तेजस्वी नृत्य‘मुद्रा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2021
Total Views |

Tejashri Sawant_1 &n
 
 
नृत्यकलेचा प्राण असलेल्या भावाभिव्यक्तीमध्ये पदन्यासासह मुद्रेचे अलौकिक प्रकटीकरण करणाऱ्या ‘नृत्यमुद्रा’ तेजश्री सावंत हिचा तेजस्वी प्रवास...
 
 
ठाणे जिल्ह्यातील बदलापुरात १९८७ साली मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या तेजश्री सावंत यांचं करिअर ठाणेनगरीतच घडलं. आधी कोपरीत नंतर पश्चिमेकडील सावरकरनगरमधील प्रशस्त घरात त्यांनी नृत्याविष्कारातील कलात्मक अभिव्यक्तीचा लौकिक मिळवला. शिक्षिका असलेली आई ‘युवकबिरादरी’ची लोकनृत्य दिग्दर्शिका होती. आईकडून नृत्याचे प्राथमिक ज्ञान मिळाले, तर ‘खादी ग्रामोद्योग’मध्ये कार्यरत असलेल्या आजीचाही पाठिंबा मिळाला. नृत्यातही ‘शास्त्र’ असतं, हे न कळण्याच्या वयाच्या सातव्या वर्षी गुरू सुनील पगारे यांच्याकडे तेजश्रीने लोकनृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. इयत्ता तिसरीत असताना नृत्याच्या विविध कार्यशाळांमध्ये सहभाग दर्शवल्यानंतर ठाण्यातील कला महोत्सवांनाही भोज्जा केला. वयाच्या १२व्या वर्षी तेजश्रीने नृत्य हेच ध्येय मानून वाटचालीचा श्रीगणेशा करीत ‘मुद्रा आर्ट अ‍ॅकॅडमी’च्या रूपाने स्वतःची संस्था उभी केली. खचितच याचे श्रेयही ती आपल्या आईलाच देते.
 
 
 
डोंबिवलीच्या रफिक हजारे आणि ठाण्यातील शेखर राजे यांच्या माध्यमातून सतारवादन शिकल्यानंतर ‘एसएनडीटी’मध्ये अकरावी, बारावी ‘संगीत’ विषयात पूर्ण केली. त्यावेळी सतारवादनात पहिली आलेल्या तेजश्रीने मग कलाक्षेत्रात मागे वळून पाहिलेच नाही. विविध स्पर्धा, कार्यक्रम यांतून महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक ठेवा ती रसिकांपर्यंत पोहोचवू लागली. नृत्यकलेची आवड असल्याने ‘भरतनाट्यम’मध्येही तिने ‘विशारद’ पदवीसह पदव्युत्तर पदवीही मिळविली. शास्त्रीय नृत्यशैलीची मदत घेत लोकनृत्याचा प्रसार हे तिचे ध्येय निश्चित होते. २००४ मध्ये युरोपमध्ये झालेल्या ‘इंटरनॅशनल फोक डान्स फेस्टिवल’च्या व्यासपीठावर प्रथम तिने लोकनृत्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले. त्यामध्ये ती सर्वोत्कृष्ट नर्तक ठरलीच. किंबहुना, पॅरिसला ‘बेस्ट कोरिओग्राफर’चा पुरस्कारही पटकावला. नृत्यात ‘हस्तमुद्रां’चा वापर केल्याने नृत्याला विशेष सौंदर्य प्राप्त होते. किंबहुना, मुद्रेतील सौंदर्य हे बव्हंशी हातांच्या सुडौल व लयबद्ध हालचालींवर अवलंबून असते. मुद्रेतील रचनात्मक सौंदर्याचे आकलन झाल्यानंतरच नर्तक अथवा नर्तकीला नृत्याविष्कारात कलात्मक अभिव्यक्ती साधता येते.
 
 
 
नृत्यात काही काही मुद्रांची ठेवण मुळातच अत्यंत लयबद्ध व डौलदार असल्याने लोककलेत घेतलेल्या शिक्षणाचा प्रत्यक्षात वापर व्हावा, या उद्देशाने २००८ साली तेजश्रीने ‘मुद्रा आर्ट अ‍ॅकॅडमी’चा पाया रचला. या संस्थेला १२ वर्षे झाली. नव्या पिढीला लोकसंगीताची ताकद कळावी, त्यांनीही या क्षेत्रात कामगिरी करावी, म्हणून लोकनृत्याचे प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेच्या सध्या आठ शाखा विस्तारल्या असून भारतात अनेक ठिकाणी सादरीकरण, नामांकित फेस्टिवल, महोत्सवात केलेले नृत्य यांच्याआधारे तेजश्रीची नृत्यमुद्रा रसिकांपर्यंत पोहोचत आहे. महाराष्ट्र सरकारच्या अनेक सांस्कृतिक महोत्सवांमध्ये संपूर्ण टीमसह ती नृत्यातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडविते. ‘इंडो-चायना फेस्टिवल’मध्ये दोन देशांच्या सीमा पार करत तेजश्रीने मराठमोळ्या नृत्यांच्या ठेक्यावर परदेशी कलाकारांनाही ताल धरायला लावला. ठाण्यातील अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रासह भारतातील नृत्यशैलींचेही ती प्रशिक्षण देते. गुरू डॉ. प्रकाश खांडगे, ‘भरतनाट्यम’चे गुरू वैभव आरेकर यांच्या शिष्या असलेल्या तेजश्रीने सदानंद राणे, इंदुमती लेले, सुबल सरकार, अरविंद रजपूत, डॉ. संध्या पुरेचा, संदीप सोपारकर आदींच्या कार्यशाळेत धडे गिरवले. संस्कृतीचा हा वारसा पोहोचवत असताना कलेकडे व्यवसाय म्हणून पाहिले नाही. नृत्याच्या प्रसाराकरिता आर्थिकरीत्या दुर्बल घटकातील मुले, महिला, विशेष मुले आदी अनेकांना मोफत प्रशिक्षण देत असल्याचे ती आवर्जून सांगते.
 
 
‘भरतनाट्यम’सह काही काळ पाश्चात्त्य नृत्यशैलीचेही तेजश्रीने शिक्षण घेतले. मात्र, लोकसंगीताची गोडी अधिक असल्याने हा अलौकिक ठेवा जपण्यासाठी तेजश्री प्रयत्नशील आहे. वनवासी पाड्यांवरील कला थेट सातासमुद्रापार नेण्यास पुढाकार घेतल्याचे ती सांगते. शाळांमध्ये स्नेहसंमेलने, स्पर्धा यांमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सादर केल्या जाणाऱ्या पारंपरिक नृत्यप्रकारांकडे ‘करिअर’ म्हणून पाहणे हा तसा धाडसी निर्णय. पण, हा धाडसी निर्णय तेजश्रीने घेतला व या क्षेत्रातही आपली ‘मुद्रा’ उमटवताना नृत्य अभ्यासक्रमावर बोर्डाची मान्यता मिळालेली पुस्तकेही लिहिल्याचे ती सांगते. या क्षेत्रात ‘बेस्ट कोरिओग्राफर’सह विविध पुरस्कार पटकावून नावलौकिक मिळवल्याचे सांगताना तेजश्रीची यादी संपतच नाही. नृत्यकलेचा अभिजात वारसे चालवताना ‘कोविड’काळात काहीशी खीळ बसल्याचे सांगताना तेजश्रीचे मन खिन्न होते. कारण, नृत्यकला ही प्रत्यक्ष शिकण्याचे शिक्षण आहे.त्याला ऑनलाईन शिक्षणात अडसर निर्माण होतो. कारकिर्दीच्या प्रारंभी ‘सोशल मीडिया’त केवळ फेसबुकद्वारे आपल्या कलेचा प्रसार करणाऱ्या तेजश्रीने आता स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरू केले असून त्याला रसिक व विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे सांगते. आपल्या अभिजात कलेचा हा अवीट वारसा जपतानाच भविष्यात नृत्यातच ‘पीएच.डी.’ करण्याची आकांक्षा तेजश्रीने बाळगली आहे. तिच्या या उपक्रमांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
- दीपक शेलार
@@AUTHORINFO_V1@@