मतदानापूर्वी 'टीएमसी' नेत्याच्या घरी सापडली ईव्हीएम मशीन

06 Apr 2021 21:21:43
tmc_1  H x W: 0




कोलकाता -
पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्याच्या घरातून ईव्हीएम मशीन सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. अशा परिस्थितीत सोमवारी रात्री ही घटना घडल्याने टीएमसी संकटात सापडली आहे. तुळसबेरीयाचे टीएमसीचे नेते गौतम घोष यांच्या घरातून ग्रामस्थांना १ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) आणि ४ मतदार-पडताळण्यायोग्य पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) सापडले.
 
 
 
ही घटना उलुबेरिया उत्तर विधानसभा मतदार संघात घडली, ज्याठिकाणी अजूनही तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. टीएमसी नेत्याच्या घरी या बाबी सापडल्या असल्याचा आरोप भाजपचे उमेदवार चिरन बेरा यांनी केला असून यावरून राज्यातील सत्ताधारी पक्ष निवडणुकीमध्ये गडबड करत असल्याचे दिसून येते. बेरा यांनी सांगितले की, निवडणूक सेक्टर अधिकाऱ्याने हे ईव्हीएम आणि व्हीव्हीपीटी घोष यांच्या घरी आणले. या घराबाहेर सेक्टर अधिकाऱ्यांची गाडीही सापडली.
 
 
 
ही घटना उघडकी आल्यावर सेक्टर अधिकाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले. सेक्टर ऑफिसर आपल्या बचावामध्ये म्हणाले की, निवडणूक कर्तव्यासाठी मशीन आणत असताना बरीच रात्र झाली होती. केंद्रीय सशस्त्र सेना झोपली होती आणि त्यांनी बूथ उघडला नव्हता. म्हणून एखाद्या नातेवाईकाच्या घरी रात्र घालवणे योग्य वाटले. सदर सेक्टर ऑफिसरला निलंबित करण्यात आले असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला ईव्हीएमही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोगानेही निवेदन जारी केले आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, सेक्टर ऑफिसरला निलंबित करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेत हे ईव्हीएम वापरले जाणार नाही. यामध्ये सामील असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन ईसीआयने दिले.
Powered By Sangraha 9.0