एकदा का आपल्या मनात काही गाठी बसल्या की, त्या सामान्यपणे सुटणं अवघड आहे. अगदी सत्य वेगळे असले तरीसुद्धा सुदैवाने आपली मतं बदलता येणं अशक्य नाही, पण खूप कठीण आहे.
गेल्या दीड वर्षांत आपण जगातले सगळ्यात त्रासदायक आणि विषण्ण करणारे दिवस पाहिले आणि पाहतोय, असे म्हणायला हरकत नाही. कोरोनाच्या या काळात इतके विषण्ण झालेले, हतबल झालेले जग आज ८०च्या घरात पोहोचलेल्या ज्येष्ठ व्यक्तींनी यापूर्वी पाहिले नव्हते. पण, याच काळात आपण अनेक विषयांवरची अगदी जगण्यावरची ते मृत्यूसंबंधित अनेक मते पाहत आहोत, ऐकत आहोत. आपण ती मते वा अभिप्राय ना मोजू शकणार, ना लक्षात ठेवू शकणार. कारण, आपल्या सभोवताली इतके अभिप्राय आपल्याला सापडतात, अगदी घटस्फोटापासून ते महागाईपर्यंत किंवा धर्मापासून ते नात्यांपर्यंत, अगदी जिथे बोट दाखवाल त्या वस्तूबद्दलसुद्धा अनेकाविध अभिप्राय आपण पाहतो. प्रत्येकाचा सूर असा असतो की, ‘माझ्या मनात असं आहे किंवा मतप्रदर्शन करायचा मला अधिकार आहे.’ तसं बघायला गेलं तर हे खरंच आहे की, प्रत्येकाला आपापले मत मांडायचा अधिकार आहेच. कारण, आपण सगळेच या पृथ्वीतलावर आपल्या स्वातंत्र्याला महत्त्व देतो आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल विशेष पोटतिडकीने बोलतो. आपण एखाद्या गोष्टींवर वा विचारांवर जे मत ठामपणे मांडतो, त्यावर विश्वास ठेवायचा, आपल्याला नक्कीच हक्क आहे.
बर्याचदा असंही होतं की, आपण एखाद्याला त्याच किंवा एखाद्या प्रसंगाबद्दलच म्हणा वा एखाद्या व्यक्तीबद्दलच म्हणा, मत बदलायचा किंवा ते कसं चुकीचं आहे, हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण, कितीही चुकीचं असलं, तरी तुमची चर्चा जी तुम्ही जीव ओतून केलेली असते, त्याचा या मंडळींवर फारसा परिणाम होत नाही. ते आपल्याच मतांशी ‘फेव्हिकॉल’च्या पेस्टने जणू चिकटून असतात. तुमची चर्चा जेव्हा संपत येते, तेव्हा तुम्ही कुंठित झालेले असता. तुमचं त्या व्यक्तीबरोबर जे काही नातं असतं, ते तणावाखाली आलेलं असतं. राजकारण वा जातिधर्म, आरक्षण हे असे काही विषय ज्यामध्ये लोकांची मतं पांढरी तरी असतात, नाहीतरी काळी तरी असतात. त्यात मध्ये राखाडी झोनमध्ये यायची तयारी असलेले ‘प्रगल्भ’ महाभाग सापडणं खूप कठीणच आहे. लोकांची मतं बदलणं किंवा मन बदलणं इतकं कठीण का आहे, हा प्रश्न लोकांच्या मनात सतत आहे. गेल्या एक-दीड वर्षात कोरोनाच्या उपस्थितीत तो आपल्या जाणिवेत आला इतकेच.
या प्रश्नांचा ‘इम्पॅक्ट’ जेव्हा एखाद्याच्या शीलावर शिंतोडे उडवले जातात तेव्हा तो जास्त महत्त्वाचा ठरतो. मग तो दुसर्याच्या बाबतीत असो किंवा स्वतःच्या बाबतीत असो. अर्थात आपण असाही विचार करतो की, लोकांची मते ही त्यांच्या नैतिक पातळीचा बॅरोमीटर आहेत, पण अगदी खरे सांगायचे तर या अशा पकड घेतलेल्या अभिप्रायांमध्ये अनेक घटक कारणीभूत आहेत. मानसशास्त्राच्या संशोधनात असे म्हटले आहे की, एकदा का आपल्या मनात काही गाठी बसल्या की, त्या सामान्यपणे सुटणं अवघड आहे. अगदी सत्य वेगळे असले तरीसुद्धा सुदैवाने आपली मतं बदलता येणं अशक्य नाही, पण खूप कठीण आहे.
आपल्यापैकी बर्याच जणांना आपल्या धारणा, विश्वास आणि श्रद्धेच्या भावूक जागा घट्ट पकडून ठेवायला आवडतात. कारण, त्यामुळे जणू आपण आपल्या जगाला घट्ट पकडून ठेवू शकतो. कारण, या जगामध्ये आपण आपल्याबरोबर काही इतर जणांचा कळप वा गु्रप जमविलेला असतो, तो आपल्याबरोबर असतो. आपल्याला त्यामुळे सुरक्षित वाटतं, ज्याक्षणी तुम्ही त्या गु्रपमधून बाहेर पडायचं ठरवता, तेव्हा तुम्ही एकटे पडाल याची भीती तुम्हाला वाटते. केवळ एकटे पडला हीच भीती नाही, तर त्या श्रद्धांमधून बाहेर पडलात, तर तुमचा कळप तुम्हाला खोटं ठरवेल ही भीती अधिक त्रासदायक आहे. कळपातचं असणं हे माणसाला अधिक सुखदायी वाटत.ं म्हणून व्यक्तिगत पातळीवर एवढा मोठा धोका पत्कारायची कुणाची तयारी नसते. कधी कधी माणसाच्या मनात नवीन जग वा नवीन विचार ग्रहण करायची सुस्ती असते. बहुतेक लोक नवे विचार, बदल वा अस्वस्थ करणारी माहिती टाळायचा प्रयत्न करतात, किंबहुना नाकारतात. त्यांची आपले विचार, मत, अभिप्राय नव्या कपड्यांत गुंडाळायची तयारी नसते. त्यांना जुन्यातच स्वस्थ वाटतं. नवीन जगाला स्वीकारायची त्यांची तयारी नसते म्हणूनच धार्मिक मत आणि परंपरा सहजासहजी बदलताना दिसत नाहीत. इतकेच काय वकीलसुद्धा आपले कायद्याविषयीचे पारंपरिक ज्ञान जे सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित आहे, ते सहजपणे बदलताना दिसत नाही.
- डॉ. शुभांगी पारकर