विठ्ठल नगरकर यांचे ‘कोरोना’मुळे निधन

    दिनांक  06-Apr-2021 13:22:22
|

Nagarkar  _1  H


पुणे : महानगरातील कसबा भागातील रा.स्व.संघाचे स्वयंसेवक विठ्ठल नगरकर (५८) सोमवार, दि. ५ एप्रिल रोजी सकाळी कोरोनामुळे निधन झाले. ते शुक्रवारपेठेमध्ये वास्तव्यास होते. त्यांनी कसबा भागातील अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या होत्या. त्यांच्याकडे सध्या सहयोगी संस्थेची जबाबदारी होती. ते जनता बँकेमधून निवृत्त झाले होते.
 
 
पुणे महानगर कार्यकारिणी सदस्य संदीप गानू हे विठ्ठलराव नगरकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात, “विठ्ठला हे बरं नाही केलं, गेले काही महिने आपण स्वतः केलेल्या पांडुरंगाच्या गीतांसाठी वेड्या झालेल्या आमच्या विठूला आमच्यातून का नेलंस रे? असा सवाल त्यांचे अनेक स्नेही आज त्या पांडुरंगाला नक्की विचारत असतील.
 
 
बँकेमध्ये विठ्ठलचा सहवास मिळालाच; पण कसबा भाग कार्यवाह झाल्यावर काही जणांशी खूप भावनिक नाते झाले, त्यामध्ये विठ्ठलराव नगरकर हे नाव खूप वरचे आहे. विठ्ठलराव बैठकीमध्ये, “अहो शिक्षक, ऐका ना” अशी हमखास सुरुवात करायचे. मनामध्ये आलेला विचार अगदी मोकळेपणाने मांडून झालेल्या निर्णयानुसार काम करायला सज्ज असणारा विठ्ठल आज नजरेसमोर उभा राहतो आहे. मोतीबागेत चहापानासाठी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते.
 
 
आम्ही मोतीबागेत स्वागताला होतो. पण, विठ्ठलकडे वाहतूक नियंत्रण व्यवस्था होती. त्यातही तो तेवढ्याच आनंदात कार्यरत होता. त्याचे काम पूर्ण झाल्यावरच मोतीबागेत आला. शिबीर असो, कोणत्याही व्यवस्था असोत, एकदा काम स्वीकारले की, त्याला पूर्ण न्याय देणारा विठ्ठल आम्हा सहकार्‍यांवर मात्र अन्याय करून गेला.
 
 
माझ्यावर वैयक्तिक खूप प्रेम करणारा विठ्ठल घरी काही नवीन पदार्थ केला की, हमखास फोन करायचा. “शिक्षक, आज पाणी पुरी केली आहे, जाताना नक्की याच.” अगदी १८ मार्चला असाच फोन आला. माझी थोडी कामाची गडबड होती. पण, त्यांचा घरी येण्याबाबत आग्रह खूप होता. माझ्यासोबत भूषण करमरकर होता हे समजल्यावर त्यालाही बरोबर आणा. असा आग्रह करण्यात येऊन शेवटी घरी नेलेच.
 
 
शेवटी बेत काय तर, “आज कलिंगड छान आणलंय, ते तुम्ही खावं” हीच त्याची इच्छा! हाच तो पुण्यातील प्रेमळ विठ्ठल.मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. विठ्ठलकडे सेवा विभाग असल्याने त्याला खूप कामे करावी लागली. परंतु तो ती आनंदाने करायचा. त्याचा एका रात्री फोन आला की, कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढतोय. मी जरा आता बाहेर जाणे बंद करत आहे.
 
आम्ही संचाने त्याला होकार दिला. तरीही विठ्ठल गप्प राहिला नाही. निधी व्यवस्था, स्क्रीनिंग कँप ठरव, अगदी घरी किराणा, भाजी पोहोचविण्याची कामेसुद्धा करत होता. मी, त्याच्या या सेवेचा आजारपणामध्ये अनुभव घेतला. कोरोनाकाळामध्ये खूप जपून राहिलेला आपला विठ्ठल आज शेवटी अंत्यदर्शनही न देता निघून गेला. विठ्ठला हे बरं नाही केलं!”आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.