समर्थांचे संभाजीराजांना पत्र

    19-May-2021
Total Views |

Samarth_1  H x
 
 
समर्थांनी संभाजीराजांना लिहिलेले पत्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्या पत्रात समर्थांनी शंभूराजांना शिवरायांचा आदर्श समोर ठेवून त्यांचा कित्ता गिरवण्यास सांगितले आहे.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने एक न्यायप्रिय, धाडसी, पराक्रमी, कर्मयोगी, सज्जनांचा रक्षणकर्ता, दुर्जनांचा विध्वंसक, धर्मरक्षी असा राजा हिंदवी स्वराज्यास मिळाल्याने समर्थांना आनंद झाला. मोठ्या संतोषाने समर्थांनी शिवरायांना पत्र लिहिले. त्या पत्रात समर्थांनी केलेले शिवरायांचे अप्रतिम गुणमहत्त्व इतरत्र कोठेही आढळत नाही. समर्थांच्या त्या पत्राला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे समर्थांनी संभाजीराजांना लिहिलेले पत्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. त्या पत्रात समर्थांनी शंभूराजांना शिवरायांचा आदर्श समोर ठेवून त्यांचा कित्ता गिरवण्यास सांगितले आहे. समर्थ एक पाऊल पुढे जाण्याचा सल्ला शंभूराजांना देताना सांगतात की, ‘याहूनि करावे विशेष। तरीच म्हणावे पुरुष॥’ सर्व दृष्टीने सकारात्मक विचार सांगणारे हे अत्युत्तम पत्र आहे. या पत्रासंबंधाने ल. रा. पांगारकर लिहितात, “हे मुत्सद्दीपणाचे पत्र संभाजीच्या मिषाने समर्थांनी महाराष्ट्रीयांस निरंतर प्रोत्साहन मिळावे, असा सुंदर बोध त्यात केला आहे.” निमित्त संभाजीराजांना पत्र लिहिण्याचे असले तरी त्याद्वारा केलेला उपदेश समस्त महाराष्ट्रीयांसाठी मोलाचा आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली असली तरी अर्जुनाने निमित्त करून भगवंतांनी सार्‍या मानवजातीला केलेला हा अद्वितीय उपदेश आहे. संत ज्ञानेश्वरांनी या संदर्भात म्हटले आहे की,
 
अहो अर्जुनाचिये पांती। जे परिसणया योग्य होती।
तिहीं कृपा करुनि संती। अवधान द्यावें॥
 
 
अर्जुनच्या पंगतीला जे बसले आहेत, त्या सार्‍यांना या ज्ञानामृताचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे समर्थांनी या पत्रात जो बोध संभाजीराजांना केला आहे, तो महाराष्ट्रातील सर्वांसाठी, विशेषतः राजकीय धुरिणांसाठी महत्त्वाचा आहे. शंभूराजे सुसंस्कृत होते, त्यांचा संस्कृतभाषेचा चांगला अभ्यास होता. त्यांनी ‘बुधभूषण’ हा राजनीतीशास्त्राचा ग्रंथ संस्कृतभाषेत लिहिला आहे.
 
 
शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्यूने युवराज संभाजीराजे नव्हे, तर सारा महाराष्ट्र पोरका झाला. हिंदवी स्वराज्य पोरके झाले. शिवाजी महाराज निजधामास गेले, त्यावेळी संभाजीराजांचे वय जेमतेम २३-२४ वर्षांचे होते. शंभूराजे अत्यंत धाडसी, पराक्रमी व शिवरायांप्रमाणे हिंदवी संस्कृतीचे रक्षक आणि स्वराज्यप्रेमी होते. त्यांना ‘धर्मवीर’ ही दिलेली पदवी यथार्थ आहे. शिवाजी महाराज निर्वतल्याचे वृत्त कळल्यावर संभाजीराजे रायगडावर आले. राजकारणाची सूत्रे हाती घेतली. संभाजीराजांचा माघ शु. ७ शके १६०२ म्हणजे १६ जानेवारी, १६८१ रोजी राज्याभिषेक झाला आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. राज्याभिषेकाच्या प्रसंगी समर्थांनी यावे, अशी संभाजीराजांची इच्छा होती. म्हणून त्यांनी राघो अनंत यांना समर्थांना विनंती करण्यासाठी सज्जनगडावर पाठवले. पण, शिवाजी महाराजांच्या अकस्मात जाण्याने ‘मोडावलेले’ रामदास प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाऊ शकले नाहीत. त्यांनी दिवाकर गोसावी यांना राज्याभिषेक सोहळ्यासाठी पाठवले. राज्याभिषेक झाल्यावर संभाजी राजेंनी मागील अपराध क्षमा करून सर्व मंत्र्यांना बंदिवासातून सोडवून त्यांची पदे त्यांना पूर्ववत दिली. या पराक्रमी दिलदार शंभूराजांना नंतरच्या इतिहासकारांनी योग्य न्याय दिलेला नाही. शंभूराजांची कार्यपद्धती, धडाडी, शिस्तप्रियता, राज्य वाढवण्याचे त्यांचे मनसुबे यांचे विपरीत अर्थ काढण्यात आले. गृहकलहाचा त्रास शिवाजी महाराजांना अखेरच्या काळात झाला. पण, शंभूराजांना तो सुरुवातीपासून झाला. घरभेद्यांच्या कारस्थानांचाही त्रास झाला. शिवाजी महाराज असताना महाराष्ट्रात येण्याची औरंगजेबाची हिंमत नव्हती. तो आता प्रचंड फौजेनिसी महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन रामदासांनी संभाजीला लिहिलेल्या पत्रात सावध राहण्याचा व निराश न होण्याचा सल्ला दिला आहे. पत्राची सुरुवात रामदासांनी या शब्दांनी केली आहे-
 
 
अखंड सावधान असावे। दुश्चित कदापि नसावे।
तजविजा करीत बसावे। एकांत स्थळी॥
 
 
समर्थ पुढे सांगतात, हाताखालच्या लोकांनी पूर्वी काही चुका केल्या असतील, तर त्यांना क्षमा करून सौख्याचे वातावरण निर्माण करावे. त्यांना सतत कामाला लावावे म्हणजे त्यांना उचापती करायला वेळ मिळणार नाही. पाणी एका ठिकाणी साचून राहिले तर ते खराब होते. त्याला वाट करून देऊन वाहते ठेवावे. तद्वत जनप्रवाह थांबला की त्याला दुर्बुद्धी सुचते. म्हणून त्यांना कामे लावून द्यावी. श्रेष्ठींनी जे मिळवले त्यासाठी आपसात भांडू नये. राजकारणात शत्रू त्याचा फायदा करून घेतात. कारण, ‘दोघे भांडता तिसरा जय। ऐसे सहसा करू नये।’ येथे ‘सोयराबाई-राजाराम’ हा एक गट व संभाजीराजांना दुसरा गट याचा गर्भित इशारा समर्थांनी दिला आहे. राजकारण करताना सर्वांनी एकत्र येऊन स्वधर्मद्रोही शत्रूंना नाहीसे करावे. त्याने आपली कीर्ती सगळीकडे होणार आहे. आधी पराक्रम गाजवून भूमंडळात दरारा निर्माण केला पाहिजे. नाहीतर शत्रूकडून राज्याला धक्के सहन करावे लागतील.
 
 
आधी गाजवावे तडाके। मग भूमंडळ धाके।
ऐसे न करता धक्के। राज्यास होती॥
 
 
मात्र प्रजेच्या मनात धाक नसावा. पूर्वजांनी जे मिळवले, ते सांभाळून त्यात भर घालावी.
 
 
आहे तितुके जतन करावे। पुढे आणिक मिळवावे।
महाराष्ट्रराज्य करावे। जिकडे तिकडे॥
 
 
न्यायाचे, सज्जनांना अभय देणारे, दुर्जनांचा नाश करणारे महाराष्ट्र राज्य सर्वदूर नेले पाहिजे. त्यासाठी आपले आयुष्य क्षुल्लक समजून शिवरायांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.
 
 
शिवरायास आठवावे। जीवित्व तृणवत् मानावें।
इहपरलोकी राहावें। कीर्तिरुपे॥
 
 
शिवरायांच्या ठिकाणी जे गुण होते, त्या सर्व गुणांची नेहमी आठवण ठेवली पाहिजे. त्या गुणांचे सतत चिंतन केले तर त्यापैकी काहीतरी गुण आपल्यात उतरतील आणि त्यासाठी तुम्ही हे कराच-
 
 
शिवरायाचे आठवावे रुप। शिवरायाचा आठवावा प्रताप।
शिवरायाचा आठवावा साक्षेप। भूमंडळी॥
शिवरायाचे कैसे चालणे। शिवरायाचे कैसे बोलणे।
शिवरायाची सलगी देणे। कैसे असे॥
 
 
समर्थ पत्रात पुढे लिहितात, शास्त्रात अनेक योग सांगितलेले आहेत. तथापि शिवरायांच्या अंगी असलेल्या गुणांचा अभ्यास, त्यांचे चिंतन हाच तुमच्यासाठी योग आहे. तुम्ही सर्व सुखांचा त्याग करून हा योग साधावा आणि राज्यसाधनांची त्वरा करावी. तुम्ही एक पाऊल पुढे जावे, ही तुमच्याकडून अपेक्षा. जास्त काय लिहावे?
 
 
त्याहूनी करावें विशेष। तरीच म्हणावें पुरुष।
या उपरी आता विशेष। काय लिहावे?॥
 
 
समर्थांनी हे पत्र डिसेंबर १६८१ साली लिहिले, ते शंभूराजांना जानेवारी १६८२ मध्ये मिळाले. शंभूराजांनी ते मस्तकी लावले. पुन्हा पुन्हा वाचले. त्यांचे डोळे भरून आले. समर्थांच्या भेटीची उत्सुकता वाढली. सर्व कामे मार्गी लावून निघेपर्यंत समर्थांनी २२ जानेवारी, १६८२ ला देह ठेवल्याची बातमी आली. समर्थांच्या या पत्रावरून अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना हिंदवी स्वराज्याची काळजी होती, हे दिसून येते. संभाजी महाराजांना प्रोत्साहन मिळेल व महाराष्ट्र राज्य सगळीकडे होईल आणि या हिंदवी राज्याला चांगले दिवस येतील, असा उद्देश मनी बाळगून समर्थांनी हे पत्र लिहिले. ते अतिशय प्रसिद्ध आहे. 
 
 
- सुरेश जाखडी