अपेक्षेची उपेक्षा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2021   
Total Views |

pak_1  H x W: 0
‘नामुष्की’ आणि ‘उपेक्षा’ हे दोन शब्द जणू पाकिस्तानच्या अगदी अंगवळणी पडलेले! कारण, जागतिक स्तरावर वारंवार या ना त्या कारणाने शेजारी पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची वेळ येते. मग मुद्दा खोटे परवाने तयार करून विमान उडवणाऱ्या ‘पीआयए’च्या वैमानिकांचा असो वा मलेशियाकडून कर्जवसुलीसाठी अख्खे पाकिस्तानी विमानच जप्त करण्याचा असो. या ना त्या मार्गे पाकिस्तान अपमानितच होताना दिसतो. आता तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडने पाकिस्तानमधील प्रवाशांना विमानप्रवासावरही बंदी आणली आहे. पण, या सगळ्यापेक्षा कैकपटीने अधिक दु:ख इमरान खान यांना एका वेगळ्याच गोष्टीचे झालेले दिसते.
खरंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेले जो बायडन हे पाकिस्तानला जणू डोक्यावर घेतील, अशी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची अपेक्षा होती. पण, तसे अजिबात होताना दिसत नाही. उलट अमेरिकेकडून वारंवार पाकिस्तानला दुर्लक्षित तरी केले जाते आणि दहशतवादापासून दूर राहण्याचाच सूचक सल्ला दिला जातो. आताही काहीसे तसेच झाले. याच महिन्यात होऊ घातलेल्या जागतिक तापमानवाढीसंदर्भातील एका परिषदेसाठी अमेरिकेतर्फे ४० देशांना आमंत्रित करण्यात आले. या देशांच्या यादीत पाकिस्तानचे नावही नाही. ही बाब समजताच इमरान खान यांचा जळफळाट झाला. मग काय, त्यांनी टिवटिवाट करून आमंत्रण न दिल्याबद्दल आपली जाहीर नाराजी प्रकट केली. आता अमेरिकेने आयोजित केलेल्या या जागतिक परिषदेत कोणाला सामील करायचे, कोणाला नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय. त्यात पाकिस्तानची या क्षेत्रातील कामगिरी समाधानकारक न वाटल्याने अमेरिकेने पाकिस्तानला वगळण्याचा निर्णय घेतला असावा. पण, इमरान खान यांचा मात्र यावरून संताप झाला. त्यांच्या मते, ‘ग्रीन पाकिस्तान’साठी त्यांनी बिकट आर्थिक परिस्थितीतही अथक प्रयत्न केले. देशभरात दहा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टही असल्याचे ते म्हणाले. तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पाकिस्तान सर्वोपरीने प्रयतत्नशील असून पाकिस्तानला या परिषदेत सहभागी केले असते, तर आपल्या अनुभवांचा फायदा कदाचित इतर देशांनाही झाला असता, असे खान यांचे म्हणणे. त्यावर अमेरिकेकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया आली नसली, तरी पाकिस्तानबरोबर या क्षेत्रात सहकार्य करण्याचे आमचे धोरण असल्याचे अमेरिकेने म्हटल्याचे समजते. पण, कप्तान खानांचा मात्र यामुळे हिरमोड झाला. कारण, जागतिक मंचावर झळकण्याची आणि स्वत:चा मोठेपणा मिरवण्याची एक नामी संधी त्यांच्या हातून निसटली आहे. कारण, या परिषदेच्या माध्यमातून पाकिस्तानची ‘ग्रीन स्टेट’ ही प्रतिमा उजळवण्याचा त्यांचा प्रयत्न फोल ठरला.
तसेच पाकिस्तान जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी कसा कटिबद्ध आहे, याची जाहिरातबाजी करून पाकिस्तानात परदेशी गुंतवणूक, उद्योगधंद्यांना आकर्षित करण्याचा खान यांचा डावही अगदी धुळीस मिळाला. म्हणूनच मग इमरान खान यांनी ट्विटरवरूनच पाकिस्तानच्या हरित धोरणांचे गुणगान गायले. ‘एफटीएफ’च्या ‘ग्रे’ यादीत असलेल्या पाकिस्तानवर अजूनही काळ्या यादीची टांगती तलवार कायम आहे. त्यात दहशतवाद, दिवाळखोरी, नाममात्र लोकशाही आणि चीनशी असलेल्या जवळिकीमुळे जागतिक स्तरावर पाकिस्तान आपली पत गमावून बसला आहे. ज्या जो बायडन यांच्याकडून खान यांना पाकिस्तानशी सहकार्याशी आशा होती, तिथूनही उपेक्षाच हाती येताना दिसते. त्यातच या परिषदेच्या पार्श्वभूमीवर बायडन यांचे विशेष राजदूत जॉन केरी तीन आशियाई देशांचा दौरा करणार आहेत. यामध्ये सौदी अरब, भारत आणि बांगलादेश या तीन देशांचा समावेश असून पाकिस्तानला यामध्ये डच्चू देण्यात आला आहे. खरंतर अप्रत्यक्षपणे अमेरिकेकडून ‘वेळ गेलेली नाही, अजूनही सुधरा’ असा पाकिस्तानला हा संदेशच म्हणावा लागेल. पण, सुधरेल तो पाकिस्तान कसला! मध्यंतरी संयुक्त अरब अमिरातीच्या प्रयत्नांनुसार भारत-पाक संबंध हळूहळू पूर्वपदावर येतील, यासाठी प्रयत्नही सुरू झाले होते. त्यात भारताशी पुन्हा व्यापार करण्याचा निर्णय घेऊन नंतर पाकने ‘युटर्न’ घेतला. खान यांनी पुन्हा काश्मीरचाच राग आळवला. पण, आता कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी पाकच्या हाती काही एक लागणार नाही. त्यामुळे अमेरिकेकडूनही फार अपेक्षा न ठेवता, पाकिस्तानने आपल्या कुकृत्यांवर लगाम कसावा; अन्यथा या देशाचे भविष्य भयंकर अंधकाराच्या गर्तेत असेल.
@@AUTHORINFO_V1@@