‘मानसिक कल्पकते’च्या विश्वात...

    दिनांक  10-May-2021 22:36:49
|

health _1  H x
‘मानसिक कल्पकता’ ही आपल्या दैनंदिन आयुष्याचे नियोजन करण्यातही खूप महत्त्वाची ठरते. आपण बर्‍याचदा आपल्या आयुष्यातील विशेष प्रसंग किंवा भविष्याची योग्य आखणी करू शकतो. खरंतर या कल्पकतेच्या जोरावर अनेक गोष्टींची आणि प्रसंगाची आपण ‘ड्रेसरिहर्सल’ किंवा तालीम करू शकतो.
 
 
कल्पनेच्या जगात खूप काही घडत असतं, जितकं आपल्या वास्तविक जीवनात कधी घडत नाही. काही शास्त्रज्ञ ‘कल्पनाविश्वा’ला ‘मानसिक हातचलाखी’ (मेंटल मॅन्युप्युलेशन) म्हणतात. याला कारण म्हणजे व्यक्ती पूर्वी पाहिलेल्या वा अनुभवलेल्या घटनांचे वास्तव पुनर्रचित करतात किंवा त्या वास्तवाला आठवताना त्याचा एक नवीन कल्पित देखावा निर्माण करतात. कल्पनाविश्वात आपण आधी अनुभवलेले सत्य जसे आहे, तसे घडवू शकत नाही. त्याचा एक नवीन क्रम निर्माण केला जातो. म्हणून आपण तीच माणसं कधी नव्या रुपात पाहतो किंवा पूर्वी घडत गेलेल्या प्रसंगांत मूळ माणसं न पाहता नवीन किंवा इतर माणसं पाहतो. पण, या सगळ्या पुनर्रचना म्हणा किंवा ‘मेंटल मॅन्युप्युलेशन’ म्हणा, हे खरंतर आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. आपल्या मनात जे काही आपल्याला अपेक्षित आहे, ते कल्पनाविश्वात चाचणीत्मक प्रक्रियेतून घडत जाते. कल्पनेचे विश्व हे आपण आपल्या नकळत अप्राप्त गोष्टींना उपलब्ध करण्यासाठी वापरत असतो.
 
 
विधायक कल्पकतेत आपण आपल्याच भावविश्वातल्या गोष्टींपासून एक नवीन परिस्थिती निर्माण करत असतो. साध्या गोष्टींतून एक विलक्षण सुंदर चित्रपटाचे ‘स्क्रीप्ट’ जसे लेखक बनवतो, त्यात विधायक कल्पकता असते. न्यूटनने जेव्हा वरुन जमिनीवर पडणार्‍या गोष्टींतून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, तेव्हा त्याची ती बौद्धिक कल्पकता होती आणि यात ज्ञानाचा उद्देश महत्त्वाचा आहे. बर्‍याच वेळा आपण पिकनिकला जातो, अशावेळी आपल्याला काय लागेल, आपण कुठे थांबणार आहोत, किती वेळ थांबणार, खाण्याची व्यवस्था कशी करायची, या सगळ्या गोष्टी, व्यवहार, चतुर कल्पनांवर अवलंबून असतात. यात आपल्या आतापर्यंतच्या अनुभवांचे व्यवस्थित विश्वेषण करून आधी एक काल्पनिक नियोजन केले जाते आणि ते वास्तवात नियोजन करताना नंतर खूप फायदाचे ठरते.
 
 
आपण सगळेच ताज महालला सुंदर वास्तू मानतो. जगातील अप्रतिम वास्तू ती कित्येक वर्षे प्रेमाचे मूर्त प्रतीक म्हणून आपण तिचे कौतुक करतो. शाहजहाँच्या प्रेमाचं प्रतीक असलेला ताज हा सौंदर्यात्मक कल्पकतेचा सुंदर नमुना आहे. सौंदर्यात्मक कल्पकता ही अफाट व अचाट सुंदर लावण्याचं सृजनात्मक मूर्तरूप करताना त्यात विधायक निर्मितीक्षमतेचा विशेष प्रयोग करत असते. यात भाव व विचार यांचा अनोखा संगम आपण पाहतो. एखादा श्रेष्ठ संगीतकार जेव्हा गाण्याला चाल लावतो, तेव्हाही असाच एक सौंदर्यात्मक काव्यात्मकतेचा आविष्कार आपल्याला दिसतो. खरंतर अशा कलाकृतीच्या निर्मितीतून कलाकार आपली सौंदर्याबद्दलची खास ओढ मूर्तरुपात व्यक्त करत असतो. यात एक आंतरिक झपाटलेपण असतं, एक कल्पनातील वेडेपण असतं. यात सर्जनशीलता खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य अनुभवत असते. त्यात कुठल्याही व्यावहारिक बंधनांचा दबाव नसतो.
 
 
 
या अशा कल्पकतेत काळाच्या, धर्माच्या, इतिहासाच्या वा भूगोलाच्या मर्यादा न पाळता केवळ अचाट सौंदर्याला दाद मिळवण्याची प्रचंड ताकद असते. कधीकधी आपण आपल्या स्मृतिकोषातून काही प्रतिमा आठवतो, त्या जशा मूळ स्वरुपात असतात तशाच आपण आठवतो. पण, कधीकधी त्या आपण आपल्या कल्पनाविश्वात जोडून पाहतो आणि त्यातून सुंदर स्त्रीचा चेहरा असलेली मत्स्यकन्या, जलपरी आपल्या कल्पनाविश्वात जन्म घेते, ही खर्‍या अर्थाने काल्पनिक विश्वात निर्माण होणारी प्रतिमा आहे, ती वास्तवाच्या जवळपास असते, पण वास्तव मात्र नक्कीच नसते.
 
 
 
 
‘मानसिक कल्पकता’ ही आपल्या दैनंदिन आयुष्याचे नियोजन करण्यातही खूप महत्त्वाची ठरते. आपण बर्‍याचदा आपल्या आयुष्यातील विशेष प्रसंग किंवा भविष्याची योग्य आखणी करू शकतो. खरंतर या कल्पकतेच्या जोरावर अनेक गोष्टींची आणि प्रसंगाची आपण ‘ड्रेसरिहर्सल’ किंवा तालीम करू शकतो. जीवनात नक्की गोष्ट कुठे सुलभ होतील आणि कुठे क्लिष्ट असतील, याचा आढावा आपल्याला घेता येतो. आजच्या काळात तर ‘फोबिया’सारख्या मानसिक आजारात या कल्पकतेचा वापर उपचार देण्यासाठी मानसशास्त्रज्ञ करतात.
 
 
कल्पकतेचा विधायक वापर आपण आपल्या सर्वसामान्य समस्या सोडविण्यासाठीही करू शकतो. मुळात कल्पनाविश्वात आपण आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवांचे सकारात्मक विवेचन कसे करतो आणि त्याचा उपयोग आपल्या आयुष्यातून काही उत्तम धडे घेण्यासाठी कसे करतो, यावर खूप काही अवलंबून आहे. अर्ल्बट आईनस्टाईननी म्हटलं आहे की, “कल्पकता ही ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाची आहे.” कल्पकतेतून नवनिर्मिती घडत जाते. मुलांमध्ये जबरदस्त कल्पकता असते. ते एखादी संवेदनात्मक गोष्ट वाचताना त्या गोष्टीचं सुंदर, कल्पनिक विश्व निर्माण करतात. अर्थात, काल्पनिक जग हे वास्तवापासून जरी खूप दूर असलं, तरी चतुर माणसं त्यातून बरंच काही शिकतात आणि जगाला शिकवतात.


 -  डॉ. शुभांगी पारकर
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.