अन्सारीची ‘उत्तर’ स्वारी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2021   
Total Views |

Ansari_1  H x W
 
 
योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रापदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘गुंडाराज’ मुळापासून उखडून टाकण्याचा विडाच उचलला. कित्येक गुंडांना तुरुंगात डामले, तर कित्येकांच्या घरांवरच बुलडोझर फिरवला. गुन्हेगारांचे फोटोही भर चौकात लावून त्यांचे धिंडवडे काढले. एकूणच उत्तर प्रदेश गुन्हेगारीमुक्त, भयमुक्त कसा होईल, यासाठी योगींनी कडक धोरणांची अंमलबजावणी केली. ‘गुन्हेगारी राज’ संपवून उत्तर प्रदेश कसा ‘उत्तम प्रदेश’ होईल, म्हणून योगींनी तसूभरही कसूर सोडली नाही. त्याच शृंखलेतील एक उपलब्धी म्हणजे उत्तर प्रदेशातील मऊचे बहुजन समाज पक्षाचे आमदार मुख्तार अन्सारीची झालेली ‘घरवापसी’. पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेला मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारीविश्वातले एक मोठे प्रस्थ. उत्तर प्रदेशातच त्याच्यावर एकूण ५२ गुन्हे दाखल असून, त्यातील १५ प्रकरणं ही न्यायप्रविष्ट आहेत. पण, खंडणीच्या एका गुन्ह्याखाली अन्सारीला अटक करून २०१९ साली पंजाबच्या रोपड तुरुंगात डामण्यात आले. आता आमदार उत्तर प्रदेशचा आणि तोही ५०पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये हात बरबटलेला, पण पंजाबच्या तुरुंगात खितपत पडलेला! तेव्हा, योगी सरकारने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारी नेले. परिणामी, न्यायालयाच्या आदेशानुसार, नुकतेच पंजाबमधून उत्तर प्रदेशमधील बांदाच्या तुरुंगात ९०० किमीचा रस्तामार्गे प्रवास करून अगदी कडक सुरक्षेत अन्सारीला आणले गेले. यादरम्यान अन्सारीचा भाऊ अफजलने मात्र विकास दुबेप्रमाणे आपल्या भावाचादेखील एन्काऊंटर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. एवढेच नव्हे तर पंजाब ते उत्तर प्रदेशच्या १५ तासांच्या प्रवासात आपल्या भावाचा पोलिसांनी छळ केल्याचा आरोपही अन्सारीच्या भावाने केला. पण, तसे काहीही घडले नाही आणि मुख्तार अन्सारीची आरोग्य तपासणीही बांदामध्ये पोहोचताच क्षणी करण्यात आली. पण, योगींच्या राज्यात आल्यानंतर आपले काय होईल, याची मुळातच इतकी भीती वाटल्याने अन्सारी बंधूंना घाम फुटला आणि लगेच आपण मुस्लीम असल्यामुळे आपल्यावर अशाप्रकारे जुलूम-जबरदस्ती योगी सरकार करीत असल्याचा आरोपही करून ते मोकळे झाले. मात्र, अन्सारी बसपाचा आमदार असला तरी त्याचे ‘काँग्रेस कनेक्शन’ समोर आल्याने पंजाब तुरुंगातील कस्टडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
 

सॉरी ‘अन्सारी’

 
 
२०१९ पासून ते २०२१ अशी जवळपास दोन वर्षे मुख्तार अन्सारी पंजाबच्या रोपड तुरुंगात होता. अखेरीस कायदेशीर मार्गानेच उत्तर प्रदेश पोलिसांनी पंजाब सरकारकडून अन्सारीचा ताबा मिळवला खरा. पण, यामुळे हाच प्रश्न उपस्थित होतो की, पंजाब पोलिसांनी उत्तर प्रदेश सरकारला अन्सारीचा ताबा देण्यास एवढी टाळाटाळ का केली? यामागे पंजाबमधील काँग्रेसच्या कॅप्टन अमरिंदर सिंग सरकारचा छुपा पाठिंबा होता का? यांसारखे प्रश्न उपस्थित होतात. आता मुळात प्रश्न पडावा की, मुख्तार अन्सारी हा मुळात मायावतींच्या बसपाचा आमदार. मग त्याचा काँग्रेसशी काय संबंध? पण, या अन्सारीचा काँग्रेसशी चांगलाच संबंध आहे. सगळ्यात मोठा संबंध म्हणजे भारताचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी हे या मुख्तार अन्सारीचे काका असल्याचे समजते. एवढेच नाही तर ‘इंडिया मुस्लीम हिस्ट्री’च्या एका ट्विटनुसार तर काही लोकांसाठी अन्सारी अभिशाप असले तरी त्यांचे कुटुंबीय स्वातंत्र्यसेनानी होते. मुख्तार अन्सारीचे आजोबा मुख्तार अहमद अन्सारी स्वातंत्र्यलढ्यात १९२६-२७चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचेही समजते. तेव्हा, या खानदानी कनेक्शनमुळे मुख्तार अन्सारीची सर्वपक्षीय राजकीय नेत्यांबरोबर ऊठबस होतीच. त्याचाच फायदा पंजाब सरकारच्या माध्यमातून अशाप्रकारे उचलण्याचा अन्सारीने पुरेपूर प्रयत्न केला. परंतु, न्यायालयीन हस्तक्षेपानंतर अखेरीस पंजाब सरकारला अन्सारीचा ताबा उत्तर प्रदेश सरकारकडे द्यावाच लागला. या अन्सारीचा भाऊ अफजल आज योगी सरकारकडे आपल्या भावाला चांगली वागणूक द्यावी, अशी क्षमायाचना करीत आहे. पण, हा तोच अफजल होता, जो योगी आदित्यानाथांना ‘कमजोर दिल का चूहा’ म्हणून हिणवून काही वर्षांपूर्वी मोकळा झाला होता. पण, आज ज्याची उंदीर म्हणून अफजलने संभावना केली, त्या योगीनेच मुख्तार अन्सारीचे साम्राज्य पोखरून त्याला त्याची जागा दाखवून दिली, असे म्हणता येईल. तेव्हा, राजकारणातील गुंडगिरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, हेच योगी सरकारने पुन्हा एकदा आपल्या कठोर कारवाईतून दाखवून दिले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@