इथून धमकी तेथून लस!

    दिनांक  02-May-2021 22:52:51   
|

Adar Poonawala_1 &nb
 
 
‘लस दिली नाहीस, तर चांगले होणार नाही’ असा फोन राज्यांच्या काही मुख्यमंत्री आणि भारतीय नेत्यांनी अदर पुनावाला यांना केला. अदर यांनी त्यांचे नाव काही सांगितले नाही. पण, त्यांना फोन करून धमकावले गेले. हे असे काही होऊ शकते, याची जाणीव केंद्र सरकारला असावी. त्यामुळेच की काय पुनावाला यांना केंद्र सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली. पण, या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या अदर त्यांच्या कुटुंबीयांसह लंडनमध्ये दाखल झाले. आपल्याला त्या भयंकर परिस्थितीमध्ये पुन्हा लवकर जायचे नाही, असेही त्यांनी सांगितले. यावरुन हाच प्रश्न उपस्थित होतो की, अदर यांना कोणी धमकावले असेल? धमकी देऊन परिसरातल्या आठवडा बाजारात वस्तू फुकट मागायच्या, दहा-दहा रूपयांच्या पावत्या सगळ्यांकडून फाडायच्या! का तर म्हणे, काही झाले तर हे पावती फाडणारे या मार्केटमधील विक्रेत्यांना संरक्षण देणार. पण, नित्यनियमाने मुंबई महानगरपालिकेची गाडी या मार्केटमध्ये येते आणि ओल्याबरोबर सुकेही जळते. २००५ मध्ये मुंबई पाण्याखाली गेली तेव्हा आणि आज कोरोनाने महाराष्ट्रात कहर माजवला तेव्हा या मार्केटमधील विक्रेत्यांचे हाल शब्दांत व्यक्त न करण्यासारखे झाले. पण, तेव्हा दहा रूपयाची पावती फाडणारे गायब होते आणि आहेत. गरीब लाचार आणि गरजूंना धमकावणे त्यांच्याकडून पैसे उकळायचे हे धंदे. तर अशा या उपक्रमाची तीन-चार दशके सवय आहे. नव्हे नव्हे, मास्टरच आहेत ते. त्यामुळे या अशा लोकांना वाटले असेल की, जसे आठवडा बाजारात विक्रेत्यांना, उत्पादकांना धमकावत त्यांना आपण लुटतो, तसेच पुनावाला यांनाही धमकी दिली की लगेच विनामूल्य ‘कोविड’ लस मिळेल. आता तर काय ‘यहाँसे आलू डालूंगा वहाँसे सोना निकलेगा’ म्हणणार्‍यांचे आशीर्वाद त्यांच्या सोबत आहेतच. त्यामुळे ‘यहाँसे धमकी दुंगा वहाँसे ‘कोविड’ लस मिलेगी’ असे यांना वाटत असावे. किती भंयकर आहे हे! मोठमोठे उद्योगपती, कलाकार, सेवाक्षेत्रात काम देणारे लोक महाराष्ट्रातून घाबरून नाईलाजाने पळून जात आहेत. पुनावाला यांना धमकी देणारे कोण आहेत, याचा शोध घेऊन उत्तर मिळालयाच हवे.
 
 

बंगालचे निकाल आणि पोटदुखी

 
 
 
 
ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला प. बंगाल निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या आणि तो पक्ष जिंकलाही. यावर देशाने ज्यांना ओवाळून टाकले, असे लालूपुत्र, अखिलेश यादव, ओमर अब्दुला आणि महाराष्ट्राचे स्वयंघोषित नेते यांना आनंद झाला. ‘बेगमके शादी मैं अब्दुला दिवाना’ असे हे दिवाने अब्दुल्ला यांना तर आकाश ठेंगणे झाले. पण, असे दिवाने केवळ असे अयशस्वी नेते किंवा त्यांचे पुत्रच नाहीत, तर काही विद्रोही आणि छुप्या नक्षली समर्थकांनाही तृणमूलच्या विजयाने काय करू अन् काय नको, असे झाले. आधीच गटार असलेली त्यांची तोंडं आणि कचराकुंडीपेक्षाही घाण विचार असलेले हे लोक उकळत्या तेलातल्या फोडणीसारखे तडतडू लागले. बरं, हे तृणमूलचे कार्यकर्ता आहेत का? तर अजिबात नाही. ममता बॅनर्जींचे शुभचिंतक आहेत का, तर अजिबात नाही. प. बंगालमध्ये यांच्या सात पिढ्यांतले कुणी गेले का किंवा जाणार आहे का, तर अजिबात नाही. पण, तरीही ममतांच्या जिंकण्यावर यांना आसुरी आनंद झाला. आसुरी यासाठी की यांना तृणमूलचे जिंकणे नव्हे तर प.बंगालमध्ये भाजप सत्ता करू शकत नाही, याचा विकृत आनंद वाटला. कुणाचे भले होत आहे हे पाहून वाटणारा आनंद आणि कुणाचे नुकसान होत असताना होणारा आनंद यात अंतर आहे. प. बंगालमध्ये निधर्मीपणाचा विजय झाला, असे हे लोक डंका पिटत आहेत. प. बंगालमध्ये मुस्लीम तुष्टीकरण आणि हिंदूंच्या हक्काचे हनन हे कोणत्या निधर्मीपणात मोडते, हे यांचा माओच जाणे! या असल्या लोकांमध्ये काही छुपे माओवादी जे लोकांसमारे स्वत:ला आंबेडकरवादी मानतात, तेही आलेच. त्यांना तर आपला बापच मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते. हिंदू संस्कृतीचा तिरस्कार करताना यापैकी काही माणुसकीही विसरलेत आहेत. हे सगळे करताना त्यातले काही लबाड बाबासाहेब आंबेडकरांनी असे सांगितले, असे म्हणतात, तेव्हा यांची किव, संताप आणि घृणा येते. मोदींच्या, संघाच्यानावाने निंदा करत हे लोक डॉ. बाबासाहेबांचाही अपमान करत आहेत. हा जातीयवादी पक्ष, तो निधर्मी पक्ष असा जप करत करत असे लोक स्वत:च भयंकर जातीयवादी झाले आहेत. प. बंगालच्या निवडणूक निकालांनतर त्यांचे घृणास्पद विचार बाहेर पडले इतकेच!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.