हळद माझी लाडकी...

    दिनांक  10-May-2021 23:10:22
|
health.jpg 1 _1 &nbsलहापणापासूनच आपल्याला आई घरी हळदीचे दूध प्यायला देत असते. पण, अनेक जण ते हळदीचे दूध पितानाही नाक मुरडतात. आज या कोरोनाच्या संकटामुळे आपण पुन्हा हळदीचे दूध आणि काढ्याकडे वळलो आहोत. आता आपल्यालाच आपल्या या खाद्यसंस्कृतीचे गुणकारी महत्त्व पटू लागले आहे. हळदीचे महत्त्व सांगत असताना एक उद्योजिका जी आई आहे, ती अगदी भरभरून हळदीच्या महत्त्वाबद्दल सांगत आहे. ती म्हणजे सोनल लोहारीकर...
 
 
 
हळदीचे वैशिष्ट्य सांगताना सोनाली म्हणतात की“ ‘SDF Curcumin’ ही हळद परदेशात निर्यात केली जाते. जर्मनी, नेदरलॅण्ड्स, ऑस्ट्रेलिया, मध्य पूर्वेकडील देशांमध्ये आमची कंपनी हळदीसोबत इतर भारतीय वस्तूंची देखील निर्यात करते.” सोनाली लोहारीकर या भारताच्या पहिल्या उद्योजिका आहेत, ज्यांनी नागपूरची संत्री, जांभूळ, मोरींगा पावडर, देवगड हापूस, हळद आदी वस्तू निर्यात केल्या.
 
 
'Curcumin' हळदीची परदेशात खूप मागणी आहे आणि या हळदीचा उपयोग करून हळदीच्या औषधी ‘टॅब्लेट’ देखील तयार केल्या जातात आणि कर्करोग, हृदयरोग, फुप्फुसाचा संसर्ग, सर्दी, खोकला झालेल्या रूग्णांना त्या ‘टॅब्लेट’ दिल्या जातात. आज आपल्या देशातदेखील कर्करोेगग्रस्तांना या महाग गोळ्या खरेदी कराव्या लागतात.
 
 
हळदीचेदेखील बरेच प्रकार असतात. त्यात ज्या हळदीमध्ये ’Curcumin'चे प्रमाण जास्त, ती आपल्यासाठी जास्त चांगली. ‘टॅब्लेट’मधील हळद खाण्यापेक्षा प्रत्यक्षात खालेल्या हळदीचे शोषण शरीरात लवकर होते. ही हळद रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यात मदत करते.
 
 
सोनल लोहारीकर ओमानला दर महिन्याला किमान चार हजार मेट्रिक टन इतकी हळद निर्यात करतात. सोनल यांची इच्छा आहे की, अनेक महिलांनी पुढाकार घेऊन हळदीच्या व्यवसायात सहभागी व्हावे व आपापल्या विभागात हळद विकून स्वतःसाठी उत्पन्नाचे साधन निर्माण करावे.
 
 
आज ’SDF PVT LTD’च्या अंतर्गत २५०० शेतकर्‍यांचा माल निर्यात केला जातो. या निर्यातीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणताही मध्यस्थ नसल्यामुळे शेतकर्‍यांना चांगला फायदा मिळतो. ‘SDF ’ने ‘इन्स्टंट टर्मरिक मिल्क पावडर’ या नावीन्यपूर्ण उत्पादनाची देखील निर्मिती केली आहे.
 
 
तसेच या उत्पादनाचे ‘पेटंट’ व ‘ट्रेडमार्क’ त्यांच्याकडे आहे. या पावडरच्या वापरामुळे तुम्ही जगात कुठेही हळद पावडरच्या दुधाचा आनंद घेऊ शकता. संरक्षण क्षेत्रातील जवानांसाठी ही हळद पावडर अत्यंत उपयोगी पडू शकते. ज्याद्वारे त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल व शरीरात ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल.
 
 
‘इन्स्टंट टर्मरिक मिल्क पावडर’ विविध ‘फ्लेवर्स’मध्ये उपलब्ध आहे, जसे की, इलायची, चॉकलेट, केसर, ड्रायफ्रुट्स, मँगो आदी.सोनल लोहारीकर या स्वतः ‘सॉफ्टवेअर प्रोग्रामर’ असून लग्नानंतर त्या दुबईमध्ये स्थायिक झाल्या. तिथे घरबसल्या काही उद्योग करायचा म्हणून त्यांनी विविध प्रकारचे मसाले बनविण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर उकडीचे मोदक, दिवाळी फराळ व इतर महाराष्ट्रीय उत्पादने त्यांनी बनविली.
 
 
पहिल्यांदा आपल्या मित्रपरिवारात या वस्तू वाटल्या व नंतर दुबईमधील विविध सुपरमार्केटमध्ये विक्रीसाठी देऊ लागल्या. दुबईमधील सुप्रसिद्ध उद्योजक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांच्या ’अल अदिल’ सुपरमार्केटमध्ये लोहारीकर यांची विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली. हे त्यांचे सर्वात मोठे यश होते. खाद्यपदार्ध बनविण्याचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला.
 
 
कुटुंबावर संकट आल्यावर त्यांना पुन्हा मुंबईत यावे लागले. सर्व संकटांवर मात करून त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात केली. त्यांच्या मुलांनी आणि आईवडिलांनी त्यांना वेळोवेळी साथ दिली. आता त्या पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय उद्योग करीत आहेत, अशा धाडशी उद्योजिकेला सलाम!
 
 

- रचना लचके बागवे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.