आॅक्सिजन पुरवठ्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांनी केंद्राचे मानले आभार

    दिनांक  10-May-2021 19:42:21
|
mumbai _1  H xमुंबई -
भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. कोरोना साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा अत्यंत महत्वाचा ठरला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यासाठी दिल्ली, महाराष्ट्रासह अनेक राज्य सरकार केंद्र सरकारवर दोषारोप करीत आहेत. परंतु, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
 
 
 
 
महानगरपालिकेचे आयुक्त सांगितले की, "१६-१७ एप्रिलच्या रात्री मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नसल्याचे मला समजले. या रुग्णालयात १६८ रुग्ण होते. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी मध्यरात्री १ ते पहाटे ५ या दरम्यान महानगरपालिकेकडून १५० रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या. सर्व रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आणले गेले, जिथे ३,६०० खाटा रिकामी होत्या. यापैकी ८५० खाटांना ऑक्सिजनची सुविधा होती. यावेळी सर्व रुग्णांचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश मिळाले. त्या रात्री मला झोप लागली नाही. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मी आॅक्सिजनच्या तुटवड्याची माहिती मेसेजव्दारे केंद्रीय गृह सचिव, आरोग्य सचिव आणि कॅबिनेट सचिव यांना दिली. तसेच मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्र्यांना देखील हा आॅक्सिजन तुटवड्याचा मेसेज पाठवला."
 
 
"हा मेसेज पाठवल्यानंतर १५-२० सेकंदामध्येच मला केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गुबा यांचा फोन आला. त्यांनी मला मदतीविषयी विचारले. मी त्यांना आॅक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात विचारणा केली. गुंबासोबत मी केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये काम केले होते. राज्यात इतक्या कमी वेळात आॅक्सिजनची निर्मिती होणार नसल्याची परिस्थिती त्यांना मी सांगितले. त्यामुळे मुंबईपासून १६ तासांच्या अंतरावर असणाऱ्या जामनगरमधील रिलायन्सच्या प्लांटमधून आॅक्सिजन आणण्याची परवानगी द्यावी, यासंदर्भात मी त्यांना विचारणा केली. केवळ एका शहरासाठी मी परवानगी देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी मी हे आॅक्सिजन महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाठवण्यात येईल, अशी ग्वाही मी त्यांना दिली. त्यानंतर त्याच संध्याकाळी आम्हाला १२५ मेट्रिक टन आॅक्सिजन जामनगरमधून आणण्याची परवानगी मिळाली. केवळ बोलण्याव्दारे आम्हाला केंद्र सरकारने मदत केली", असे चहल या मुलाखतीमध्ये चहल म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.