हणावे काँग्रेसी आणि त्यांचे नेते असलेल्या प्रियांका आणि राहुल गांधी यांच्या संस्कृती रक्षणाला!!