महाराष्ट्रात ८१ लाख लसीकरण ; तरीही केंद्राच्या नावाने शिमगा सुरूच

    दिनांक  07-Apr-2021 13:57:00
|Thackeray _1  H


केंद्राकडून राज्याला महत्वपूर्ण सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटीवरुन केंद्राच्या नावाने बोंबाबोंब करणारे राज्य सरकारचे नेते आता लसीच्या पुरवठयावरुन केंद्राच्या नावाने शिमगा करीत आहेत. मात्र राज्य सरकारच्या नेत्यांच्या केंद्रावरील टीकेची धार बोथट करणारी माहिती केंद्र सरकारने समोर आणली आहे. महाराष्ट्रात 81 लाख लसीकरण झाल्याची माहीती केंद्र सरकारने दिली आहे. त्यासोबत लसीकरण राबविल्याबद्दल राज्याचे कौतुकही केले आहे.

महाराष्ट्रामध्ये 81 लाखांपेक्षा जास्त लोकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे आणि आठ लाखांपेक्षा जास्त लोकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव राजेश भूषण यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांकडून लसीकरण मोहीम अतिशय प्रभावी पद्धतीने राबवली जात असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. नवी दिल्ली येथे नॅशनल मीडिया सेंटरमध्ये वार्ताहरांशी बोलताना त्यांनी कोविड-19 प्रतिबंधासाठी उचललेल्या पावलांची, सज्जतेची आणि सद्यस्थितीची माहिती दिली. लसीकरण मोहीम राबवताना गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि केरळ यांनी देखील चांगली कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. मृत्यूंचे प्रमाण कमी करणे आणि त्याचबरोबर आरोग्य सेवा प्रणालीचे रक्षण करणे हा अशा प्रकारच्या लसीकरण मोहिमेचा उद्देश असतो, असे ते म्हणाले.

संपूर्ण देश या महामारीशी संपूर्ण ताकदीनिशी संघर्ष करत आहे आणि आपल्याला कोविड प्रतिबंधक वर्तन, प्रतिबंध, चाचण्या, रुग्णालयांची सज्जता आणि सर्वत्र लसीकरणाची व्याप्ती वाढवणे, विशेषतः अतिशय गंभीर स्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये या उपाययोजना केल्या पाहिजेत, असे नीती आयोगाचे सदस्य(आरोग्य) डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले. देशातील सातत्याने वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कोविड प्रतिबंधासाठी योग्य वर्तनाचा अंमल करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकां ना केले. कोविड-19 विरोधातील संघर्षामध्ये पुढील चार आठवडे अतिशय महत्त्वाचे असून या महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी जन भागीदारीची एक सकारात्मक लाट अतिशय महत्त्वाची ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.