सरणावर टपलेली गिधाडे

    दिनांक  30-Apr-2021 21:47:26
|

agralekh _1  Hभारतीयांच्या मृतदेहावर टपलेल्या या छायाचित्रकारांना, प्रसारमाध्यमांना गिधाडाव्यतिरिक्त दुसरे कोणते विशेषण लावता येत नाही. कारण, त्यांना जगातील अन्य देशांतील परिस्थिती व भारतातील परिस्थिती यातला फरक करता येत नाही, उलट त्यांचे सगळे लक्ष आपली खोटीनाटी, संधिसाधू बातमीदारी चालली पाहिजे, यावरच असते.


‘केविन कार्टर’ या छायापत्रकाराचे सुदानमधील १९९३ सालच्या भीषण दुष्काळात अन्नासाठी झगडणारी बालिका आणि तिच्या मृत्यूची वाट पाहणार्‍या गिधाडाचे छायाचित्र प्रचंड गाजले. इतके की, ‘द व्हल्चर अ‍ॅण्ड द लिटल गर्ल’ शीर्षकाच्या त्या छायाचित्रासाठी केविन कार्टरला पत्रकारितेतील मानाचा ‘पुलित्झर पुरस्कार’देखील मिळाला. पण, त्यानंतर तीनच महिन्यांत केविन कार्टरने आत्महत्या केली. त्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण, केविन कार्टरला पुरस्कार मिळाल्यानंतर आलेल्या एका दूरध्वनीवरून समोरच्या व्यक्तीने विचारलेला प्रश्न व त्यावरील उत्तर, हेही असल्याचे सांगितले जाते! “त्या मुलीचे शेवटी काय झाले आणि तिथे किती गिधाडे होती,” असा प्रश्न केविन कार्टरला दूरध्वनीवरील व्यक्तीने विचारला होता. त्याच्या उत्तरादाखल केविन कार्टरने, “मला वाटते तिथे एकच गिधाड होते,” असे उद्गार काढले. त्याचवेळी दूरध्वनीवर संभाषण करणार्‍या व्यक्तीने, “मला वाटते त्यावेळी तिथे एक नव्हे, तर दोन गिधाडे होती, एक छायाचित्रातले आणि दुसरे कॅमेर्‍यामागचे,” असे अतिशय तुच्छतेने सांगितले. ते शब्द ऐकल्यानंतर केविन कार्टर अस्वस्थ झाला आणि सुदानमधील भुकेकंगाल, मरणासन्न लहानशा मुलीच्या व इतर माणसांच्या दुःखाचा विचार करून अखेरीस त्याने विष घेऊन आत्महत्या केली. कारण, तो इतरांना नाही तर किमान छायाचित्रातील बालिकेला तरी तिथून दोन-तीन किलोमीटरवरील संयुक्त राष्ट्रांच्या आहार केंद्रात घेऊन जाऊ शकला असता. केविन कार्टरच्या आयुष्य आणि मृत्यूशी निगडित वरील कथा अनेकदा विविध माध्यमातून समोर येत असते. पण, त्याने निदान पश्चात्तापदग्ध होऊन आत्महत्या तरी केली. मात्र, आताच्या कोरोनाच्या काळात तर दुसर्‍याच्या मृत्यूचाच बाजार मांडला गेला आहे नि त्या बाजारात आपल्या मतलबासाठी अनेक देशी-विदेशी पत्रकार, संपादक, प्रसारमाध्यमे व छायाचित्रे विकणारे दुकानदार बुडाल्याचे दिसून येते.भारतात सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार उडाला असून, रुग्णमृत्यूंची संख्याही अधिक आहे. त्यातूनच अनेकदा स्मशानभूमीत एकाच वेळी तेथील शवदहनासाठीच्या व्यवस्थेच्या क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह आणले जातात, तर कित्येकदा एकाच वेळी नेहमीपेक्षा अधिक शवांवर दाहसंस्कार केला जातो. मात्र, त्याच जळत्या सरणांच्या, रांगेतल्या मृतदेहांच्या, मृतांच्या नातेवाइकांच्या रुदनाच्या छायाचित्रांचा वापर नफ्याबरोबरच जगाला चकीत करण्यासाठी, जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि जगासमोर भारतीय नेतृत्वाची विनाशक प्रतिमा निर्माण करण्यासाठी केला जात आहे. छायाचित्रांची विक्री करणार्‍या संबंधित ब्रिटिश-अमेरिकन कंपनीने माणसाच्या चितांच्या छायाचित्रांची किंमतही निश्चित केली असून, ही छायाचित्रे त्यांच्यासाठी अतिमहत्त्वाची झाली आहेत. त्यातल्या सर्वोत्तम छायाचित्राची किंमत २३ हजार रुपये असून त्या किमतीची अनेक छायाचित्रे संबंधित कंपनीने आपल्या संकेतस्थळावर विक्रीसाठी ठेवली आहेत. उल्लेखनीय म्हणजे, यापैकी अनेक छायाचित्रे भारतीय छायाचित्रकारांनी, फ्री लान्सर्सनी आणि माध्यम समूहांनी काढलेली आहेत. अर्थात, केवळ संबंधित ब्रिटिश-अमेरिकन कंपनीच नव्हे, तर भारतीय छायाचित्रकारही स्मशानात जळणार्‍या शवांची छायाचित्रे काढून ती परकीय बाजारात विकत आहेत. त्यातून त्यांना नक्कीच पैसा तर मिळतोच; पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी बिघडवण्यासाठीही त्यांचा वापर करता येतो.सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे केविन कार्टरला लहानशा बालिकेच्या मृत्यूची वाट पाहणारे एकच गिधाड नव्हते, तर आपल्या रूपात आणखीही एक गिधाड होते, याची जाणीव झाली व त्याने आत्महत्या केली. पण, आजच्या कोरोनाच्या काळात देशातील अनेक माध्यमकर्मी भारतीयांच्या मृत्यूवर, त्यांच्या सरणावर डोळा ठेवून आहेत, पैसा कमवत आहेत आणि देशाची बदनामी होईल, याची तजवीज करत आहेत, हेच यातून दिसते, त्यांना गिधाडाशिवाय काय म्हणणार? यातल्याच तथाकथित ‘फॅक्ट चेक’वाल्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नारायण दाभाडकर यांच्या जीवनत्यागातही खोट शोधली होती. त्यांचेच भाऊबंद असलेले दाहसंस्काराच्या छायाचित्रातून आपले स्वार्थ साधत आहेत, जगासमोर चुकीची प्रतिमा नेत आहेत. पण, त्यांना वस्तुस्थिती कळत नाही. आजची भारताची १३५ कोटी लोकसंख्या एका बाजूला आणि अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली, कॅनडा, रशिया, अशा अनेक देशांची लोकसंख्या दुसर्‍या बाजूला अशी स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना साथीने ग्रासलेल्यांची संख्या आणि मृत्यूकडेही पाहिले पाहिजे. पण, इथे तसे होत नाही, तर भारताची तुलना मूठभर लोकसंख्येच्या देशांशीही केली जाते, कारण त्यातून मोदींना लक्ष्य करता येते.नरेंद्र मोदी उजव्या विचारांचे असल्याने ते व ती विचारधारा कशी संहारक आहे, असे चित्र त्यांना रंगवता येते. त्यात सरणाची छायाचित्रे विकणारी व विकत घेणारी पाश्चिमात्य माध्यमे आहेत, तसाच आपल्याकडच्या सुशिक्षित; पण प्रत्यक्षातल्या गावंढळांचाही भरणा आहे. दोन्ही एकास एक विचारांचे की, कुविचारांचे नग असल्याने त्यांना पद्धतशीरपणे मृतदेहांचा, जळत्या चितांचा, मृताच्या नातेवाइकांच्या रडारडीचा-छायाचित्रांचा सौदा करता येतो. भारतात किती आणीबाणीची, आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे आणि या सगळ्याला नरेंद्र मोदी कसे जबाबदार आहेत, हे दाखवता येते. अनेकानेक शवांच्या दाहसंस्काराच्या छायाचित्रांतून सनसनाटी निर्माण करता येते आणि त्यातून भारत व भारतीय नेतृत्वाची बदनामीचा हेतू साधता येतो. भारतीयांच्या मृतदेहावर टपलेल्या या छायाचित्रकारांना, प्रसारमाध्यमांना गिधाडाव्यतिरिक्त दुसरे कोणते विशेषण लावता येत नाही. कारण, त्यांना जगातील अन्य देशांतील परिस्थिती व भारतातील परिस्थिती यातला फरक करता येत नाही, उलट त्यांचे सगळे लक्ष आपली खोटीनाटी, संधिसाधू बातमीदारी चालली पाहिजे, यावरच असते. नारायण दाभाडकर यांच्या त्यागाची निंदानालस्ती करण्यातून त्याचे एक रूप आपल्याला पाहायला मिळाले, तर आणखी अनेक रूपे जळत्या सरणांच्या विक्रीला ठेवलेल्या छायाचित्रांतून दिसतात.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.