पुणे - कळसच्या माळरानावर काळवीटाची शिकार; दोघांना अटक

19 May 2021 18:43:07
black buck_1  H



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
पुण्याच्या इंदापूरयेथील माळरानावरुन मंगळवारी रात्री काळवीटाची शिकार उघडकीस आली. या प्रकरणी वन विभागाने दोन व्यक्तींना अटक केली असून त्यांच्याकडून काळवीटाच्या शिकारीसाठी वापरण्यात आलेली रायफल ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे एक नर मृत काळवीटही आढळून आले.
 
 
 
इंदापूर येथील कळसच्या माळरानावर स्थानिक गाईड्सकडून खोकड्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे वृत्त दै. मुंबई तरुण भारतने प्रकाशित केले होते. त्यानंतर वन विभागाने संबंधित गाईड्सना अटक केली होती. मात्र, कळसच्या माळरानावर वन्यजीवांच्या जीवाशी खेळ सुरूच असल्याचे अजून एक प्रकरण समोपर आहे. मंगळवारी रात्री १० वाजता कळस-काझड शिवेवर बोरी फिरंगाई मंदिर रस्त्यावर वन कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी त्यांना वनक्षेत्रामध्ये टाॅर्चचा प्रकाश दिसला. संशय आल्याने त्यांनी प्रकाशाच्या दिशेने कूच केले. यावेळी तिथे उपस्थित असलेले व्यक्ती पळाले. वन कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करुन त्या व्यक्तींच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्यांचीकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये रक्ताने माखलेले एक मृत काळवीट आढळून आले.
 
 
 
 

आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याजवळ रायफल, ६ जिवंत काडतुस आणि १ वापरलेल्या काडतूसीची पुंगळी सापडली. त्यानंतर आरोपी जंगलू मने (वय ४०) आणि दत्तात्रय पवार (वय ४२) यांना अटक करुन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पुण्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी इंदापूर राहुल काळे, वनपाल अशोक नरुटे आणि वनरक्षक पूजा काटे यांनी केली. आपल्या परिसरात कोणत्याही वन्यजीवांची तस्करी अथवा शिकार होत असल्यास त्याबाबतची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना किंवा हॅलो फाॅरेस्ट टोल फ्री क्रमांक १९२५ वर द्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0