भाजप स्थापना दिन : चंद्रकांतदादांनी दिला 'हा' संकल्प

06 Apr 2021 18:18:11

Chandrakant Patil _1 



पुणे: ''भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन यंदा साजरा होत असताना भविष्याच्या दृष्टिकोनातून संघटनावाढीसह पक्षातील नव्या कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की होणे गरजेचे आहे. त्यासाठी अभ्यासवर्गाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जावेत,'' असा संकल्प भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.
 
 
भारतीय जनता पक्षाच्या ४१व्या स्थापना दिनानिमित्त पुणे शहर भाजप कार्यालयात आयोजित व्हर्च्युअल रॅलीला मा. पाटील संबोधित करत होते. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.
 
 
पाटील म्हणाले की, ''आगामी काळात भाजप विरुद्ध इतर असाच राजकीय आणि वैचारिक संघर्ष होणार आहे. छत्तीसगढमधील घटना अतिशय वेदनादायीच आहे. देशभरात एक सुप्त संघर्ष सुरू आहे. हे सुप्त संघर्ष निर्माण करणारे स्लीपर सेल अतिशय शांतपणे आपल्या विरोधात संघर्ष निर्माण करत आहेत. त्यामुळे आगामी काळात जो वैचारिक संघर्ष होईल, तो प्रामुख्याने आपण विरुद्ध इतर असाच होणार आहे.''
 
 
ते म्हणाले की, ''२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण स्वबळावर लढून आपल्याला १२२ जागा मिळाल्या. या निवडणुकीत आपल्याला एक कोटी ४७ लाख मते मिळाली.२०१९ च्या निवडणुकीत १०० जागा कमी लढूनही आपल्याला एक कोटी ४२ लाख मते मिळाली. २०२४च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवून, दोन कोटीपेक्षा जास्त मते मिळवायची आहेत. यासाठी बूथ रचना अतिशय सक्षम झाली पाहिजे.''
 
 
खा. गिरीश बापट म्हणाले की, ''भारतीय जनता पक्ष हा कोणी एका व्यक्तीने स्थापन केलेला नाही. त्यामुळे कुठल्याच एखाद्या कुटुंबाची यावर मालकी राहिलेली नाही. हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष राहिला आहे. आपल्या नेत्यांनीदेखील आपल्या कामामधून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. त्यामुळे कार्यकर्ता हा या पक्षाचा प्राण आहे. कारण, आपली वैचारिक बैठक पक्की आहे.''  महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ आणि पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश घोष यांनी केले.




Powered By Sangraha 9.0