आपण कल्पनाशक्तीचा प्रभावी वापर करून एक स्वतःची शांतचित्त व स्वस्थचित्त अशी जागा निर्माण करायची आपल्याच कल्पनेत. मग तो समुद्रकिनारा असेल, मंदिर असेल, चर्च असेल व बाग असेल, जेव्हा जेव्हा मन चंचल होईल व चाळवेल, तेव्हा आपण या कल्पनेतील स्थळावर निवांत फेरफटका मारायचा. त्या जागेचा आपल्या संवेदनांत पूर्ण अनुभव घ्यायचा.
आपण जेव्हा लहान मूल असतो तेव्हा कल्पनाविश्वाचा परिघ अमर्याद असतो. एका क्षणी सुपरमॅन, तर दुसर्या क्षणी राजा विक्रमादित्य. जसजसे आपण मोठे होत जातो, तसतसे कल्पनाही लहान-लहान होत जातात. अर्थात, प्रौढ जगात आपण कल्पनाजगतापासून दूर राहूनही उत्तम प्रवास करू शकतो. तथापि, कल्पनाशक्ती माणसाच्या विधायकतेत, मानसिक विकासात आणि मानसिक आरोग्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. प्रौढ जगातही कल्पनेचे विधायक महत्त्व आहे. थोडासा विचार करून पाहिला, तर आपण जेव्हा विधायक कार्यात गुंततो, तेव्हा आपल्याला खूप समाधानी वाटते. इतर मोठ्या जगताशी माणसांशी वा कलाकौशल्याशी संलग्न झाल्यासारखे वाटते. आपल्या कलात्मक विश्वाशी जोडले गेल्याचे समाधान अलौकिक असते. त्या जुळल्या गेलेल्या अनुभवात एक ऊर्जात्मक अनुभूती असते. आपल्या दैनंदिन जीवनाच्या तणावातून आपण बाहेर पडलो आहोत, ही सुंदर जाणीव असते. कलात्मक कृती आणि सर्जनशील विचार आपल्याला आपलं मन आणि बुद्धी ‘रिचार्ज’ करण्याची दुर्मीळ संधी देतात. आपल्याला रोजच्या गुंतागुंतीच्या आयुष्यातून एक विधायक ‘ब्रेक’ घेण्याची संधी देतात. आपली आपल्या प्रियजनांबरोबरची नाती समृद्ध करतात. कारण, एकूणच माहोल तृप्त असतो, समाधानी असतो.
आपण असंही पाहिलं आहे की, ‘कल्पना’ या संकल्पनेभोवती कधीकधी नकारात्मकतेचे वलय किंवा ‘स्टिग्मा’ असतो. कल्पनेच्या जगात आपण भरभराट, ऐश्वर्य वा यश या गोष्टी नित्यनेमाने पाहतो, असे नाही. आपल्याला अनेक गुणी व सर्जनशील व्यक्ती माहीत आहेत, ज्यांना व्यावहारिक पातळीवर जेवढे यश वा कीर्ती मिळाली नाही, त्यांचे वैयक्तिक आयुष्य सांकेतिकदृष्ट्या तितके रुढ झाले नाही. काही कलाकार त्यांच्या सृजनशीलतेने आकाशाला गवसणी घालत राहिले, पण अनेक जणांना सामान्य ऐहिक आयुष्यही समाधानाने जगता आले नाही. याच दुर्दैवी कारणाने अनेक कुटुंबं आपल्या मुलांची सर्जनशील कल्पनाशक्ती किंवा गुणांना तेवढं महत्त्व देत नाहीत. खरंतर मुलांच्या या गुणांना वाव दिला, तर ते त्यांचं ‘टॅलेंट’ आणि भविष्य दोन्ही उत्तम रीतीने हाताळू शकतात आणि यशस्वीही होऊ शकतात. ‘नॉर्मन विन्सेंट पिल’ या सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणार्या लेखकाने म्हटले आहे, "" Do not build up obstacles in your imagination” हे आपल्या अचेतन मनाला ‘प्रोग्राम’ करण्यासाठी आवश्यक असलेलं साधन आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची कल्पना करू लागतो, जेव्हा आपली मनीषा सक्षम होते, तेव्हा आपलं अचेतन मन ती गोष्ट मिळविण्यासाठी पूर्ण ऊर्जेने कार्यक्षम होतं. आपल्याला आपली ध्येयं वा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक संधी वा मार्ग दिसायला लागतात. आपलं प्रभावी अचेतन मन आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव जागृत राहतं. आपण अनेक खेळाडूंच्या बाबतीत त्यांचे यश आणि त्यांची मानसिक एकाग्रता पाहताना कल्पनाक्षमतेची भूमिका समजून घेणं आवश्यक आहे. काही खेळाडू स्पर्धेत यश मिळवण्यासाठी कल्पनाशक्तीच्या माध्यमातून आपल्या मनाला व्यवस्थित प्रशिक्षित करतात.
कल्पनाक्षमतेचा योग्य उपयोग आजकाल आरोग्याचे संवर्धन करण्यासाठीही करता येतो. याचं कारण ‘मनोकायिक’ ही संकल्पना. आपलं मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे त्या एकमेकांवर चांगलाच प्रभाव पाडू शकतात, किंबहुना पाडतात. साधारण: काही बदल जेव्हा शरीरात घडतात, अगदी छोटे बदलसुद्धा; जसे की, जंतुसंसर्ग, जुलाबानंतर होणारे निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन, हे झाल्यावर व्यक्तीला प्रचंड थकवा येतो. मन एकाग्र करता येत नाही. प्रेरणा आणि उत्साह जाणवत नाही. अगदी याच्या उलट मनाची स्थिती बिनसली, तर मनाचाही शरीराच्या सर्व संस्थांवर लक्षात यावा, इतपत परिणाम जाणवतो. याचं कारण आपली मज्जासंस्था, हृदयसंस्था, अन्नसंस्था वा स्नायू या सर्वांमध्ये जाळे विणून आहे. त्यामुळेच आपल्या मनात चिंतेचे विचार तांडवनर्तन करू लागले की, आपली नाडी वेगाने चालते, पोटात विचित्र संवेदना जाणवतात. स्नायू आकुंचित होतात आणि वेदना जाणवायला लागतात, कधी धाप लागते, यासाठी आपण कल्पनाशक्तीचा प्रभावी वापर करून एक स्वतःची शांतचित्त व स्वस्थचित्त अशी जागा निर्माण करायची आपल्याच कल्पनेत. जशी वा जितकी प्रसन्न, निश्चल, निवांत अशी जागा. मग तो समुद्रकिनारा असेल, मंदिर असेल, चर्च असेल व बाग असेल, जेव्हा जेव्हा मन चंचल होईल व चाळवेल, तेव्हा आपण या कल्पनेतील स्थळावर निवांत फेरफटका मारायचा. त्या जागेचा आपल्या संवेदनांत पूर्ण अनुभव घ्यायचा. पाहाच, हृदय शांत होतं, डोकं शांत होतं. ही कल्पनेतील तुमची जागा तुमच्या मालकीची बनून जाते... ‘एन्जॉय.’
- डॉ. शुभांगी पारकर