महाराष्ट्रालाच सर्वाधिक करोना लसपुरवठा

    दिनांक  09-Apr-2021 22:01:30
|
mhv_1  H x W: 0

ठाकरे सरकारची बनवाबनवी पुन्हा उघड
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्रास अतिशय नगण्य लसपुरवठा केला जात असल्याचा राज्य सरकारचा आरोप सपशेल खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. केंद् सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रास सर्वाधिक १ कोटी १० लाख ७८ हजार ५०० लसींचा पुरवठा केला असून अतरिक्त १४ लाखांहून अधिक लसींचा पुरवठादेखील मार्गात आहे. त्यामुळे करोना व्यवस्थापनाचे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार कसरती करीत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
 
महाराष्ट्रास केंद्र सरकारने १ कोटी १० लाख ७८ हजार ५०० लसींचा पुरवठा केला आहे. त्यापैकी वापर केलेल्या आणि वाया गेलेल्या लसींची एकुण संख्या ही ९५ लाख १४ हजार ६५० (१.८५ टक्के) एवढी आहे. त्याचप्रमाणे राज्यास आणखी द्यावयाच्या १४ लाख ८३ हजार ९७० लसींचा पुरवठादेखील मार्गात आहे. म्हणजेच राज्याकडे आजघडीला ३० लाख ४७ हजार ५२० लसी उपलब्ध असणार आहेत. असे असतानादेखील राज्य सरकारकडून याविषयी राजकारण केले जात आहे.
 
 
 
महाराष्ट्रास गतवर्षापासूनच करोनाचे व्यवस्थापन करणे जमलेले नाही. महाराष्ट्रामुळेच देशाचा करोनाविरोधातील लढा कमकुवत होत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीदेखील जाहिरपणे सांगितले आहे. ठरवून दिलेल्या वयोगटाशिवाय लसीकरण करून घेण्याचे प्रकारही महाराष्ट्रात घडले आहेत. त्याचप्रमाणे ५ लाखांहून अधिक लसी या वाया गेल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकार आकडेवारीची बनवाबनवी करीत आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात कमी लसपुरवठा होत असल्याचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे उघड झाले आहे.
 
 
 
केंद्र सरकार भाजपशासित राज्यांना लसपुरवठ्यात झुकते माप देत असल्याचा धादांत खोटा आरोपही करण्यात येत आहे. मात्र, काही प्रमुख राज्यांची आकडेवारी पाहिल्यास हा दावा खोटा असल्याचे समोर येते. आकडेवारीनुसार राज्याला १ कोटी १० लाख ७८ हजार ५०० (लोकसंख्या – १२,३९,६१,०००) लसी पुरविण्यात आल्या आहेत. त्याचवेळी भाजपशासित गुजरातमध्ये (लोकसंख्या – ६,९४,०२,०००) १ कोटी ५ लाख १९ हजार ३३० लसी, बिहारला (लोकसंख्या – १२,३४,४१,००० ) ५५ लाख ४० हजार ९७०, उत्तर प्रदेशात (लोकसंख्या – २२,९६,७२,०००) ९२ लाख ९ हजार ३३० लसी पुरविण्यात आल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसशासित राजस्थानला (लोकसंख्या – ७,८८,६१,०००) १ कोटी ४ लाख ९५ हजार ८६० लसी पुरविण्यात आल्या आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.