लाखो कामगारांना दिलासा द्यावा; नाहीतर आंदोलनाची भूमिका

06 Apr 2021 12:56:18

bhartiya railway majdur s


भारतीय मजदूर संघाचा राज्य सरकारला इशारा

पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंधाचे आदेश देण्यात आले. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कोणतेही पॅकेज देऊन संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी रोजगार व संपूर्ण वेतनाची हमी देण्याचे आदेश राज्य सरकारने काढून लाखो कामगारांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघाकडून सोमवार, दि. ५ एप्रिल रोजी करत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांच्यामार्फत देण्यात आले.


यावेळी भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हाचे पदाधिकारी अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, उमेश विस्वाद, सचिन मेंगाळे आदी उपस्थित होते. याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास नाइलाजास्तव भारतीय मजदूर संघाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा भारतीय मजदूर संघाकडून देण्यात आला.मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लावलेल्या टाळेबंदीचा परिणाम व्यावसायिक व आदींनी घेतला आहे. अद्यापही हॉटेल, पर्यटन, वाहतूक, स्वयंरोजगारातीत कामगार व उद्योजक, घरेलू कामगार, बिडी कामगार यांची स्थिती दयनीय व हलाखीची असून, मालकांनी सरकारच्या आदेशानुसार संपूर्ण वेतन दिले नाही.



निवेदनामध्ये, स्थलांतरित कामगारांकरिता निवासी व्यवस्था, रेशन, अन्न-पाणी, औषधे, प्रवासाची सोय करण्याबाबत, असंघटित कामगारांना प्रतिमाह रु. पाच हजार बँक खात्यावर जमा करण्याबाबत, कोणत्याही कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये, तसेच संपूर्ण वेतनबाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून आदेश काढण्याबाबत, सर्व कामगारांचे कोरोनाचे टेस्टिंग, लसीकरण व उपचार करण्याबाबत, तसेच ‘लॉकडाऊन’ कालावधीमध्ये ‘टास्क फोर्स’ची स्थापना करून कामगारांचे प्रश्न त्वरित सोडविण्यात यावे, या अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांनी सदरील निवेदन सरकारकडे त्वरित पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.



Powered By Sangraha 9.0