(भगवान परशुरामांचे पौगंडावस्थेतील चित्र)
देवांची चित्रे त्यांचे वय पौगंडावस्थेत असेल असे दाखविले तरच त्यांचे अजरत्व आणि अमरत्व योग्य रीतीने साकारले गेले, असे म्हणता येईल. हनुमानाने भीमाचे गर्वहरण करण्यासाठी जख्ख म्हातार्याचे रूप घेऊन त्याला आपली शेपटी उचलण्यास सांगितली होती, अशी आख्यायिका आहे. तो प्रसंग चित्रित करताना हनुमान जख्ख म्हाताराच दाखविला पाहिजे. पण, इतर वेळी हनुमानाचे चित्र काढताना ते पौगंडावस्थेतील शरीर दाखवणारे असेल तरच ते अनुभूती आधारित मूर्तिशास्त्रानुसार सुयोग्य ठरेल.
भारतीय देवता परंपरेत देवदेवतांव्यतिरिक्त सात चिरंजीव अनंतकाळ राहणारे मानले गेले आहेत. त्यात हनुमान आणि विष्णूचा सहावा अवतार परशुराम हे दोन देवावतार, तर इतर पाच मर्त्य मानव आहेत. आपण मूर्तिपूजक आहोत. आपण आपल्या देवीदेवतांना तसेच दहावतारांना दृश्यस्वरूपात मानतो, पाहतो, दाखवतो, चित्रित करतो. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने भगवान परशुरामांची चित्रे अनेकांनी विविध माध्यमांतून वितरित-प्रसारित केली. त्यात भगवान परशुराम हे वयोवृद्ध दाखविले होते. तसेच अनेकदा हनुमानाची, महादेवाची आणि नेहमीच ब्रह्मदेवाची चित्रे वयोवृद्धत्व दर्शविणारी असतात. ही चित्रे पाहताना खटकते. कारण, देव अमर आहेत, असतात असे आपण मानतो. अमरकोषात देवांना ‘निर्जर:’ (अजर), ‘अमर:’ असे पर्यायी शब्द दिले आहेत.
देवमूर्तींची लक्षणे
देव अजर, अमर असतात हे कसे समजायचे, तर ते नेहमी तरुण दाखविले जातात. त्यांच्या मूर्ती तरुणांच्या कायेत दाखविल्या जातात. पण, जेव्हा त्यांची चित्रे काढली जातात, तेव्हा चित्रकार, कलाकार हे स्वातंत्र्य घेतात. त्यांचे देवतांच्या बाबतीतील ते आकलन योग्य नसते. चिरंजीव हे प्रकट होताना मर्त्य कायेत असतात, दिसतात. सात चिरंजीवांपैकी एक, अश्वत्थामा नर्मदा प्रदक्षिणा करणार्यांना दर्शन देतो, वेळप्रसंगी धावून येतो, मदत करतो आणि प्राण वाचवतो, असे अनेक नर्मदा प्रदक्षिणा करणार्यांनी कथन केले आहे. त्या सात चिरंजीवांचे कायिकरूप कसे असावे, याचा विज्ञानाच्या आधारे विचार करता येतो.
शरीराची ‘अॅन्ट्रॉपी’ संकल्पना
ऊर्जागतीशास्त्रात (Thermodynamics) ‘अॅन्ट्रॉपी’ची संकल्पना (Entropy concept) आहे. ‘अॅन्ट्रॉपी’ म्हणजे एखाद्या वस्तूच्या अंतर्गत तापमान वाढल्याने अथवा दुसरा कोणता जैविक बदल झाल्याने त्यात घडून येणार्या विस्कळीतपणाचे (disorder) मोजमाप. निर्जीव वस्तूंचे तापमान वाढले की, अणुरेणू एकमेकांपासून दूर जातात. त्या पदार्थाची अंतर्गत व्यवस्था विस्कळीत होते. त्यावेळी त्याची ‘अॅन्ट्रॉपी’ वाढलेली असते. पाण्याची वाफ होते, तेव्हा त्याची ‘अॅन्ट्रॉपी’ वाढलेली असते. जीवंत प्राण्यांच्या बाबतीत त्यांच्या रक्तपेशी जेव्हा मूळ स्थितीपासून ढळतात, तेव्हा त्या शरीराची ‘अॅन्ट्रॉपी’ वाढलेली असते. जेव्हा एखादी व्यक्ती मृत होते, त्यावेळी शरीरातील सर्व अवयवांची, रक्तपोशी इ.च्या नियमितपणे पुनर्निर्मितीची प्रक्रिया थांबते. शरीर विघटन होण्यास सुरुवात होते. जे चिरंजीव असतील, त्यांच्या शरीरात ही विघटन प्रक्रिया घडली नाही, तरच ते अमर राहू शकतील. मानवी शरीर अगदी बीजांड-वीर्यसंयोगाच्या क्षणापासून वाढण्यास सुरुवात होते.
जन्माच्या वेळी आईपासून नाळ तुटल्यावरही शरीराची वाढ होत राहते. साधारणपणे पौगंडावस्था संपेपर्यंत ती चालू राहते. त्यादरम्यान शरीराची उंची वाढत असते. एका स्थितीत ती वाढ थांबते. त्यानंतर वजन वाढणे आणि कमी होणे अथवा कुठले विकार होऊन शरीराचा र्हास होणे, या गोष्टी घडतात. एक प्रकारे ते मानवी शरीराचे विघटन दर्शविते. चिरंजीव आणि अमर असणार्यांच्या शरीराचा जन्म झाल्यावर पौगंडावस्थेपर्यंत त्यांचीही शरीरे वाढताना दिसल्याची कथने आहेत. जसे अश्वत्थामा लहान असताना दारिद्य्रामुळे त्याची आई त्याला तांदळाच्या पिठाचे पाणी दूध म्हणून देत असे. येथे लक्षात घेण्याचा मुद्दा हा की, अश्वत्थामा लहान होता, त्याची इतर मुलांसारखी वाढ झाली. त्याची वाढही पौगंडावस्थेपर्यंत झाली. ती कायिक अवस्था त्यानंतर न बदलता तशीच राहायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यानंतर अश्वत्थामा पौगंडावस्थेतच राहायला पाहिजे. ते कसे असेल, तसे कसे झाले असेल इ. गोष्टींची चर्चा येथे अपेक्षित नाही. तो वेगळा विषय व्हावा. जे अश्वत्थाम्याच्या बाबतीत, तेच इतर चिरंजीवांच्या बाबतीत खरे असेल.
देवांची चित्रे त्यांचे वय पौगंडावस्थेत असेल असे दाखविले तरच त्यांचे अजरत्व आणि अमरत्व योग्य रीतीने साकारले गेले, असे म्हणता येईल. हनुमानाने भीमाचे गर्वहरण करण्यासाठी जख्ख म्हातार्याचे रूप घेऊन त्याला आपली शेपटी उचलण्यास सांगितली होती, अशी आख्यायिका आहे. तो प्रसंग चित्रित करताना हनुमान जख्ख म्हाताराच दाखविला पाहिजे. पण, इतर वेळी हनुमानाचे चित्र काढताना ते पौगंडावस्थेतील शरीर दाखवणारे असेल तरच ते अनुभूती आधारित मूर्तिशास्त्रानुसार सुयोग्य ठरेल. इथे अश्वत्थाम्याच्या बाबतीत ज्यांना त्याचे दर्शन झाले आहे, त्यांची साक्ष काढता येईल. त्यांच्यापैकी कोणीही अश्वत्थामा, क्षणार्धासाठी जसा काही, दिसला तो जख्ख म्हातारा असल्याचे नमूद केलेले माझ्या वाचनात नाही. दुर्गा, काली इ. देवता तर मूळात कुमारिका असल्याची वर्णने आहेत. त्या तशाच दाखविल्या पाहिजेत. जर इतर देव आणि या सातपैकी कोणत्याही चिरंजीवाला चित्रित करायचे असेल तर ते चित्रात पौगंडावस्थेतील दाखविले गेले पाहिजे.
- डॉ. प्रमोद पाठक