संघनिष्ठ शोधण्याऐवजी 'वाझे' शोधा : केशव उपाध्ये

07 Apr 2021 14:05:37

valase patil_1  



मुंबई : नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गृहखात्याचा कारभार स्वीकारताच गृह खात्यातील संघनिष्ठ अधिकारी शोधण्याचे जाहीर केले. संघ देश प्रेम शिकवतो. संघनिष्ठ अधिकारी शोधण्यास वेळ घालविण्यापेक्षा विविध खात्यात भ्रष्ट व्यवहार करणारे जे ‘वाझे’ अद्याप दडलेले आहेत त्यांना शोधून काढावे , ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते  केशव उपाध्ये यांनी लगावला. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 

काय म्हणाले होते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील...
दरम्यान, राज्याच्या पोलिस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठा असलेले अनेक अधिकारी आहेत. याबाबत सर्व माहिती घेण्यात येईल. कुणाच्या काय निष्ठा आहेत त्याची माहिती घेऊन आवश्यक तसा निर्णय घेऊ, असा इशारा नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारला.
पदभार स्वीकरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे गृहखात्याचा पदभार पाच वर्षे होता. त्यामुळे गृहखात्यातील अधिकारी त्यांच्या संपर्कात असणे स्वाभाविक आहे. त्यातून कसा मार्ग काढायचा याबाबत विचार केला जाईल. कठीण काळात गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिस दलाचे सक्षमीकरण करणे ही महत्त्वाची बाब आहे. तसेच प्रशासकीय कामात माझ्याकडून हस्तक्षेप होणार नाही, अशी ग्वाही वळसे पाटील यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0