‘पंचांचा निर्णय अंतिम राहील!’

    दिनांक  01-May-2021 21:20:30
|

prashant bhbad_1 &nb


हजारो विद्यार्थी व अनेक खेळाडूंना घडविणारे जु. स. रुंगटा हायस्कूलचे क्रीडाशिक्षक प्रशांत भाबड यांचे दि. २५ एप्रिल रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या एका विद्यार्थ्याने भाबड सरांना अर्पण केलेली ही शब्दसुमनांजली...

आज पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. ती व्यक्ती म्हणजे ‘भाबड सर’ भाबड सर आमच्या शाळेचे म्हणजे जु. स. रुंगटा हायस्कूलचे क्रीडाशिक्षक. सरांनी हजारो विद्यार्थी व अनेक खेळाडू घडवले. सरांकडे पहिली ‘सीडी-१००’ दुचाकी होती, तिचा आवाज शाळेच्या प्रवेश बोळीतून आला की, पटांगणात असलेल्या सर्व मुलांची नजर लगेच बोळीकडे जाई आणि रिकामी फिरणारी पोरं लगेच वर्गाकडे पळायची, हा सरांचा दरारा आणि आदरयुक्त भीती. सर जर सभागृहात नसतील आणि शाळेतल्या सभागृहात एखादा कार्यक्रम चालू असेल तर प्रमुख पाहुण्यांच्या रटाळ भाषणादरम्यान होणारी शेकडो मुलांची चुळबूळ आणि आवाज क्षणार्धात शांत झाला, तर समजायचं की भाबड सर पुन्हा सभागृहात आलेत म्हणून.

सरांचा मार आणि शिव्या खाल्ल्या नसेल, असे क्वचितच विद्यार्थी आणि खेळाडू असतील. शाळेत एक तास संपल्यावर दुसर्‍या तासाचे शिक्षक येईपर्यंत वर्गातील मुलांंचा गोंगाट पटांगणावर असलेल्या सरांच्या कानावर पडला, तर ते तिथूनच त्या वर्गातील बरोबर अशा खोडकर मुलांची नावं मोठ्याने पुकारायचे की, वर्गाचा आवाज एकदम बंद. सर वर्गात व सभागृहात मुलांकडून ओंकार, सूर्यनमस्कार घेत. वर्गात येऊन इंग्लिश व्याकरण शिकवत, तसंच घरात मुलांचा अभ्यास घेताना ते स्वतः काय नवीन शिकले, तेसुद्धा आम्हाला सांगायचे. अनेक खेळाडू मुलं जी अभ्यासात थोडी मागे असायची त्यांना सर स्वतः गणित आणि अक्षर सुधारावं म्हणून एखाद्या मित्राप्रमाणे त्यांच्या सोबत बसून शिकवायचे.

बर्‍याच वेळेस मधल्या सुट्टीत सर विद्यार्थ्यांच्या डब्यातल्या भाज्यासुद्धा आवडीने खात आणि विद्यार्थीसुद्धा मोठ्या आवडीने सरांना जेवायला बोलवत. स्पर्धेसाठी बाहेर जाताना एखाद्या खेळाडूला जेवणाचा डब्बा घरून मिळणं होत नसे, तर सर स्वतः जास्त भाजी पोळी आणायचे व संघातील इतर खेळाडूंना पण जास्तीचं आणायला लावत असत.सरांचा खेळावर आणि खेळाडूंवर अतोनात जीव. खरंतर आज कोरोनाच्या बचावासाठी माझ्यासारख्या खेळाडू आणि विद्यार्थ्यांचे जे सुदृढ शरीर आहे, त्यात भाबड सरांचा मोलाचा वाटा आहे. खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कॅरम, हँडबाल, चेस असे विविध खेळ सरांनी शिकवले आणि स्वतःही खेळले. नियमित मैदानावर सराव घेताना मैदान बनवणं, पाणी मारणं, स्वतः मैदानात उतरून खेळणं, विविध शिबिरं भरवून त्या त्या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडूंना मार्गदर्शनासाठी बोलावणं, दर सरावाशेवटी आणि सामना खेळण्याआधी,
मनोजवंमारुततुल्यवेगं
जितेन्द्रियंबुद्धिमतांवरिष्ठ।
वातात्मजंवानरयूथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।
अस बजरंगबलीचे नामस्मरण करणं, सामना खेळताना जीव ओतून खेळण्याच्या सूचना देणं, तेही त्यांच्या विशिष्ट शैलीत. असं खेळ, खेळाडू, मैदान आणि भाबड सर यांचं समीकरण. भाबड सरांचे बालपण जुने नाशिक येथील ऐतिहासिक अशा गुलालवाडी व्यायामशाळेच्या सान्निध्यात गेले. तिथे त्यांची मैदानावरच्या लाल मातीशी नाळ जुळली ती कायमचीच. सरांची आई प्राथमिक शिक्षिका आणि वडील बँकेत नोकरीस होते. मित्रांचा हा पश्या लेझीम पथक आणि कबड्डीचे धडे घेत मैदानावरील खेळातील शिस्त व संस्कार शिकत लहानाचा मोठा झाला.


भाबड सरांचे महाविद्यालयीन शिक्षण पंचवटी कॉलेजला झाले, तिथून ते खर्‍या अर्थाने उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून मैदाने गाजवू लागले. पुढे ‘बीपीएड’ला अ‍ॅडमिशन घेऊन पुणे विद्यापीठाकडून ‘नॅशनल हँडबॉल’ संघात गोलकीपर म्हणून स्थान मिळवलं. घरातील मोठा मुलगा असल्याने, भाबड सरांनी नवजीवन पब्लिक स्कूल, सेंट फ्रान्सिस व रुंगटा हायस्कूलमध्ये मानधनावर क्रीडाशिक्षक म्हणून काम केले, तेव्हा त्यांनी फुटबॉल, क्रिकेट सारखे खेळ अवगत करून त्या त्या शाळांचे अजिंक्य संघ तयार केले. १९९७ नंतर सर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक या संस्थेत कायमस्वरूपी क्रीडाशिक्षक या पदावर रुजू झाले. संस्थेच्या इगतपुरी व सिन्नर येथील शाळेमध्ये असताना व्हॉलीबॉल व कबड्डीचे अनेक राष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडवले.

काही वर्षांनंतर सर जु. स. रुंगटा हायस्कूलला आले. येथे कॅरम, व्हॉलीबॉल, क्रिकेट त्याचबरोबर खो-खो खेळाचे अनेक खेळाडू आणि मजबूत संघ तयार केले. खो-खो खेळाचा संघ तर अगदी शून्यातून सरांनी बनवला.खेळावर व खेळाडूंवर घेतलेल्या मेहनतीने पुढे संघ आणि अनेक खेळाडू राज्यस्तरावर चमकू लागले. याचबरोबर शाळेच्या मैदानावरील सराव झाल्यावर यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर कबड्डी व व्हॉलीबॉलच्या वरिष्ठ संघांना मार्गदर्शन करायला जाणं, यशवंत व्यायामशाळेच्या नूतनीकरणात मोलाचा हातभार लावणं, ‘नाशिक कबड्डी असोसिएशन’चे काम करणं, नाशिक फेस्टिवल असो की, ‘एनकेपीएल’ असो की ‘सीएम’ चषक, या सर्व स्पर्धा यशस्वी आयोजनामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे.तसेच खेळाडूंना आरोग्य विमा, कबड्डीसाठी मॅट, अधिकाधिक खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी मार्गदर्शन सरांनी अगदी शेवटपर्यंत केले.बर्‍याच वेळेस सामना चालू असताना पंचांकडून फाऊल किंवा निर्णय देताना चुका होत असत, तेव्हा मात्र भाबड सरांचा पारा एक प्रशिक्षक म्हणून आणि हाडाचा खेळाडू म्हणून खूप चढायचा अगदी अंगावर धावून जाण्यापर्यंत. नावातील ‘प्र’ प्रमाणे प्रलोप आणि ‘शांत’प्रमाणे मग सर स्वतःच शांत होऊन आपल्या पूर्ण संघाला सांगत की, “पंचांचा निर्णय अंतिम असतो”.

सर जिंकल्यावर असो किंवा हरल्यावर असो, प्रत्येकाच्या चुका सांगायचे.मला वाटतं, सर जीवनातील प्रत्येक परिस्थिती एखाद्या सामन्याप्रमाणे खेळले, अगदी जीव ओतून. सरांचे बरेच अपघात देखील झाले. पण, ‘बेड रेस्ट’ असतानाही मैदानावर येऊन सराव घेणं आणि अगदी ठणठणीत बरं होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरून प्रात्यक्षिक दाखवून खेळाडूंना शिकवणं, अशा आयुष्याच्या आणि विविध स्तरावरील अनेक सामन्यांत त्यांनी विजय मिळवला. पण २५ एप्रिल, २०२१ला जीवनाच्या अशा मोठ्या सामन्यात नेहमीप्रमाणे सर जीव ओतून आणि शर्थीचे प्रयत्न करूनसुद्धा सामना हरले. या वेळेस वरती असणार्‍या पंचाकडून चूक निश्चित झालीय; पण पुढे काही पंचांना बोलायच्या आत सरांनीच सांगितलेली गोष्ट परत आठवते की, ‘पंचांचा निर्णय अंतिम राहील!’

- प्रणव जोशी
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.