कॅलेंडर विक्रेता ते बँक अधिकारी

06 Apr 2021 20:17:58

Dnyaneshwar Kshirsagar_1&
 
 
 
प्रेरणादायी पुस्तके आणि व्याख्याने यांच्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा नाशिकच्या ज्ञानेश्वर क्षीरसागर यांचा यशप्रवास...
स्वप्नांकडे मानवी आयुष्याच्या प्रगतीची एक आश्वासक शिडी म्हणून आपण पाहत असतो. काही स्वप्ने ही उघड्या डोळ्यांनी पाहिली जातात, तर काही स्वप्ने ही चिरनिद्रेत आकार घेतात. पण, डोळस माणसे मात्र आपण पाहिलेली स्वप्ने ही लख्ख प्रकाशात साकार करत असतात. मात्र, दृष्टिहीन व्यक्तींच्या जीवनात तर सदा सर्वकाळ अंधकार व्यापलेला असतो. कोणत्याही रंगाची जाण नसलेले दृष्टिबाधित व्यक्ती जेव्हा आपल्या जीवनात आणि आपल्या कुटुंबीयांच्या जीवनात सप्तरंग भरतो, तेव्हा त्याचे कर्तृत्व हे नक्कीच वाखणण्याजोगेच आहे. नाशिक येथील ज्ञानेश्वर क्षीरसागर या तरुणाने हीच किमया साधली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला नाशिक येथील ‘सोशल नेटवर्किंग फोरम’च्या साहाय्याने ज्ञानेश्वर क्षीरसागर या तरुणाला अर्थार्जनासाठी कॅलेंडर विक्रीचा स्टॉल सुरू करून देण्यात आला होता. अपार कष्ट करत ज्ञानेश्वरची ‘कॅनरा बँके’त ‘प्रोबेशनरी ऑफिसर’पदी निवडही झाली.
 
एका बाजूला आपले कुटुंब सांभाळून स्वकष्टातून चरितार्थाचीही बाजू त्याने सांभाळली, तर दुसर्‍या बाजूला आपल्या स्वप्नांचा पाठलाग मात्र सुरूच ठेवला. याचा परिणाम म्हणजे, लेखी आणि तोंडी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन ज्ञानेश्वरची ‘कॅनरा बँके’त ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ म्हणून निवड झाली. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी-मावळा हे ज्ञानेश्वरचे मूळ गाव. गवंडी काम करणारे वडील आणि आजही दुसर्‍याच्या शेतात मोलमजुरी करणारी आई, चार भाऊ असे ज्ञानेश्वरचे कुटुंब. घरात अठराविश्व दारिद्य्र हे पाचवीला पूजलेले. त्यात ज्ञानेश्वरला जन्मत:च अंधत्व. त्यामुळे आई-वडिलांना उघड्या डोळाने कधीही न पाहिलेल्या या मुलाने कुटुंबाप्रति आपली जबाबदारी ओळखून साकार केलेले स्वप्न हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
 
ज्ञानेश्वरचे शालान्त परीक्षेपर्यंतचे शिक्षण नाशिक येथील अंधशाळेत झाले. अकरावी व बारावीपर्यंतचे शिक्षण हे नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूलमध्ये झाले. त्यांनतर बी.ए. (संगीत) या विषयात ज्ञानेश्वर याने ‘केटीएचएम महाविद्यालया’तून पदवी प्राप्त केली. घरची परिस्थिती बेताची असल्याने ज्ञानेश्वरने पदवी प्राप्त केल्यावर खेळणी विक्री, कॅलेंडर विक्री व इतर काही वस्तू विक्री करण्यास सुरुवात केली. १५० ते २०० रुपये रोज प्राप्त होणार्‍या या कामातून ज्ञानेश्वरने आपल्या घरातील परिस्थिती सावरण्याचा यथोचित प्रयत्न या काळात केला. याच वेळी काळाची पावले ओळखत वस्तूविक्री करत ज्ञानेश्वरने सकाळी तीन तास व रात्री तीन तास असा रोज सहा तास ‘आयबीपीएस’ या परीक्षेचा अभ्यास केला. यापूर्वी त्याला याच परीक्षेत अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे घरातील इतर सदस्यांना ज्ञानेश्वर नेमका काय करत आहे, हेच कळत नव्हते. अशा वेळी असणारा ताण, आर्थिक प्रश्न, शारीरिक मर्यादा या सर्व बाबतीत ज्ञानेश्वरने हिमतीने सामना करत हे यश संपादित केले.
 
ज्ञानेश्वरची पत्नीदेखील अंध असून, ती आता पदवी परीक्षेची तयारी करत आहे. या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करताना ज्ञानेश्वरलाही अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. ज्ञानेश्वरकडे ‘अ‍ॅण्ड्रोईड’ मोबाईल या काळात नव्हता. त्याने वस्तू विक्रीच्या माध्यमातून जमा केलेल्या पैशातून तो विकत घेतला. युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ ऐकून त्याने आपला अभ्यास केला. असा द्राविडी प्राणायम त्याने सलग तीन ते चार वर्षे केला. त्यानंतर यशाला गवसणी घालण्यास त्याला यश आले. यशप्राप्तीसाठी केवळ प्रयत्नच नाही, तर साधना करावी लागत असते. त्यामुळे यशप्राप्तीसाठी कोणताही जवळचा मार्ग नाहीच, हे आजच्या तरुणाईने लक्षात घेणे आवश्यक आहे, असाच संदेश ज्ञानेश्वर आजच्या तरुणपिढीला देतात.
 
‘माझे काम झाले, आता माझी जबाबदारी संपली,’ अशी ज्ञानेश्वर याची वृत्ती अजिबात नाही, हे त्याच्याशी बोलताना सहज जाणवते. इतर काही दृष्टिहीन मुलांसाठीही व्यवसाय उपलब्ध व्हावेत, अशीच त्याची प्रामणिक इच्छा आहे. दृष्टिहीन तरुण मुलांमध्ये कौशल्य विकसित व्हावे, यासाठी ‘सोशल नेटवर्किंग फोरम’चे प्रमोद गायकवाड यांच्या समवेत कार्य करण्याचा मनोदय ज्ञानेश्वर बोलून दाखवितो. अगदी धडधाकट असलेल्या शिक्षित लोकांमध्येही हे भान दिसत नाही. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरचे हे सामाजिक औदार्य निश्चितच कौतुकास्पदच आहे.
 
आजमितीस आपण थोडेफार संकट आले की, भल्या भल्यांना गांगरून गेलेले एकीकडे पाहत असतो. याउलट अंध असलेला ज्ञानेश्वर याने औपचारिक शिक्षण घेऊन उपजीविकेसाठी स्वमार्ग पत्करला. स्वतःच्या हिमतीवर विवाह करत एका अंध महिलेच्या आयुष्यातदेखील प्रकाश निर्माण करण्याचे कार्य केले. मोठ्या कष्टाने कुटुंब उभं करण्याचा प्रयत्न केला. पडेल ती कामे करत स्वाभिमानाने आपले आयुष्य व्यतीत केले. अथक परिश्रमातून परीक्षा देऊन बँकेत अधिकारिपदास गवसणी घातली. ज्ञानेश्वरचे हे यश प्रेरणादायी पुस्तके आणि व्याख्याने यांच्यासाठी नक्कीच एक मैलाचा दगड आहे. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांच्या आगमी आयुष्यास आणि कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0