‘पुस्तकांशी मैत्री करा’ हे बोधवाक्य घेऊन गेली ३५ वर्षे काम करणारे डोंबिवलीतील ‘फ्रेंड्स’ लायब्ररीचे पुंडलिक पै यांचा प्रवास जाणून घेऊया.
पुस्तकांच्या दुकानात काम करीत असतानाच पुस्तके वाचण्याचा छंद पुंडलिक पै यांना जडला. नोकरी करायची नाही, हे तर त्यांनी मनाशी अगदी पक्के केले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले नाहीत. त्याचवेळी त्यांच्या मनात ग्रंथालय सुरू करण्याचा विचार डोकावला आणि पुढे त्यांनी या उदात्त विचाराला मूर्त स्वरूप दिले. एकीकडे ‘फ्रेंड्स’ लायब्ररी आणि दुसरीकडे ‘फ्रेंड्स’ पुस्तकांचे दुकान असा डोलारा ते समर्थपणे सांभाळू लागले. तेव्हा, एकीकडे वाचनसंस्कृती लोप पावत आहे, अशी ओरड होत असताना तिच्या वृद्धीसाठी विविध कल्पक योजना राबविणारे पुंडलिक पै सर्वार्थाने कौतुकास पात्र आहेत.
कर्नाटकातील कुंदापूर या छोट्याशा गावात पै यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण कुंदापूर येथेच झाले. कुंदापूर सोडून ते १९७७ मध्ये डोंबिवलीत वास्तव्यास आले. पण, डोंबिवलीत कन्नड शाळा नसल्याने माध्यमिक शिक्षण त्यांनी मुलुंड येथे घेतले. डोंबिवली ते मुलुंड असा प्रवास करीत दहावीपर्यंतचा टप्पा गाठला. त्या काळात महाविद्यालयीन शिक्षणाच्या फारशा सोयी उपलब्ध नव्हत्या. ‘के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय’ हे डोंबिवलीतील पहिले महाविद्यालय. पै यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी याच महाविद्यालयात प्रवेश घेतला. पेंढरकर महाविद्यालयातील पदवीची परीक्षा देणारी १९८६ मध्ये पहिली बॅच होती. या पहिल्या बॅचमध्ये पैदेखील होते. पण, त्यांचे लक्ष्य ठरलेले होते आणि ते दि. २२ मे, १९८६ रोजी प्रत्यक्षात साकारत पै यांनी ‘फ्रेंड्स’ लायब्ररीचा शुभारंभ केला.
पै यांना तीन बहिणी आणि चार भाऊ. पै लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने आईने लोणचे, पापडांची विक्री करत मोठ्या कष्टाने मुलांना वाढविले. शिक्षण दिले. हळूहळू पै यांच्या दोन बहिणी शिक्षण पूर्ण करून अर्थार्जन करू लागल्या. त्यामुळे त्यांच्या आईसाठी त्या मोठ्या आधार ठरल्या होत्या. पै यांच्या भावाचे पुस्तकांचे दुकान असल्याने तिथे काम करतानाच त्यांची पुस्तकांशी जवळीक निर्माण झाली. पै यांची मातृभाषा कन्नड असली, तरी ते अगदी अस्खलित मराठी बोलतात. घरात कोकणी भाषा बोलत असल्याने त्यांना मराठी बोलणे सहज शक्य झाले. त्यांचा मित्रपरिवारही मराठी असल्याने त्यांनी दहावीत ‘२१ अपेक्षित संचा’चाही मराठीतून अभ्यास केला होता. मात्र, दहावीचे पेपर लिहिताना त्यांनी कन्नड भाषेचा उपयोग केला होता.
पै यांनी सुरुवातीला १०० पुस्तके घेऊन ग्रंथालय सुरू केले. त्यांच्या ग्रंथालयाचा पसारा आता खूपच वाढला आहे. साडेतीन लाख पुस्तके त्यांच्या ग्रंथालयात आहेत. केवळ पुस्तकांचे नव्हे, तर मासिके, नियतकालिके असा लक्षणीय संग्रह ‘फ्रेंड्स’ लायब्ररीने जमविला आहे. ग्रंथालयाच्या चार शाखा आहेत. तसेच ‘ऑनलाईन’ पुस्तकांची मागणी असणारे दोन हजार वाचक ग्रंथालयाचे सभासद आहेत. ‘ऑफलाईन’मध्ये सहा हजार वाचक आहेत. ‘ऑफलाईन’मध्ये बालवाचकांची संख्याही समाधानकारक आहेत. २००९ मध्ये ग्रंथालयाचे ‘डिजिटलायझेशन’ करण्यात आले आहे. त्यामुळे वाचकांना आता एका ‘क्लिक’वर पुस्तकांची सगळी माहिती मिळू लागली. लेखकांचे नाव टाकले तरी त्यांची सर्व पुस्तके दिसत असल्याने वाचकांचा पुस्तके शोधण्याचा त्रास कमी झाला. वाचकांची गरज ओळखून त्यांनी २०१० मध्ये ‘ऑनलाईन’ वाचनालयाची सेवादेखील सुरू केली. सुरुवातीला मुलुंड आणि ठाणे येथेच ‘ऑनलाईन’ पुस्तकांची सेवा दिला जात होती. ‘ऑनलाईन’ सेवेचा पसाराही वाढू लागल्याने आता मुंबई आणि पुणे येथे ही सेवा दिली जाते. ’लॉकडाऊन’मध्ये नागरिकांना घराबाहेर पडायला लागू नये आणि वाचनाचा आनंद लुटता यावा, याकरिता एकेदिवशी सहा पुस्तके घेऊन जाण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. वाचकांचा कल हा अनुवादित साहित्य, कथा-कादंबरी आणि चरित्रात्मक पुस्तकांकडे अधिक असल्याचे पै सांगतात.
‘फ्रेंड्स’ लायब्ररीच्या माध्यमातून बालवाचक वाढावा, यासाठी नेहमीच पै प्रयत्नशील राहिले. त्यासाठी खास ‘बालवाचक चळवळ’ही ते चालवतात. बालवाचकांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘फंडू’ हा अंक प्रकाशित केला जातो. भारतातील पहिले पुस्तक आदानप्रदान प्रदर्शन पै यांनी सुरू केले. या प्रदर्शनात आपल्या संग्रहातील पुस्तके देऊन, त्या मोबदल्यात आपल्या आवडीची पुस्तके घेऊन जाण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्यामध्ये मध्यस्थाची भूमिका लायब्ररी बजावित असते. प्रदर्शनातून वाचकांनी पुस्तके घेऊन उरतात ती अनेक वृद्धाश्रम, आदिवासी पाडा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना दान करण्यात येतात. आतापर्यंत ५० हजारांच्या आसपास पुस्तके दान केली आहेत. ‘फ्रेंड्स कट्ट्या’वर दर पंधरवड्यातून विविध विषयांवर कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. तसेच गेल्या चार वर्षांपासून ‘महिला दिन’देखील उत्साहात साजरा केला जातो. लायब्ररीच्या दोन अभ्यासिकासुद्धा आहेत. ‘एमपीएसी’ आणि ‘युपीएससी’च्या विद्यार्थ्यांना खासकरुन त्यांचा लाभ होतो. पण, सध्या कोरोनामुळे या अभ्यासिकादेखील बंद आहेत. या अभ्यासिकांसाठी ‘एमआयडीसी’तील जागा ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’चे संजय पाटील आणि दुसरी जागा कडोंमपाचे भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी दिली आहे. अशा या पुस्तकांच्या पुंडलिकाला पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा...!
- जान्हवी मोर्ये