कष्ट आणि भलेपणाला पर्याय नाही

    दिनांक  10-May-2021 22:13:37   
|

sonawane _1  Hअवघ्या विश्वाचे कल्याण करायला जमणार नाही. मात्र, आपल्या स्तरावर सर्व मांगल्याची भावना आणि कार्य करणारे कुर्ला टर्मिनसचे स्टेशन डायरेक्टर सुरेश सोनवणे यांच्याविषयी...
 
 
“गुणवत्ता असेल, कष्ट करण्याची जिद्द असेल, तर जातीपातीची विषमता हा मुद्दा कधीच नसतो. आपण सर्व एक आहोत, मग न अनुभवलेल्या जातीय विषमतेबद्दल का बोलावं? संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये विश्वाचे कल्याण चिंतिले आहे. त्या कल्याणाचे आपण वारसदार आहोत,” असे सुरेश सोनवणे सांगत होते.
 
 
प्रचंड मेहनत आणि आपल्या हातून जे काही होईल ते मंगल आणि लोकहिताचेच होईल, अशी निःस्वार्थी भावना असलेले सुरेश सध्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये स्टेशन डायरेक्टर आहेत. कोरोनाकाळात महाराष्ट्रातून दुसर्‍या राज्यातील आपल्या घरी जाणार्‍या लाखो लोकांमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस अक्षरशः २४ तास कार्यरत होते आणि आहे. त्या कार्याचे सहभागी आहेत सुरेश सोनवणे. ‘स्टेशन डायरेक्टर’ म्हणून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सहकार्‍यांसोबत कुर्ला टर्मिनसचा शिस्तयुक्त आणि तितकाच देखणा कायापालट वाखणण्यासारखा आहे. आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचे पुजारी असलेले सोनवणे हे स्वतः कवी आहेत.
 
या सगळ्यापलीकडे सुरेश एक शिक्षकही आहेत. पण, शिक्षक म्हणजे रूढार्थाने शाळा महाविद्यालयात शिकवणारे शिक्षक नाहीत. तर रेल्वेमध्ये जे चतुर्थ श्रेणीतले कामगार परीक्षा देऊन वरच्या श्रेणीत जाण्यास इच्छुक आहेत. अशा कामगारांना सोनवणे आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून शिकवतात. ज्यांचे ज्यांचे ते शिक्षक होते किंवा आहेत, ते सारे आज चतुर्थ श्रेणीतून परीक्षा देऊन वरच्या श्रेणीत काम करत आहेत. त्यामुळे कामगार सोनवणे यांच्याकडे ‘बॉस’ किंवा ‘वरचा अधिकारी’ म्हणून पाहत नाहीत, तर आपल्या भल्यासाठी विचार करणारा भला माणूस म्हणूनच पाहतात.
 
या काळात चतुर्थ श्रेणी कामगारांचे खूप हाल होत होते. अशा वेळी सुरेश यांनी काही स्वयंसेवी संस्थांची माहिती काढली. या संस्थांद्वारे कर्मचार्‍यांना आवश्यक ती मदत केली. सुरेश हे कोणत्याही कामगार संघटनेत काम करत नसतानाही (वरिष्ठ पदावर असल्यामुळे) त्यांच्याकडे कितीतरी कामगार समस्या घेऊन येत असतात, अगदी घरगुतीही. त्यावेळी शांतपणे त्यांचे ऐकून संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातली एखादी नेमकी ओळ सांगून सोनवणे त्या कर्मचार्‍यांना सल्ला देतात.
 
 
सुरेश यांच्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा आहे. छत्रपती असतानाही शाहू महाराज समाजातील सामान्यातल्या सामान्य आणि वंचितातल्या वंचित व्यक्तींशी संवाद साधत, त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना योग्य ती मदत करत. जर शाहू महाराज इतके मोठे असून असे करतात, तर आपण कोण? त्यामुळे पदाची वर्गवारी न करता सगळ्यांना समानतेने पाहावे, असे सुरेश यांचे मत.
 
सुरेश यांचे वडील श्रीरंग हेसुद्धा रेल्वेत चतुर्थ श्रेणी म्हणून कामास रुजू झाले होते, तर आई मखमलबाई या गृहिणी. मूळचे सांगोल्याचे हे कुटुंब. कातडे कमावण्याचा पारंपरिक व्यवसाय. श्रीरंग यांचे वडील आणि आई वारकरी, त्यामुळे सुरेश यांच्या मनी पंढरीच्या विठुरायावर अतोनात श्रद्धा. वडील उत्कृष्ट चित्रकार. त्या काळात सुरेश यांच्या घरी चार-पाच वृत्तपत्र येत. त्यामुळे लहानपणापासून सुरेश यांना वाचनाची आवड. त्यावेळी सोनवणे कुटुंब मुलुंड पश्चिमेला राहायचे. 1970चे दशक. चाळीत काही व्यक्ती दारू पिऊन सज्जन लोकांना त्रास द्यायचे. त्यांच्याशी कोण वैर पत्करणार? पण, श्रीरंग यांनी कायदेशीर पावले उचलत न घाबरता त्या गुंडावर पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले.
 
 
या गोष्टीचा सुरेश यांच्यावर प्रभाव पडला. आपण समाजासाठी खारीचा तरी वाटा उचलायला पाहिजे, हे वडिलांचे म्हणणे. सुरेश यांना रेल्वेतच नोकरी करायची होती. पण, सुरेश महाविद्यालयात असताना वडिलांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. आलेल्या पैशातून टॅम्पो विकत घेतला आणि सुरेश सोडून बाकी सगळे गावी गेले. तिथे टॅम्पो वाहतूक व्यवसाय करावा, असा मानस होता. पण, एक-दोन वर्षांतच टॅम्पोचा अपघात झाला. टॅम्पो दुरुस्त करायला विम्याच्या पैशापेक्षा कितीतरी पट पैसे जास्त लागले. त्यासाठी बँकेकडून कर्ज काढावे लागले. मात्र, त्यामुळे घरची परिस्थिती बदलली. होत्याचे नव्हते झाले. मुंबईत शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी सुरेश दिवसभर शिकवणी घेऊ लागले.
 
 
दुसरीकडे कर्ज न फेडल्यामुळे टेम्पो बँकेने लिलावात काढला. हा प्रसंग लिहिताना तितकेसे काही वाटत नाही. पण, गावात भाऊबंदकी आणि समाजव्यवस्थेत ही मोठी गोष्ट होती. नोकरी नाही, हाताशी काही नाही. मात्र, या सगळ्या परिस्थितीकडे पाहत सुरेश एकच शिकले की, कुठेही नियोजन न करता किंवा भविष्याचा वेध न घेता कोणतीही गोष्ट करू नये. त्यांनी हा विचार आयुष्यात अमलात आणला. आलेल्या परिस्थितीने विचलित न होता ते अभ्यास करू लागले. आई-वडिलांना धीर देऊ लागले. दिवस पालटतील, असा विश्वास देऊ लागले.
 
 
सुरेश यांच्या मेहनतीला फळ आले. रेल्वेच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. कुर्डूवाडी रेल्वे स्थानकामध्ये ते स्टेशन मास्टर झाले. तिथेही ते पुढच्या परीक्षा देत उत्तीर्ण झाले, महाराष्ट्राबाहेरही त्यांची बदली झाली. पण, मनात एक विचार कायम, कष्टाला आणि भलेपणाला पर्याय नाही. त्यामुळे सगळीकडे त्यांची कारकिर्द चांगलीच होती. त्यानंतर ते कुर्ला टर्मिनसचे ‘स्टेशन डायरेक्टर’ झाले. रेल्वेत चतुर्थ श्रेणीत काम करण्यास रुजू झालेल्या पित्याचा आणि ही त्या समाजाची आनंदाची, अभिमानाची बाब आहे. पण, खरे म्हणजे सुरेश सोनवणे यांच्यासारखी माणसे जगातील कोणत्याही समाजाचे भूषणच आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.