पुणे : भाजपा युवामोर्चा सचिव अॅड. प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी शनिवारी सकाळी पुणे येथून बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले आहे. गावडे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.भाजपा युवा मोर्चाचे सचिव अॅड. प्रदीप गावडे यांना वांद्रे पश्चिम, सायबर शाखेतर्फे बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांना मुंबई पोलिसांनी शनिवारी सकाळी पुणे येथून ताब्यात घेतले असून त्यांना आता मुंबई येथे नेण्यात आहे. मात्र, गावडे यांना ताब्यात घेताना पोलिसांना त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही अथवा एफआयआरची प्रतदेखील दिलेली नाही. त्यांच्याविरोधात कलम १५३, १५३अ, २९५, ४६९, ५०० आणि ५०३ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.
शरद पवार यांच्यावर टीका केल्यानेच कारवाई – गावडे
याविषयी अॅड. प्रदीप गावडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांना राजकीय हेतूने ही कारवाई होत असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहीत पवार यांच्यावर टिका केल्याने माझ्याविरोधात ही कारवाई होत आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित ५४ सोशल मिडीया प्रोफाईलविरोधात मी तक्रार दाखल केली होती, त्यामुळे मला लक्ष्य करण्यात येत असल्याचे गावडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने १३ मे रोजी एफआयआर दाखल केल्याचीही माहिती गावडे यांनी दिली.