लसीचे दोन डोस घेऊनही १८७ आरोग्य कर्मचारी 'पॉझिटिव्ह' !

    दिनांक  06-Apr-2021 19:43:09
|

COVId _1  H x W

नवी दिल्ली :  कोरोना लसीकरणानंतरची बेपर्वाई पुन्हा एकदा संक्रमणाला कारणीभूत ठरत आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या १८७ आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणी 'पॉझिटिव्ह' आली आहे. लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला, त्यावेळी पहिल्या टप्प्यातील लसीकरणात सर्वांनी लस घेतली होती. त्यानंतर १४ दिवसांत पुन्हा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर महिनाभरातच हे आरोग्य कर्माचारी 'पॉझिटिव्ह' निघाले.
 
 
नालंदा मेडिकल महाविद्यालयातील (NMCH) तीन डॉक्टर आणि दोन परिचिकांचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आला. पाटणा मेडिकल महाविद्यालयात लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. त्यापूर्वी NMCH चे दोन विद्यार्थीही कोरोना 'पॉझिटिव्ह' आढळले होते. जिल्हा आरोग्य समितीच्या एका कर्मचारी महिलेचा कोरोना रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आला आहे. ८ मार्च रोजी तिने कोरोनाचा दुसरा डोस घेतला होता.
 
 
त्या १८७ जणांचा अहवाल 'पॉझिटिव्ह'
 
पाटणातील अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळलेल्या माहितीनुसार, दोन्ही कोरोना लसी घेतल्यानंतरही रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आला. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे रुग्णांची परिस्थिती तितकीशी गंभीर नाही. अहवालानंतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःला 'क्वारंटाईन' केले आहे.
 
 
लसीकरणानंतरही धोका कायम
 
आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मते, कोरोना लस घेतल्यानंतरही संक्रमणाचा धोका कायम असू शकतो. लसीकरणाचा फायदा असा की, लस घेतल्यामुळे कोरोना रुग्णाच्या गंभीर होण्याचा धोका ८० टक्क्यांनी कमी होऊन जातो. संक्रमणामुळे मृत्यूचा धोकाही टळतो. पाटणातील डॉ. चंद्रशेखर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी कोरोना लस घेतली आहे आणि त्यांच्यात काही सदृश लक्षणे आढळली, तर त्यांच्यापासून ज्यांनी कोरोना लस घेतली नाही त्यांनी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. कारण असे लोक कोरोनावाहक बनू शकतात.
 
 
'कोरोना' लसीचा प्रभाव कधी सुरू होईल ?
 
कोरोना लस घेतल्यानंतर पहिल्या डोसनंतरच प्रभाव दिसण्यास काही काळ लागू शकतो. पण, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी दुसरी लस घेतल्यानंतर १४ दिवसांचा अवकाश जाणे गरजेचे असते.
 
 
दुसरा डोस केव्हा लागणार ?
 
कोव्हॅिक्सन : पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांत दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस २८ ते ४२ दिवसांच्या आत घेता येतो. हा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी याचा प्रभाव दिसू लागणार आहे.
 
 
कोव्हिशिल्ड : पहिला डोस घेतल्यानंतर ४२ दिवसांनी हा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस ४२ ते ५६ दिवसांत घेता येतो. याचा प्रभाव १४ दिवसांनी लागू होतो.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.