१८ ते ४४ वयोगटाचे प्राथमिक स्तरावर लसीकरण होण्याची शक्यता

30 Apr 2021 16:37:37

rajesh tope_1  


मुंबई :
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण १ मेपासून करण्यात येणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २ दिवसांपूर्वी जाहीर केले होते. केंद्राकडून अपुरा लस पुरवठा होत असल्याने हे लसीकरण होऊ शकत नसल्याचे कारण यावेळी टोपे यांनी दिले.मात्र आता महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर निवडक लसीकरण केंद्रांवर प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातले सूतोवाच केले आहे. राज्यात महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे पासून प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. ते म्हणाले, "१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं. सुरुवातीला जिल्ह्यात एखादं केंद्र असू शकेल. त्यामुळे ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जावं. लस अतिशय नाममात्र स्वरूपात आहे", असे राजेश टोपेंनी नमूद केले.
Powered By Sangraha 9.0