मराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही ; मुख्यमंत्री राजीनामा द्या !

    दिनांक  10-May-2021 16:14:50
|

vinayak mete_1  
मुंबई : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारनं गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच सरकारच्या हाती अपयश आले आहे. याची जबाबदारी स्वीकारून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना मेटे म्हणाले, मराठा समाज न्यायालयाच्या दृष्टीने मागास नाही, हे सुद्धा राज्य सरकारचे पाप आहे. आरक्षण रद्द करण्यात आल्याने आता नवीन कायदा होऊ शकत नाही. या सर्वांना आघाडी सरकार जबाबदार आहे. अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आणि घोडचुकीमुळे मराठा समाजाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनाची नाही तर मनाची असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी देखील मराठा आरक्षण गांभीर्याने घेतले नाही. त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मेटे यांनी केली.
'आरक्षणाचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राला द्यावा'
मुख्यमंत्री म्हणतात आम्ही केंद्राच्या पाया पडतो. पण त्यांनी आरक्षण द्यावं. केंद्राच्या पाया पडण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राला द्यावा आणि पुढची कारवाई करावी, असा टोला मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आणि घोडचुकीमुळे मराठा समाजाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे जनाची नाही तर मनाची असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असंही मेटे म्हणाले.
'कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मराठा समाजानं संयम बाळगला'
दरम्यान, राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे मराठा समाजानं संयम बाळगला आहे. पण लॉकडाऊन संपताच भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील मेटे यांनी दिला आहे. लॉकडाऊन झाल्यावर आम्ही बीडमध्ये अशोक चव्हाणांच्या विरोधात मोर्चा काढणार आहोत. राज्यातील एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असा उघड इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.