ओडिशा- खवले मांजराची केली कोरोना चाचणी

12 May 2021 15:36:07
pangolin_1  H x



ओडिशा -
ओडिशामध्ये तस्करीमधून पकडलेल्या खवले मांजराची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या खवले मांजराची तस्करी करणाऱ्या माणसाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनाने या खवले मांजराचीही चाचणी केली.
 
 
काही दिवसांपूर्वी हैद्राबादमधील सिंहांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सर्व प्राणिसंग्रहालय आणि वन विभागाला प्राण्यांची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर आता ओडिशामध्ये तस्करीमध्ये सापडलेल्या एका खवले मांजराची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ओडिशामधील मयूरभंज भागामध्ये ही बुधवारी सकाळी ही कोरोना चाचणी पार पाडली. बांग्रीपोसी भागामधून मंगळवारी एका तस्करीमधून या खवले मांजराची सुटका करण्यात आली होती. या खवले मांजराची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आले. नियमाप्रमाणे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. बुधवारी या आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्याकडून ताब्यात घेतलेल्या खवले मांजरालाही कोरोनाचा धोका असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्राण्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. जर या प्राण्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास त्याला आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येईल. अन्यथा त्याला जंगलात सोडले जाईल, अशी माहिती 'अॅनिमल रेस्क्यू'चे सचिव व्हानोमित्र आचार्य यांनी दिली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0