‘हिंदू लाईव्हज मॅटर’

    दिनांक  10-May-2021 22:03:21
|
Hindu LIVES matter _1&nbs
आज जगातील विविध देशांतील हिंदू भारतीय हिंदूंसाठी निदर्शने करू लागले. पण, अशीच एकजूट इथल्या आणि तिथल्या हिंदूंनी कायमस्वरूपी दाखवली तर ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळीची गरज उरणार नाही.
 
 
 
विधानसभा निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचे स्पष्ट झाले आणि ममता बॅनर्जींच्या गुंडांनी राज्यभर हैदोस घातला. विरोधकांच्या रक्ताला चटावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, ममतांच्या प्रिय बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी भाजप कार्यकर्ते, हिंदूंच्या घरादारांवर हल्लाबोल केला. डझनभर हिंदूंचा त्यात बळी गेला, तरीही एरवी मंदिरात कुकृत्य करण्यासाठी गेलेल्या मुस्लीम पोराला हटकले, तर ठो ठो बोंबा मारणार्‍यांनी त्यावर चकार शब्दही काढला नाही. पण, देशातील तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारवादी टोळके हिंदूंचा नरसंहार होताना ढाराढूर झोपलेले असले तरी इथल्या हिंदूंसह जगभरातील हिंदूंनी तृणमूलच्या गुंडगिरीचा विरोध केला.
 
 
 
पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या हत्यासत्राचा निषेध केला आणि हिंदूंनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे, असे ठणकावून सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी, बांगलादेशी-रोहिंग्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराच्या उत्तरादाखल युनायटेड किंग्डम, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जॉर्जिया, नायजेरियातील अनिवासी भारतीय हिंदू रस्त्यावर उतरले आणि त्यातूनच ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळ सुरू झाली.
 
 
मागील वर्षी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईडनामक अश्वेतवर्णीयाचा गौरवर्णीय पोलिसाच्या अत्याचारात जीव गेला आणि त्यानंतर ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ विषय तिथे चर्चेत आला. त्यावर देशी पुरोगाम्यांनी चांगलेच अश्रू ढाळले होते. पण, त्यांना पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस समर्थित हिंदूंवरील अन्याय दिसला नाही. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त भारतातील मुस्लिमांवरील कथित हिंसाचाराचे चित्र असते. त्यात तथ्य नसले तरी त्यावरून ते बेंबीच्या देठापासून ओरडताना दिसतात. पण, हिंदूंचा मुद्दा आला की, तमाम पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि उदारवादी कंपूच्या डोळ्याला पट्टी आणि तोंडाला बूच लागते. तथापि, त्यांनी मौन बाळगले तरी देशातील आणि जगातील हिंदू शांत बसणार नाही.
 
 
 
आपल्यावरील अन्याय-अत्याचाराविरोधात जोरदार लढा देईल आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हल्ल्यांमुळे सुरू झालेली ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळ आणखी वेगाने वाढेल. फक्त त्यानंतर आता गप्प बसलेल्यांनी आक्षेप घेऊ नये, ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळीमुळे समोर येणार्‍या परिणामांवर थयथयाट करू नये, हिंदुत्व आणि हिंदूराष्ट्राचे नाव घेऊन विरोध करू नये, तर जे जे होईल ते ते निवांत पाहावे. कारण, हिंदूंच्या उद्रेकाला कारणीभूत देशातील ढोंगी सेक्युलरवाद्यांची तृणमूल काँग्रेसचे गुंड कार्यकर्ते, बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांच्या हिंसाचारावेळी बसलेली दातखीळच असेल.
 
 
 
दरम्यान, ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळ काहीशी उशिरा सुरू झाल्याचे इथे नमूद करावे लागेल. कारण, पारतंत्र्यातील एक हजार वर्षे वगळली, तरी निदान भारताची फाळणी झाली, त्यावेळी ‘हिंदू लाईव्हज मॅटर’चा विषय पुढे यायला हवा होता. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान मिळाल्याच्या उन्मादात धर्मांध मुस्लिमांनी भारताच्या दोन्ही सीमांवरील हिंदूंना मारून टाकण्याचे काम सुरू केले. पाकिस्तानातून शेकडोंच्या संख्येने रेल्वेतून किंवा कोणत्याही वाहनातून येणार्‍या हिंदूंची अवस्था छिन्नविछिन्न झालेले मृतदेह, बलात्कार केलेल्या स्त्रिया, हात-पाय तोडलेले लोक अशीच विदारक होती. पण, दुर्दैवाने त्यावेळी ‘हिंदू लाईव्हज मॅटर’चा मुद्दा समोर आला नाही.
 
 
त्यानंतरही पश्चिम बंगाल, केरळमध्ये राजकीय हिंसाचारात हिंदूंचे मुडदे पडत होते, तर कट्टरपंथी मुस्लीम वा ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या ‘लव्ह जिहाद’, धर्मांतराच्या कामाने हिंदूंच्या संस्कृतीचा बळी जात होता. तेव्हाही ‘हिंदू लाईव्हज मॅटर’चा विषय उपस्थित झाला नाही. पुढे काश्मीर खोर्‍यात तर कट्टरपंथीय मुस्लीम, फुटीरतावादी, पाकिस्तानी घुसखोर व दहशतवाद्यांनी मशिदीतून भोंगे लावून ‘हिंदूंनो, तुमच्या मुली-महिलांना इथेच सोडा व पुरुषांनी निघून जा,’ असे आवाहन करत पंडितांना पलायन करण्यास भाग पाडले, तरीही ‘हिंदू लाईव्हज मॅटर’चा विचार समोर आला नाही. पण, आता मात्र, ‘हिंदू लाईव्हज मॅटर’चा मुद्दा आक्रमकपणे मांडला जाईलच आणि ‘हिंदू लाईव्हज’वर हल्ला करणार्‍यांच्या विरोधात देश-विदेशात निदर्शने केली जातीलच, असेच आताच्या तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचाराच्या विरोधावरून दिसून येते. पण, फक्त निदर्शने करून तृणमूल काँग्रेस किंवा अन्य हिंदुद्रोह्यांनी सुरू केलेला हिंदू नरसंहार थांबेल का?
 
 
 
इतिहासकाळापासून ते आजपर्यंत हिंदूंमध्ये विभाजन झाले, तेव्हा तेव्हा नुकसान पोहोचल्याचे, तूट-फूट झाल्याचेच दिसते, तर हिंदू एकजुटीच्या काळी मात्र देश टिकून राहिला, हिंदूधर्मीय टिकून राहिले. आजही पश्चिम बंगालमध्ये हिंदूविरोधी हिंसाचार का होत आहे? तर त्याच एकतेच्या अभावामुळे! हिंदूंनी एकत्रितपणे, ठामपणे हिंदूहित जपणार्‍यांच्या पाठीशी उभे राहिले, तर कोण मायीचा लाल अन्याय-अत्याचार करायला धजावेल? नुकताच तामिळनाडूतील पेरंबलुर जिल्ह्यातील व्ही कलाथुर मुस्लीमबहुल परिसरातील मुस्लिमांनी हिंदूंच्या सणांना पापकृत्य ठरवत मिरवणुका, अनुष्ठान, यात्रा वगैरेंवर बंदीसाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली. पण, यातून हिंदूंसमोर पुढच्या काळात कोणते संकट येऊ शकते, याचा दाखला मिळतो.
 
 
मुस्लीम बहुसंख्य असतील तर तिथे अल्पसंख्य हिंदूंनी आपल्याच देशात सण साजरे करू नये, अशी इथल्या कट्टरपंथीय मुस्लिमांची भावना असल्याचे यातून दिसते. सध्यातरी त्यांनी न्यायालयाचा मार्ग वापरला. पण, तिथून त्यांची धर्मांध वृत्ती शमवली जात नाही, हे पाहून ते त्यापुढचे पाऊलही उचलू शकतात. जसे आता पश्चिम बंगालमधील हिंदूंना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून, बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांकडून मारले जाते, कधी दुर्गापूजा विसर्जन मिरवणुकीची वेळ-मार्ग बदलला जातो, कधी मंदिरांवर हल्ले केले जातात, तसे इतरत्रही होऊ शकते.
 
 
म्हणूनच हिंदूविरोधी कृत्ये थांबवायची असतील, तर हिंदूंच्या संघटनाला, हिंदूंच्या ‘ईको सिस्टीम’ला पर्याय नाही. ते केले तर ‘हिंदू लाईव्हज’चा मॅटर धारदारपणे मांडता येईल. आज जगातील विविध देशांतील हिंदू भारतीय हिंदूंसाठी निदर्शने करू लागले. पण, अशीच एकजूट इथल्या आणि तिथल्या हिंदूंनी कायमस्वरूपी दाखवली तर ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळीची गरज उरणार नाही. कारण, आताची चळवळ एका बाजूने कितीही प्रेरणादायी असली तरी हिंदूंच्याच देशात, हिंदूंवर, हिंदूंच्याच जीवन जगण्याच्या अधिकाराची मागणी करण्याची वेळ येणे दुसर्‍या बाजूने दुर्दैवी घटनादेखील आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.