आनंदी आनंद गडे...

06 Apr 2021 18:04:08

happy_1  H x W:
 
 
आनंद मिळवण्याची कारणं काळाप्रमाणे बदलतात. पण, आनंद ही मनाची स्थिती आहे, ती कधीही काळाच्या बंधनापलीकडे जाऊन अनुभवता येऊ शकते. आपल्या मूल्यांना धरून प्रामाणिकपणे जगता येणं, हे आनंदाचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.
 
 
 
आपल्या सगळ्यांच्या मनात आपण आनंदी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची सूची असते का? आपल्या समाजात आपल्याला आवश्यक अशा कुठल्या गोष्टीच्या मागे लागलं पाहिजे, याची एक लांबलचक यादी पाहायला मिळते. उदा. यश, संपत्ती, कीर्ती, सौंदर्य आणि सत्ता. तथापि, एखादा सुप्रसिद्ध पुरस्कार, एखादी महागडी कार, एखादी खास बढती या उपलब्धी अचानक नव्याने येणारा मोद देतात खरा, पण तो लवकर त्याची लकलकी घालवून बसतो. हा असा पाऱ्यासारखा चढता संतोष पुन्हा खाली कधी येतो, हे लक्षातच येत नाही. मग पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या.’ पुन्हा नव्या आनंदाचा शोध सुरू होतो.
 
 
आनंदाच्या संकल्पनेवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी सकारात्मक मानसशास्त्रांमध्ये असे शोधून काढले आहे की, आपण आपला अस्सल आनंद आणि सर्वसमावेशक समाधान वृद्धिंगत करू शकतो. त्यासाठी आपल्याला डोळे दीपवणारी संपत्ती मिळायला हवी किंवा लोकांना हेवा वाटेल, असे यश मिळावे याची गरज नाही. यांच्यासाठी आपली जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आणि वृत्ती बदलली पाहिजे. आपण आनंदी असण्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज आहे, याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत, अनेक दंतकथा आहेत.
 
बऱ्याच लोकांना वाटतं आनंदी राहण्यासाठी गरज आहे ती धनाची. ‘द होल थिंग इज दॅट की भैय्या सबसे बडा रुपैया.’ अर्थातच आपल्या सगळ्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवता येतील इतका पैसा नक्कीच हवा. आपलं अन्न-पाणी-निवारा आणि कपडालत्ता याची गरज नक्की भागली पाहिजे. एकदा का आपण याबाबत समाधानी झालो की, आणखी पैसा असावा, तशी गरज आपल्याला आनंदी राहण्यासाठी भासत नाही. डामडौल वाढवण्याचा भाग हा वेगळा प्रकार आहे. त्यात आनंदापेक्षा संपत्तीचे प्रदर्शन महत्त्वाचे असते. त्यातून आपली प्रतिष्ठा आणि पॉवर दर्शवून देण्याचा खास प्रयत्न असतो.
 
आपण नातेसंबंधात यशस्वी असणे आनंदासाठी आवश्यक आहे, असे अनेक जणांना वाटते. अर्थात, एक सुदृढ आणि आश्वासक नातं खासकरून रोमॅण्टिक नातं आनंदास कारणीभूत ठरतं, यात वाद नाही. पण, असं नातं नसेल तर एखादी व्यक्ती आनंदी किंवा समाधानी नसते, हे खरं नाही. खरे तर अनेक माणसं एकटी असूनसुद्धा आपल्या जीवनात अर्थपूर्ण व विधायक गोष्टी करत संतुष्ट असतात, तर अनेक जण न जुळणाऱ्या विसंगत नात्यांमध्ये क्लेश सहन करत दु:खी असतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, काही वैवाहिक संबंधातसुद्धा शाश्वत आणि भावूक असा आनंद किंवा समाधानी प्रोत्साहन मिळेल याची खात्री देता येत नाही.
 
काही लोकांना असं वाटतं की, या जगात काही माणसं इतर माणसांपेक्षा जास्त आनंदी असतात. शास्त्रीयदृष्ट्या जीन्स आपल्या आनंदाला काहीअंशी जबाबदार असतात. पण, काही प्रमाणातच त्याचा आनंदाचा एक ठरावीक बिंदू असू शकतो. पण, खूप कमी प्रमाणात असतो. पण, जास्तीत जास्त आनंदाचा सर्वसामान्य अनुभव हा आपल्या दृष्टिकोनावर आणि कृतीवर अवलंबून असतो.
 
आणखी एक थोडसं स्वीकारता न येणार असं, ‘माणसाच्या मनातलं अजब मिथक म्हणजे माझ्या आयुष्यातले आनंदाचे जगता येण्यासारखे सर्वोत्कृष्ट दिवस आता संपले.’ हे खरंच न पटण्यासारखं आहे. आनंद मिळवण्याची कारणं काळाप्रमाणे बदलतात. पण, आनंद ही मनाची स्थिती आहे, ती कधीही काळाच्या बंधनापलीकडे जाऊन अनुभवता येऊ शकते. आपल्या मूल्यांना धरून प्रामाणिकपणे जगता येणं, हे आनंदाचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. या जगातल्या प्रत्येक माणसाचा आनंदाचा क्षण किंवा आनंदाचा अनुभव खास असतो. एकमेकाद्वितीय असतो. विशी-पंचविशीच्या घरात ज्या गोष्टी संतोष देतात, त्या साठ-सत्तरीच्या वयात असंबद्ध असतात. आंतरिक आनंदात रमणाऱ्या जनांस बाह्यगोष्टींतून मिळणाऱ्या आनंदाची वा सुखाची चव चाखता येत नाही. आनंदी असणं म्हणजे दु:खी नसणं असं असतं का? तर नक्कीच नाही. अर्थपूर्ण आणि विधायक आयुष्यात आव्हानात्मक प्रसंग, निराशा आणि दु:ख अपरिहार्य आहे. खरोखरच पाहिलं तर खडतर अनुभवांतून आपली जीवनाबद्दलची मूल्य दिसतात व आपण स्वत:ला बदलण्याची प्रेरणा मिळवतो. अशा क्लिष्ट क्षणांतूनच आपल्याला निखळ आनंदाची प्रचिती येते. शेवटी आनंद ही आपली मूलभूत पसंती आहे.
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
Powered By Sangraha 9.0