मुंबई : राज्यातील परिस्थिती सध्या बिकट बनत चालली आहे. कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे पण त्यासाठी आरोग्य व्यवस्था मात्र अपुरी पडत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आढावा घेताला. राज्यात पुरवठ्याअभावी लसीकरण रखडले व नवीन रोगाविषयी महत्त्वाची माहिती टोपे यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
पुरवठ्याअभावी १८-४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लांबणीवर
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात केवळ ३५ हजार कोवॅक्सिन उपलब्ध आहेत. अशात १ कोटीहून जास्त नागरिकांचं आतापर्यंत लसीकरण करण्यात झाले आहे. अद्यापही लसीकरण शिल्लक असताना लसी उपलब्ध नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. सर्वात महत्वाचे लसींच्या पुरवठ्याअभावी १८-४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लांबणीवर पडलं असल्याचे टोपे म्हणाले.
ऑक्सिजन निर्मिती करणार
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पण यासाठी आता राज्य तब्बल ३८ रुग्णालयांत हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याची महत्त्वाची माहिती राजेश टोपे यांच्याकडून दिली आहे.
राज्यात म्युकर मायकोसिस या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ
जीवघेण्या संसर्गाची साखळी रोखण्यासाठी राज्यभरात अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचेही ते म्हणाले. राज्यात अॅक्टिव्ह रुग्ण कमी होत असल्याचे राजेश टोपे म्हणाले. तर यावेळी त्यांनी एक गंभीर बाबही सांगितली. राज्यात म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढत असून त्यावर तातडीने उपचार केले गेले पाहिजे असे राजेश टोपे म्हणाले.
म्युकर मायकोसिसचा उपचार मोफत करणार
टोपे म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत म्युकर मायकोसिसचा उपचार मोफत करण्यात येणार आहे. तर या आजारावरील औषधही महाग असल्याने त्याचा पुरवठा सरकार करेल. तर दुसरीकडे लसींसाठीही सरकार मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत आहे. अनेकांना ऑफर देण्यात आली आहे. पण अद्याप काही उत्तर आलं नसल्याचे राजेश टोपे म्हणाले.