एमपीएससी परीक्षा पुढं ढकला ; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्याना फोन

09 Apr 2021 13:01:26

Raj _1  H x W:


मुंबई :
राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी परीक्षा पुढं ढकला अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी दोघांमध्ये एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आश्वासन दिले नसले तरी त्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे समजते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

एमपीएससीची पूर्व परीक्षा ११ एप्रिलला होणार आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोव्हिड विषाणूची लागण होऊ शकते. तर अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वीच कोरोना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.



मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून एमपीएससीच्या परीक्षेबाबत चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राज ठाकरेंच्या या मागणीला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे. आता एमपीएससीच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरेंसोबत इतर नेत्यांनीही एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
Powered By Sangraha 9.0