यज्ञ रक्षावे, ध्वज उभारावे...!

07 Apr 2021 21:08:17

Yadnya_1  H x W
 
 
 
यज्ञ संस्कृतीची जोपासना करावी, जीवनात पावित्र्य आचरावे, नेहमी श्रेष्ठ कर्म करावे आणि भौतिक अग्नी प्रज्वलित करावा व नंतर सर्वांनी मिळून प्रेमाने व आनंदाने विजयाचे प्रतीक ‘ध्वज’ उंच उभा करावा. हा ध्वज अशा प्रकारे मजबूतीने भूमीमध्ये स्थापन करा की तो कधीही उखडून पडता कामा नये.
आदित्या रुद्रा वसव: सुनीथा द्यावाक्षामा पृथिवी अन्तरिक्षम्।
सजोषसो यज्ञमवन्तु देवा: ऊर्ध्वं कृण्वन्त्वध्वरस्य केतुम्॥
(ऋग्वेद ३.८.८)
अन्वयार्थ
 
(आदित्या) अखंडित जीवनाचे लेणे प्राप्त झालेल्या बलवंतांनी (रुद्रा:) रौद्रस्वरूपी शूरवीर सैनिकांनी (वसव:) सर्वत्र विचरण करणाऱ्या धनिकांनी (सुनीथा) उत्तम नीतिमत्ता असलेल्या विद्वानांनी, (पृथिवी) विशाल व रुंद अशा (द्यावाक्षामा) द्युलोक आणि पृथ्वीमातेने, (अन्तरिक्षम्) अंतरिक्षात राहणाऱ्या जीवजंतूंनी, (देवा:) दिव्य गुणयुक्त परोपकारी विद्वानांनी (सजोषस:) एक दुसऱ्यांशी प्रेमपूर्ण व्यवहार करीत (यज्ञम्) यज्ञ, पवित्र कार्य व संस्कृतीचे (अवन्तु) रक्षण करावे आणि (अध्वरस्य) यज्ञाच्या (केतुम्) पवित्र अशा ध्वजाला (ऊर्ध्वम्) उंच (कृण्वन्तु) (उभे) करावे.
 
विवेचन
 
ध्वज किंवा झेंडा हे आपल्या विजयाची निशाणी आहे. कोणताही देश, राष्ट्र किंवा भूप्रदेश असो? तो स्वतंत्र आहे, हे ओळखावयाचे असेल तर तिथे फडकणाऱ्या झेंड्याकडे पाहावे. जिथे ध्वज किंवा पताका नसेल, तो देश पराधीन मानला जातो. अगदी प्राचीन काळापासून झेंडा हा आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय भावनांचे प्रतीक आहे. म्हणूनच झेंड्याच्या रक्षणासाठी अनेक देशवासीयांनी प्राणांची आहुती दिली आहे. भारतीयांचे ध्वजांवर इतके प्रेम की कोणत्याही उत्सव किंवा कार्यक्रमाप्रसंगी आपल्या घरांमध्ये यज्ञ करून ध्वज फडकावला जातो. गृहप्रवेश असो की नववर्षदिन! याप्रसंगी यज्ञ करणे आणि ध्वज उभा करणे ही आपली परंपरा बनली आहे. महाराष्ट्रात नवसंवत्सरदिनी गुढी उभारण्याची जी परंपरा आहे, ती अलीकडील काळातील. मात्र, त्यापूर्वी आपल्या दारी ध्वजच उभारला जाई.
 
 
 
वरील मंत्रातही यजमानांनी प्रारंभी यज्ञ करून नंतरच आपल्या घरांवर ध्वज फडकवावा, असा आदेश दिला आहे. ‘संस्कारविधी’ या ग्रंथात महर्षी दयानंद सरस्वती हेदेखील पारस्कर गृह्यसूत्रातील ‘ओम् अच्युताय भौमाय स्वाहा।’ या मंत्राचे उद्धरण देत नवीन घरी प्रवेश करण्याच्या प्रसंगी घरांवर मुख्य द्वारावर एक मोठा ध्वज तर चारही कोपऱ्यात चार ध्वज उभारण्याचा संकेत करतात. त्यासोबतच नवीन वर्षारंभदिनीसुद्धा ध्वज उभारावा, असे सांगतात. ‘अच्युत’ म्हणजे कधीही च्युत (वेगळा) न होणारा, न पडणारा किंवा नष्ट न होणारा! झेंडा असा लावावा किंवा उभा करावा की तो कधीच पडणार नाही. ध्वजारोहणापूर्वी यज्ञ करण्याचे विधान आले आहे. आपली संस्कृती ही यज्ञ संस्कृती आहे. अग्नी देवतेला आहुती दिल्याखेरीज कोणताही कार्यारंभ कदापि होऊ शकत नाही. कारण, अग्नी हा देवता सर्व देवतांमध्ये अग्रभागी आहे. म्हणूनच ‘अग्नि: अग्रणि: भवति।’ असे निरुक्तकार सांगतात. अग्नी हाच देवदूतदेखील आहे. तो दूत बनून इतर सर्व देवतांपर्यंत आपला सुगंध पसरवितो. अग्नीमध्ये आहूत केलेल्या हविद्रव्यांना तो भस्मसात करून त्यांना सूक्ष्मरूप प्रदान करतो व आपल्या सुगंधीच्या माध्यमाने वायू, जल, प्रजन्य, भूमी, वनस्पती इत्यादी दिव्य तत्त्वांपर्यंत पोहोचवितो. एक प्रकारे सृष्टीला शुद्ध बनविण्याचे म्हणजेच पर्यावरण रक्षणाचे कार्य तो अग्नीदेव करतो. म्हणूनच अग्निहोत्रात श्रद्धेने मंत्रोच्चारणयुक्त आहुत्या देण्याचे विधान आहे. वैदिक संस्कृती ही यज्ञप्रधान आहे. या संस्कृतीतून यज्ञाला बाजूला केले, तर ही संस्कृती अगदी निष्प्राण बनते. म्हणूनच पूर्व मीमांसाशास्त्रात धर्माचा अर्थ यज्ञ असा करण्यात आला आहे. म्हणजेच धर्म आणि यज्ञ हे दोन्ही एकच आहेत. यज्ञाचा अर्थ केवळ अग्निहोत्र नव्हे, तर त्यामागील भूमिका फार मोठी विशाल आहे. शतपथ ब्राह्मण ग्रंथात म्हटले आहे- ‘यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्मम्।’ म्हणजेच या जगात जितकी श्रेष्ठ कामे (शुभकर्मे)आहेत, ती सर्व यज्ञच होय. ‘यज्’ या धातूपासून बनलेल्या ‘यज्ञ’ या शब्दाचे अर्थ देवपूजा, दान, संगतीकरण असे होतात. जेव्हा आम्ही अग्निहोत्रविधीत एकत्र बसतो, तेव्हा सृष्टीतील दिव्य तत्त्वांची पूजा म्हणजेच सन्मान, सत्कार होतो. या प्रसंगी दानदेखील केले जाते, तर सर्वजण सामूहिकपणे एकत्रित येतात. तेव्हा संगतीकरण सिद्ध होते. यजुर्वेदात एके ठिकाणी म्हटले आहे -
 
 
‘यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि
धर्माणि प्रथमान्यासन्’
 
 
आध्यात्मिक तत्त्वज्ञानी मंडळींनी यज्ञपुरुषाच्या यज्ञाद्वारे पूजा व सत्कार केला आणि तेच मुख्य धर्म ठरले. ऋग्वेदात म्हटले आहे - ‘यजध्वं हविषा तना गिरा’ म्हणजेच हविद्रव्याने, शरीराने (श्रेष्ठ संततीद्वारे) आणि वाणीद्वारे ज्ञानाचा उपदेश करीत यज्ञ करावा. इतका यज्ञाचा विशाल अर्थ आहे. अशा या यज्ञाचे रक्षण ज्ञानी मंडळींनी करावे असे प्रस्तुत मंत्रात म्हटले आहे -
 
 
‘सजोषसो देवा: यज्ञम् अवन्तु।’
 
 
 
सदरील ऋचेत ध्वज कोण उभारावा, या संदर्भात अतिशय उदात्त दृष्टिकोन अभिव्यक्त केला आहे. प्रथमत: त्यांनी यज्ञ संस्कृतीची जोपासना करावी, जीवनात पावित्र्य आचरावे, नेहमी श्रेष्ठ कर्म करावे आणि भौतिक अग्नी प्रज्वलित करावा व नंतर सर्वांनी मिळून प्रेमाने व आनंदाने विजयाचे प्रतीक ‘ध्वज’ उंच उभा करावा. हा ध्वज अशा प्रकारे मजबूतीने भूमीमध्ये स्थापन करा की तो कधीही उखडून पडता कामा नये.
 
 
ही ध्वजपताका उभी करणारे आर्यजन हे आदित्य, रुद्र, वसू, सुनीथ व देव असावेत, असे मंत्रात विशद केले आहे. त्याचबरोबरच पृथ्वीलोक आणि अन्तरिक्ष लोक यांनीही या कार्यात सहभागी व्हावे, असे स्पष्ट केले आहे. आदित्य म्हणजेच देशातील नेते व राष्ट्रपुरुष होय. ‘आदित्य’ शब्दाची व्याख्या करताना महर्षी दयानंद म्हणतात - ‘न विद्यते विनाशो यस्य, सोऽयं अदिति:, अदिते: भाव: आदित्य:।’ ध्वज उभा करण्याची क्षमता देश चालविणाऱ्या थोर नेत्यांमध्येच असते. जे आदित्य असतात, ते नेहमी सर्वदृष्टीने अग्रभागी असतात. त्याचबरोबर ध्वज हा रुद्र मंडळींनी उभारावा. रुद्र म्हणजेच त्या देशाचे शूर सैनिक होय. जे की, पराक्रमाने आणि धैर्याने परिपूर्ण असतात व शत्रूंना परास्त करतात. ‘य: रोदयति अन्यायकारिणो जनान् स रूद्र:।’ म्हणजेच अन्याय करणारे जे कोणी, परकीय व स्वकीय शत्रू असतात, त्यांना रडविण्याचे सामर्थ्य ज्यांच्यात असते, ते रुद्र होत. अशांनाच ध्वज फडकविण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर वसू म्हणजेच देशातील धनिक, व्यापारी व उद्योगशील मंडळी! त्यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था चालते. यांनाच ‘वसू’ असे म्हणतात. ‘वसन्ति भूतानि यस्मिन्।’ ज्याच्या धनवैभवामध्ये देशातील सर्व नागरिक किंवा प्राणीसमुदाय आनंदात राहतात असे वसू होत. त्याचबरोबर सुनीत म्हणजेच विद्वान, ज्ञानी, विचारवंत, सुधारक व धार्मिक सदाचारी लोक होत. जे की, सतत ज्ञानदानाचे व उपदेशाचे पवित्र कार्य करतात. या सर्व विद्वान मंडळींनादेखील ध्वज फडकाविण्याचा अधिकार असतो. अशा ज्ञानी जनांसाठीच मंत्रात ‘सुनीत’ शब्द आला आहे.
 
 
अशा प्रकारे यज्ञाच्या विशाल स्वरूपाचे रक्षण करण्याचे आणि ध्वज सतत फडकवत ठेवण्याचे कार्य वरील मंडळींनी करावे. आज भारतीय नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र यज्ञ करून पवित्र अंतकरणातून राष्ट्रीयत्वाचे प्रतीक मानले जाणारे ध्वज फडकवण्याची हीच वैदिक शिकवण सर्व देशवासीयांच्या अंगी रूजो अशी कामना..!
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
Powered By Sangraha 9.0