मराठा आरक्षणासाठी केंद्राने प्रयत्न करावेत : उद्धव ठाकरे

11 May 2021 18:36:45

Uddhav _1  H x





मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणसंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आता केंद्र सरकारने यात लक्ष घालून लवकरात लवकर पाऊले उचलावीत, अशी विनंती राष्ट्रपतींना करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले.
 
 
लवकरच आम्ही पंतप्रधानांची वेळ घेऊन त्यांना या प्रश्नी भेटणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही सर्वांनी समाजाच्या भावना लक्षात घेता केंद्राला याबाबत विनंती करायचे ठरविले आणि त्यानुसार राज्यपालांना भेटून पहिले पाऊल टाकले आहे, असेही ठाकरे म्हणाले.
 
 
ते म्हणाले, "मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. आरक्षण प्रश्नी सरकार सोबत आहे याची समाजाला कल्पना आहे, ते सरकारच्या विरोधात नाहीत, त्यामुळे मी पूर्वी देखील मराठा समाजाला धन्यवाद दिले आहेत आणि आता आपल्या माध्यमातून परत धन्यवाद देतो."
 
 
"मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने संमत केला आहे, जनतेच्या भावनांचा आदर ठेवून हा निर्णय झाला, तो न्यायालयात टिकला नसला तरी सरकार म्हणून आम्ही सर्व या समाजाच्या भावनांशी सहमत आहोत. न्यायालयाने याबाबतीत केंद्राला अधिकार आहेत असं सांगितले आहे, त्या अनुषंगाने आज आम्ही राज्यपाल महोदय याना भेटलो. राज्यपालांनी देखील आमचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले असून ते केंद्राला आमच्या भावना कळवतील.", असेही ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0