इति श्रीमत् शंकराचार्यविरचितम्...

15 May 2021 20:30:28

adya shankaracharya_1&nbs


उद्या वैशाख शुद्ध पंचमी म्हणजेच प्रस्थानत्रयीचे भाष्यकार, केवलाद्वैताचे प्रवर्तक, युगकर्ते आणि साक्षात् शिवअवतार असणार्‍या आद्य शंकराचार्यांचा जन्मदिवस. आद्य शंकराचार्यांनी केवलाद्वैत वेदान्ताची स्थापना केली, आपले तत्त्वज्ञान भारतवर्षात स्थापित केलेच; पण त्यासह रचली ती सुमधुर स्तोत्रे. आद्य शंकराचार्य विरचित निवडक स्तोत्रांचा या लेखातून घेतलेला हा आढावा...


आद्य शंकराचार्यांचा जन्म केरळ राज्यातील पूर्णा तथा पेरियार नदीच्या काठावरील कालडी (काळादी, काल्टी) गावात कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय शाखेच्या नंबुद्री ब्राह्मण कुळात झाला. पित्याचे नाव शिवगुरू (शिवभट्ट), तर माता आर्याम्बा. केवळ ३२ वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्ररचना, भारतभर संचार करून चार दिशांना केलेली मठांची स्थापना यांसारखे असाधारण कार्य आद्य शंकराचार्यांनी केले.आद्य शंकराचार्यांचा जन्म दिनांक, ठिकाण या बाबी सर्वमान्य पुराव्यांच्या उपलब्धेअभावी विवाद्य ठरल्या. ‘शांकरविजय’ ग्रंथाच्या अभ्यासानंतर मद्रासचे टी. एस. नारायणशास्त्री इ. स. पू. ५०९ हे आचार्यांचे जन्मवर्ष ठरवतात. शंकरविजयकार आनंदगिरी यांच्या मते, आचार्यांचा जन्म कालडीला नाही, तर चिदंबरम या ठिकाणी इ. स. पू. ४४ मध्ये झाला व इ. स. १२ मध्ये त्यांचे निर्वाण झाले.



डॉ. श्री. द. कुलकर्णी ‘अद्वितीय कर्मयोगी : श्री आद्य शंकराचार्य’(१९९२) या पुस्तकाचे लेखक व डॉ. अंतरकर (संशोधन प्रबंध, पुणे विद्यापीठ, १९६०) इ. स. पू. ५०९ याच काळाबाबत सहमती दाखवितात. पण, एकूणच भारतीय इतिहासाच्या कालनिर्णयाची समग्र आणि समाधानकारक चिकित्सा झाली नसल्याने मार्क्स म्युलर आणि ए. बी. कीथ यांनी आद्य शंकराचार्यांचा जीवनकाल इ. स. ७८८ ते ८२० असा निर्धारित केला असून यास सर्वसाधारणपणे मान्यता देण्यात येते. रा. गो. भांडारकर हा काळ थोडा आधीचा म्हणजे इ. स. ६८० वा त्याहूनही पूर्वीचा असावा, असे मानतात. श्री. कृ. बेलवलकर (बसु मलिक लेक्चर्स ऑन वेदान्त, १९२९, पृ. २४०) म्हणतात, “...त्याप्रमाणे अखेरीस आचार्यांचे ग्रंथ हेच त्यांचे खरे जीवनचरित्र म्हणावयास हवे.” आद्य शंकराचार्यांनी पुढे गौडपादाचार्यांचे शिष्य गोविंद भगवद्पाद यांच्याकडे शिष्यत्व स्वीकारले. अद्वैत मताच्या स्थापनेसाठी भारतभ्रमण केले. आद्य शंकराचार्यांचे जीवनचरित्र एका श्लोकात सांगायचे तर-
अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद।
षोडशे कृतवान भाष्यं, द्वात्रिंशे मुनिरभ्यगात॥
(अर्थात, आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य व बत्तिसाव्या वर्षी महाप्रस्थान)असे हे महान भाष्यकार, अद्वैत वेदान्ती आद्य शंकराचार्य आणि त्यांनी रचली भावकोमल, भक्तिरसपूर्ण स्तोत्रे.
‘स्तूयते अनेन इति स्तोत्र’ म्हणजे ‘ज्याच्या योगे स्तवन केले जाते ते’ असे स्तोत्राचे लक्षण सांगितले गेले आहे. स्तोत्रे वा स्तवने हा भक्तीचा एक आविष्कार होय. स्तोत्रांचा उगम ऋग्वेदापासून होतो. भक्तिपरंपरेचा उदय आणि धार्मिकता यांच्याकरिता स्तोत्रपरंपरेला स्वतंत्र प्रेरणा मिळाली.

वैदिक संस्कृतीमधून विकसित होत गेलेला व कालानुसार बदलत गेलेलाच धर्म पुढे ‘हिंदू धर्म’ म्हणून ओळखला जाऊ लागला, असे मत सर्वसामान्यपणे मांडले जाते. या धर्मातील विषमताधिष्ठित चातुर्वर्ण्य, यज्ञ, अनेकदेवतावाद या विविध कारणांमुळे जैन, बौद्ध, पांचरात्र, भागवत अशा प्रकारच्या चळवळी निर्माण झाल्या व लोकांचा ओढा या चळवळींकडे वळला. तत्कालीन भारतातील छोटीछोटी राज्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करीत राहिली. एकूण समाजातील सुसंवाद नाहीसा होऊन तो अधिकाधिक विघटित होऊ लागला. त्यामध्ये सलोखा निर्माण करण्याचे महान कार्य आचार्यांनी केले. ‘शैव’, ‘वैष्णव’, ‘शाक्त’, ‘सौर’, ‘गाणपत्य’ आणि ‘कौमार्य’ या सहा हिंदू पंथीयांना एकत्रित करण्याचे लोकसंग्राहक महतकार्य यशस्वी रीतीने साधल्यामुळे आचार्यांना ‘षण्मठस्थापकाचार्य’ म्हटले जाऊ लागले. सूर्य, देवी, विष्णू, गणेश आणि शंकर या तत्कालीन पाच लोकप्रिय देवतांची एकत्र पूजा करण्याचा समन्वयी मार्ग पंचायतन पूजेच्या द्वारा आचार्यांनी दाखवून दिला.

हिंदू मनात मंदिरांविषयी असलेली श्रद्धा जाणून आचार्यांनी भारतातील बहुतेक प्रमुख मंदिरांना भेट देऊन तेथील पूजापद्धतीत शुचित्व आणले. प्रस्थानत्रयीवरील भाष्यांखेरीज आचार्यांच्या नावावर सुमारे ४०० स्फुट ग्रंथ असल्याचे हस्तलिखितांच्या समग्र याद्यांवरून दिसून येते. या प्रश्नाचा ऊहापोह श्री. कृ. बेलवलकर यांनी आपल्या ‘बसु मलिक लेक्चर्स ऑन वेदान्त’ या ग्रंथात केला आहे. आचार्यांचे ग्रंथ मुख्यत्वे भाष्य, स्तोत्र व प्रकरणग्रंथ या तीन प्रकारचे आहेत. भक्तीला आचार्यांनी मुक्तीचे साधन मानले नसले, तरी चित्तशुद्धीच्याद्वारे भक्ती ज्ञानाचे कारण ठरू शकते. यासाठी भाविकांना ज्ञानप्राप्तीसाठी भक्तीचा उपयोग होऊ शकेल. याच भावनेने आचार्यांनी शिव, विष्णू, चंडी, सूर्य इ. देवतांना उद्देशून ‘दक्षिणामूर्ती’, ‘हरिमीडे’, ‘आनंदलहरी’, ‘सौंदर्यलहरी’ इ. स्तोत्रे रचली. ‘शिवापराधक्षमापन स्तोत्र’, ‘शिवभुजंगम स्तोत्र’, ‘भवान्यष्टक’, ‘देव्यपराधक्षमापन स्तोत्र’, ‘देवीभुजंगम स्तोत्र’ अशी कितीतरी सुरेख, प्रासादिक, दीर्घ शिव-शक्ती स्तोत्रे त्यांनी रचली.

शिवाची स्तुती कधी कालभैरवरुपात केली, तर कधी पार्वतीपतीच्या रुपात. देवीस्तुती कधी ‘अन्नपूर्णा’ म्हणून केली तरी कधी ‘भवानी’, ‘ललिता’, वा ‘त्रिपुरसुंदरी’ म्हणून! देवीचे शिवप्रिया स्वरूपच आचार्यांना अधिक भावलेले दिसते. या स्तोत्रांचे स्वरूपही कधी क्षमायाचनेचे, तर कधी स्वरूपवर्णनांतून स्तुतीचे! ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति’ म्हणणार्‍या आचार्यांनी विविध भावमधुर वृत्ते वापरून दैवतांविषयीचा भक्तिभाव लोकांच्या मनात जागवला. आद्य शंकराचार्य हे परमार्थत: अद्वैतवादी होते, पण व्यवहाराच्या भूमिकेवर ते देवतांच्या उपासनेची सार्थकता मानीत होते. निर्गुणाच्या उपलब्धीसाठी सगुणाची उपासना हे प्रबल साधन आहे आणि जोवर एखादा साधक सगुण ईश्वराची उपासना करीत नाही, तोवर त्याला निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होणार नाही, असे ते मानीत. या सगुण उपासनेकरिता त्यांनी देवता स्तोत्रे रचलीच, तसेच त्यांनी नदी स्तोत्रे, तत्त्वज्ञान स्तोत्रेही रचली. त्यांनी भक्तीला एवढे सुलभ रूप दिले की, त्यांनी मानसपूजा स्तोत्रेदेखील रचली. देव हा कर्मकांडाचा नव्हे, तर भावभक्तीचा भुकेलेला असतो, हे ज्ञानी असणार्‍या आचार्यांनी जाणले.
काही प्रातिनिधिक स्तोत्रे पाहूया.


आनंदलहरी
 
‘आनंदलहरी’ हे भगवती देवीचे स्तोत्र आहे. यामध्ये ‘शिखरणी’ वृत्ताचे 20 श्लोक आहेत. या एका स्तोत्रावर 30 टीका उपलब्ध आहेत. भगवती देवीची आचार्यांनी केलेली स्तुती ही रसिकजनांसाठी आनंद प्रदान करणारीच आहे. त्यातील एक श्लोक असा -
मुखे ते ताम्बूलं नयनयुगले कज्जलकला
ललाटे काश्मीरं विलसति गले मौक्तिकलता।
स्फुरत्कांची शाटी पृथुकटितटे हाटकमयी
भजामस्त्वां गौरीं नगपतिकिशोरीमविरतम्॥
अर्थ : माते भवानी! तुझ्या मुखात तांबूल रंगला आहे. दोन्ही नेत्रांमध्ये काजळाची कोर, भालप्रदेशी केशरकुंकुम आणि गळ्यात मोत्यांची माळ शोभत आहे. अंगावर भरजरी शालू असून त्यावर कटिभागी सुंदर कमरपट्टा चमकत आहे. याप्रमाणे शोभणारी गौरवर्ण आणि पर्वतराज हिमालयाची कन्या असणार्‍या पार्वती तुला मी निरंतर भक्तिभावाने भजत आहे.या श्लोकात देवीचे वर्णन आहे. अतिशय अर्थसुलभ, कुठेही क्लिष्टता वा आपल्या अगाध ज्ञानाचे प्रदर्शन नाही. सामान्य भक्तही भावपूर्णतेने स्तोत्र म्हणू शकेल, अशी आचार्यांची ही रचना.

दक्षिणामूर्ती स्तोत्र

दक्षिणामूर्ती स्तोत्र हे ‘शार्दूलविक्रीडीत’मध्ये असून यावरही २०हून अधिक टीका लिहिलेल्या आहेत. या स्तोत्राचे वैशिष्ट्य म्हणजे यात वेदान्त प्रतिपादनासह तांत्रिक उपासनेचेही काही पारिभाषिक शब्द आले आहेत. आचार्यांची तंत्रविषयक मते जाणून घेण्यासाठी हे स्तोत्र उपयुक्त ठरते. त्यातील पहिला श्लोक असा -
विश्वं दर्पणदृश्यमाननगरीतुल्यं निजान्तर्गतं
पश्यन्नात्मनि मायया बहिरिवोद्भूतं यदा निद्रया।
यः साक्षात्कुरुते अबोधसमये स्वात्मानमेवाद्वयं
तस्मै श्रीगुरुमूर्तये नम इदं श्रीदक्षिणामूर्तये॥


अर्थ
: निद्रेच्या वेळी स्वप्नात भासणार्‍या पदार्थांप्रमाणे हे विश्व ज्या आत्मस्वरुपाताच्या ठिकाणी, आरशात दिसणार्‍या एखाद्या नगरीच्या प्रतिबिंबासारखे प्रत्ययास येते आणि आत्मसाक्षात्काररुपी जागृतीच्या क्षणी नाहीसे होते, त्यावेळी केवळ एकमेवाद्वितीय अशा आत्मस्वरुपाचाच ज्याला साक्षात्कार होतो, त्या आत्मस्वरुपी श्रीगुरू दक्षिणामूर्तीला मी नमस्कार करतो.आचार्य स्तोत्रात असो वा तत्त्वज्ञानात व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करतात. त्यामुळे त्यांचे साहित्य हे अधिक जवळचे वाटते.

चर्पटपंजरिका स्तोत्र


चर्पटपंजरिका स्तोत्र हे आचार्यांच्या स्तोत्रवाड्.मयातील कोहिनूर हिर्‍यासारखे आहे. १७ श्लोकांचे हे नादमधुर स्तोत्र असून याचे धृपद हे ‘भज गोविन्दं भज गोविन्दं’ हे आहे. या स्तोत्रातून आचार्य मिथ्या जगातून बाहेर येण्यास सांगून वैराग्याचा उपदेश करतात.
दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायाता।
कालः क्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुञ्चत्याशावायुः॥
भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते।
प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुकृञ्करणे॥
अर्थ : दिवस-रात्र, सकाळ-संध्याकाळ, शिशिर ऋतू-वसंत ऋतू पुन्हा पुन्हा येतात आणि जातात. कालाची ही लीला नित्य चालू आहे. कालचक्र फिरत राहणारच आहे. आयुष्य हळूहळू कमी होत जाईल. पण, हा आशारुपी जीव पिंड(देह) सोडत नाही. देहाची आशा काही कमी होत नाही. म्हणूनच अरे वेड्या, गोविंदाला भज! गोपालकृष्णाला भज. मरण जवळ आल्यावर हे ‘डुकृञ् करणे’ तुझं रक्षण करणार नाही.आचार्य या स्तोत्रात जीवनातील अनेक उदाहरणे देऊन या जीवाचे मिथ्यात्व स्पष्ट करतात. अंतिमत: आचार्यांचे तत्त्वज्ञान ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, जीवौ ब्रह्मैव नापर:’ असे आहे. त्या स्थितीपर्यंत भक्ताला आणण्यासाठी आचार्यांनी हे स्तोत्र तथा निर्वाणषटक, आत्मषटक, हस्तामलक, षटपदी, हरिमीडे स्तोत्र अशी स्तोत्ररचना केली.


शिवभुजंगप्रयात स्तोत्र


शिवभुजंगप्रयात या स्तोत्रात भुजंगप्रयात वृत्तामध्ये १४ श्लोक आहेत. या स्तोत्राची कथा अशी आहे की, आचार्यांनी आपल्या मातेच्या अंतकाळी या स्तोत्राने शिवाला आळवले आणि शिवाने प्रसन्न होऊन त्यांच्या मातेसाठी शिवदूत पाठवले. त्यातील एक श्लोक असा-
महादेव देवेश देवाधिदेव
ब्रुवाण: स्मरिष्यामि भक्त्या भवन्तं
ततो मे दयाशील देव प्रसीद॥
अर्थ : महादेव, देवेश, देवाधिदेव अशा अनेक नावांनी मी तुझे स्मरण करतो. तू दयाशील आहेस. तू माझ्यावर प्रसन्न हो.
साक्षात् शंकराला प्रसन्न करून घेण्याची ताकद या अत्यंत सुलभ श्लोकात आहे.

सौंदर्यलहरी

काव्यदृष्ट्या सरस, प्रौढ व रहस्यपूर्ण असे हे स्तोत्र आहे. हे जणू एक शतककाव्यच आहे. सर्व संस्कृत स्तोत्रांचा मुकूटमणी शोभेल असे हे अनुपम स्तोत्र आहे. या स्तोत्रातील पहिल्या ४१ श्लोकांमध्ये आचार्यांनी तंत्रविद्येतील रहस्ये उकलून सांगितली आहेत. पुढील ५९ श्लोकांमध्ये त्रिपुरसुंदरीच्या अंगप्रत्यंगांचे सरस व चमत्कृतीपूर्ण वर्णन आहे.
अह: सूते सव्यं तव नयनमकत्मिकतया
त्रियामां वामं ते सृजति रजनीनायकतया।
तृतीया ते दृष्तिर्दरदलितहेमाम्बुजरुचि:
समाधते सन्ध्यां दिवसनिशयोरन्तरचरीम्॥
अर्थ : माते त्रिपुरसुंदरी, तुझा उजवा नेत्र हा सूर्यस्वरुप असल्यामुळे तो दिवस निर्माण करतो व डावा नेत्र चंत्रस्वरुप असल्यामुळे तो रात्र निर्माण करतो. किंचित विकसित झालेल्या सुवर्नकमलाप्रमाणे आरक्तवर्ण दिसणारा तिसरा नेत्र प्रत्यक्ष अग्निस्वरुप असल्यामुळे तो रात्र व दिवस आणि दिवस व रात्र यात संधिकाल निर्माण करतो.
आचार्यांनी या स्तोत्रात ही सृष्टी जणू त्रिपुरेश्वरीची निर्मिती आहे, असे रेखिले आहे. त्रिपुरसुंदरी देवी आचार्यांची उपास्यदेवता होती. त्यामुळेच या श्लोकात उत्कटता, माधुर्य ओतप्रोत भरलेले आहे.
आचार्यांच्या हृदयात पांडित्य आणि कवित्व यांचा मनोज्ञ संगम होता. तर्काच्या कुर्‍हाडीने प्रतिपक्षाच्या सिद्धांतावर कठोर प्रहार करणारे आचार्य भावनिक पातळीवर आले की, एकदम कुसुमकोमल होतात. ईश्वराला भक्तिभावाने शरण जातात, त्याची करुणा भाकतात. अशा तरल क्षणी त्यांच्या कवित्वाला विलक्षण आर्द्रता येते. आचार्यांची स्तोत्रे मनोभिराम झाली आहेत, ती याच भावकोमलतेमुळे. शब्दसौष्ठव, श्लेषादी अलंकार आणि प्रेमरस या गुणांमुळे ही सर्व स्तोत्रे रसिकांना आणि पंडितांनाही आस्वाद्य ठरली आहे. आचार्यांची स्तोत्रे ही संस्कृत साहित्याला मिळालेली एक देणगी आहे. ते आत्मबोधाने संसारभयापासून केव्हाच मुक्त झाले होते, पण भक्तीच्या भूमिकेवर आल्यावर ते श्रीहरीला कळवळून ‘तारय संसारसागरत:’ म्हणतात. आचार्यांनी हे एवढे प्रचंड व महनीय कार्य वयाच्या अवघ्या ३२ वर्षांत पूर्ण केले, हे महद्आश्चर्यच होय. त्यांच्या उदात्त चरित्र, सात्त्विक जीवन, अतोड विद्वत्ता यामुळे त्यांचा अनुयायी वर्ग सर्वात अधिक आहे.
ऋग्वेदापासून प्रारंभ होऊन अथर्ववेदातील ब्रह्मपर सूक्तांच्या द्वारा उपनिषदांत परिपूर्ण रीतीने परिणत झालेल्या ब्रह्मात्मैक्य तत्त्वाचे प्रतिपादन आणि उपनिषद-वाक्यातील आपातत: आढळणार्‍या विरोधांचा परिहार करून, त्यांच्या तर्कदृष्ट्या समन्वय घालून व सांख्य-योग, न्याय-वैशेषिक, पूर्वमीमांसा अशा आस्तिक व बौद्ध, जैन, लोकायत अशा नास्तिक दर्शनांचे पद्धतशीर खंडन करून केवलाद्वैत तत्त्वज्ञानाची भक्कम पायावर मांडणी करणे, हे आचार्यांचे सर्वात मोठे योगदान आहेच, तसेच तत्त्वज्ञान आणि भक्ती यांचा सुंदर मिलाफ साधणारी त्यांची स्तोत्रे अवर्णनीयच! आचार्य केवळ ‘ज्ञानी’ न राहता विनम्र भक्त बनले. पुढे त्यांनी जी विविध स्तोत्रे रचली, त्यात त्यांचा हा विनम्रभाव पावलोपावली जाणवतो.‘इति श्रीमत् शंकराचार्य विरचितं...’ या अंतिम वाक्यातील शक्तीच साधकाला ईश्वरओढ पर्यायाने प्राप्ती करून देते...
श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयम्।
नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरम्॥
आद्य शंकराचार्य रचित निवडक स्तोत्रांची यादी पुढील प्रमाणे -
अद्वैत पंचकम्
अनात्मा श्रीविगर्हणम्
कौपीनपंचकम्
जीवनमुक्त आनंदलहरी
धन्याष्टकम्
निर्वाणमंजरी
निर्वाणष्टकम्
साधनपंचकम्
स्वरूपानुसंधान अष्टकम्
स्वात्मनिरूपणम्
स्वात्मप्रकाशिका
गणेशपंचरत्नम्
गणेशभुजंगम्
कालभैरव अष्टकम्
दक्षिणमूर्ति अष्टकम्
दक्षिणमूर्ति स्तोत्रम्
दक्षिणमूर्ति वर्णमाला स्तोत्रम्
मृत्युंजय मानसपूजा
वेदसार शिवस्तोत्रम्
शिवअपराधक्षमापन स्तोत्रम्
शिव आनंदलहरी
शिव केशादिपादान्तवर्णन स्तोत्रम्
शिव नामावलि अष्टकम्
शिवपंचाक्षर स्तोत्रम्
शिवपंचाक्षर नक्षत्रमालास्तोत्रम्
शिवपादादिकेशान्तवर्णनस्तोत्रम्
शिवभुजंगम्
शिवमानसपूजा
आनंदलहरी
कनकधारा स्तोत्रम्
कल्याणवृष्टिस्तव
गौरीदशकम्
अन्नपूर्णा स्तोत्र
त्रिपुरसुंदरीअष्टकम्
त्रिपुरसुंदरीमानसपूजा
त्रिपुरसुंदरीवेदपाद स्तोत्रम्
देवीभुजंगम्
नवरत्नमालिका
भवानीभुजंगम्
भ्रमरांबा अष्टकम्
मंत्रमातृका पुष्पमालास्तव
महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्
ललिता पंचरत्नम्
शारदाभुजंगप्रयात स्तोत्रम्
सौंदर्यलहरी
अच्युताष्टकम्
कृष्णाष्टकम्
गोविंदाष्टकम्
जगन्नाथाष्टकम्
पांडुरंगाष्टकम्
भगवन मानसपूजा
चर्पटपंजरिका स्तोत्रम्
द्वादशपंजरिका स्तोत्रम्
राम भुजंगप्रयात स्तोत्रम्
लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्रम्
लक्ष्मीनरसिंह पंचरत्नम्
विष्णुपादादिकेशान्त स्तोत्रम्
विष्णु भुजंगप्रयात स्तोत्रम्
षट्पदीस्तोत्रम्
अर्धनारीश्वरस्तोत्रम्
उमा-महेश्वर स्तोत्रम्
काशी पंचकम्
गंगाष्टकम्
गुरु अष्टकम्
नर्मदाष्टकम्
निर्गुण मानसपूजा
मनकर्णिका अष्टकम्
यमुनाष्टकम्


- वसुमती करंदीकर
Powered By Sangraha 9.0