धर्मांधांसमोर शेपूटघालू पिनारायी

15 May 2021 00:38:55
CM Pinrayi Vijayan _1&nbs



पिनारायी विजयन यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेली दुरुस्ती त्याचाच दाखला म्हणावा लागेल, कारण ते कट्टरपंथीयांच्या दबावाला घाबरले व अशा घाबरट मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातील महिलेची हत्या करणार्‍यांचा व्यवस्थित निषेधही करता आला नाही. हीच गोष्ट काँग्रेस नेते ओमान चांडी यांनाही लागू होते आणि त्यांनी असे का केले, तर फक्त मुस्लिमांच्या गठ्ठा मतपेटीपायी!
 
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुुरू असलेल्या युद्धादरम्यान दहशतवादी संघटना ‘हमास’ने केलेल्या हल्ल्यात दोन दिवसांपूर्वी केरळवासी सौम्या संतोषनामक महिलेचा मृत्यू झाला. कोणत्याही राज्यातील व्यक्तीचा देशी वा विदेशी भूमीत दहशतवादी हल्ल्यात बळी गेल्यास त्या राज्यातील सत्ताधारी नेतृत्वाने श्रद्धांजली देणे आणि संबंधित मानवताद्रोही विचारधारेविरोधात वक्तव्य करणे स्वाभाविकच. इथेही तसेच झाले, डाव्या आघाडीचे नेते, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांनी सौम्या संतोष यांना श्रद्धांजली वाहिली व त्यात ‘हमास’चा दहशतवादी संघटना म्हणून उल्लेख केला.
 
 
पण, केरळच्या दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी ‘हमास’ला दहशतवादी संघटना म्हटल्याचे राज्यातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना व धर्मांध मुस्लिमांना रुचले नाही आणि त्यावर वादाला सुरुवात झाली. काही क्षणातच वाद इतका विकोपाला गेला की, पिनारायी विजयन आणि ओमान चांडी यांना दाती तृण धरून इस्लामी कट्टरपंथीयांसमोर शेपूट घालावी लागली. राज्यातील मुस्लीम समाज नाराज होऊ नये म्हणून धर्म न मानणार्‍या डाव्या पक्षाच्या नेत्याने आणि काँग्रेसच्याही नेत्याने आपल्या श्रद्धांजली संदेशात दाढी कुरवाळू दुरुस्ती केली आणि उरलो फक्त धर्मांधांसमोर शरणागती पत्करण्यापुरता, ही आपली ओळख अधिक गडद करून दाखवली.
 
 
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मिळालेला मुस्लिमांच्या लांगुलचालनाचा वारसा काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळातही निभावल्याची खंडीभर उदाहरणे आहेत. तीच गत डाव्या पक्षांचीही असून त्यांचे जिथे जिथे प्राबल्य होते, तिथे तिथे त्यांनी मुस्लिमांसमोर झुकण्याचेच काम केले. मुस्लिमांच्या चुकीलाही बरोबर म्हणायचे आणि त्यांच्या कलाप्रमाणे वागायचे, अशी दोन्ही पक्षांच्या राजकीय यशाची क्लृप्ती होती. त्याने काँग्रेसची अवस्था आज गलितगात्र झाली, तर डावी आघाडी फक्त केरळपुरती शिल्लक उरली.
 
 
तरीही दोन्ही पक्षांची मुस्लिमांच्या तुष्टीकरणाची मानसिकता काही बदलली नाही आणि त्याच मानसिकतेपायी काँग्रेस व डावे पक्ष किमान सभ्यतेची पातळी सोडून अधिकाधिक खालच्या दर्जाचे राजकारण करत असतात. आताच्या सौम्या संतोष यांच्या निधनानंतर फेसबुकवरील श्रद्धांजली पोस्टमध्ये पिनारायी विजयन व ओमान चांडी यांनी केलेली दुरुस्ती त्याचाच दाखला म्हटला पाहिजे. आपल्याकडच्या पुरोगाम्यांची तोंडे कोरोना नियंत्रण कौशल्यावरून पिनारायी विजयन यांची कौतुके गाताना थकत नाहीत, त्यांनाच इस्लामी कट्टरपंथीयांच्या भीतीने केरळच्या कन्येची हत्या करणार्‍यांचे मात्र नावही घेता आले नाही किंवा त्यावर ठाम राहता आले नाही.
 
‘हमास’चा ‘दहशतवादी संघटना’ असा उल्लेख असलेला उतारा केरळच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या फेसबुक पोस्टवरून हटवावा लागला. केरळमध्ये गेल्या काही वर्षांपासून धर्मांध इस्लामचा प्रभाव वाढल्याचे भाजपसह विविध संस्था-संघटनांकडून सातत्याने सांगितले जाते. पिनारायी विजयन यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेली दुरुस्ती त्याचाच दाखला म्हणावा लागेल. कारण, ते कट्टरपंथीयांच्या दबावाला घाबरले व अशा घाबरट मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातील महिलेची हत्या करणार्‍यांचा व्यवस्थित निषेधही करता आला नाही. हीच गोष्ट काँग्रेस नेते ओमान चांडी यांनाही लागू होते आणि त्यांनी असे का केले, तर फक्त मुस्लिमांच्या गठ्ठा मतपेटीपायी!
 
अर्थात, राज्यातील जनता जगो अथवा मरो, काही फरक पडत नाही. पण, या सगळ्यात मुस्लीम नाराज व्हायला नको, अशी त्यांची वृत्ती. परंतु, आज एका परक्या देशाच्या भूमीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात केरळी महिलेचा मृत्यू झाला आणि उद्या केरळमध्येच असे झाले तर? त्यावेळी निदान जबाबदारी घेऊन पिनारायी विजयन धर्मांधांच्या अत्याचाराला बळी पडणार्‍यांची मदत तरी करतील का? अन्याय करणार्‍या कट्टरपंथीयांना शिक्षा करण्यासाठी ठोस निर्णय तरी घेतील का? हे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याचे उत्तर नाही, असेच असेल.
 
कारण, ते होकारार्थी असते, तर केरळचे विद्यमान मुख्यमंत्री सौम्या संतोष यांच्या मृत्यूवर मौन का आहेत? की त्यांचे ‘हमास’शीदेखील वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळे ते त्याविरोधात बोलायला धजावत नाहीत? तसेही असू शकेल, त्यांचेच नव्हे तर त्यांच्या पक्षाचे व पक्षाच्या ‘पॉलिट ब्यूरो’चेही ‘हमास’शी नाते असेल, म्हणूनच तर कम्युनिस्ट पक्षाच्या ‘पॉलिट ब्यूरो’ने इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाला ‘इस्रायलचा पॅलेस्टाईनवरील हल्ला’ म्हटले. वस्तुतः पॅलेस्टाईननेच न्यायालयीन निकाल अमान्य करत इस्रायलवर रॉकेट्सने हल्ला केला होता. पण, ते तथ्य कम्युनिस्ट पक्षाला मान्य करायचे नाही. कारण, मुद्दा मुस्लिमांच्या मतांचा आहे आणि त्यातून मिळणार्‍या सत्तेचा आहे, मग कोणी केरळी मेले तरी चालेल!
 
 
दरम्यान, धर्मांध मुस्लिमांसमोर इस्रायल-पॅलेस्टाईन व ‘हमास’वरून पिनारायी विजयन यांनी लोटांगण घातले, तशीच गत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचीही होते की काय, अशी परिस्थिती आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात पाकिस्तानने पॅलेस्टाईनच्या बाजूने युद्धात उतरावे, अशी मागणी पाकिस्तानी जनतेतून होत आहे. पाकिस्तान अण्वस्त्रसंपन्न देश आहे, पाकिस्तानकडे ‘शाहिन-३’ क्षेपणास्त्र आहे, असे असताना इमरान खान कोणाच्या आदेशाची वाट पाहताहेत? पॅलेस्टिनी मुस्लीम व इस्लामच्या रक्षणासाठी आता इस्रायलवर हल्ला केलाच पाहिजे, इस्रायलला त्याची जागा दाखवलीच पाहिजे, अशी भाषा पाकिस्तानी लोकांमधून केली जात आहे. तसेच धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांचा कारखाना म्हणून पाकिस्तानला ओळखले जाते आणि आताच्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धावरून तिथले जिहादी चांगलेच खवळले आहेत.
 
 
त्यांचा आवाज इमरान खानपर्यंत पोहोचवलाही जात आहे आणि कदाचित त्यातूनच त्यांनी इस्रायलला धमकी देण्याचे विधान केले असावे. इमरान खान यांनी देशातील कट्टरपंथीय जनता व दहशतवाद्यांच्या हाकेला ओ देत १२ मे रोजी ट्विटरवरून नॉम चोम्स्की यांचा उतारा (जो त्यांचा मुळी नाहीच!) ट्विटरवरून पोस्ट केला व इस्रायलवर प्रत्युत्तरादाखल हल्ला करण्याची धमकी दिली. मात्र, पाकिस्तानची आजची अवस्था काय आहे, हे अवघ्या जगाला आणि इस्रायललाही माहिती आहे. दिवाळखोरीत गेलेल्या पाकिस्तानमधील जनता भुकेकंगाल असून त्या देशावर इतरांसमोर हात पसरण्याची दारुण वेळ आलेली आहे. तेव्हा त्याने इस्रायलला धमकी दिल्याने काय फरक पडणार? उलट, इस्रायलने पलटवार केल्यास पाकिस्तानचे उद्या पडणारे तुकडे आजच पडतील!



Powered By Sangraha 9.0