बिनधास्त, बेधडक ‘आऊ’...

03 Apr 2021 21:32:37

usha nadkarni _1 &nb


सिनेसृष्टीत आपल्या फटकळ आणि भांडखोर भूमिकांसाठी ओळखल्या जाणार्‍या अभिनेत्री म्हणजेच उषा नाडकर्णी...



मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीत आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाद्वारे या अभिनेत्रीने प्रेक्षकांचे हृदय जिंकले. एकता कपूरच्या प्रसिद्ध ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे या अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील ‘सविता देशमुख’ या पात्राद्वारे त्या घराघरात पोहोचल्या. बिनधास्त, मोकळ्या मनाची आणि स्पष्ट बोलणारी अभिनेत्री अशी त्यांची खरी ओळख. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतून कलाकारांची कधी आई, तर कधी सासू बनून त्यांनी भूमिका बजावल्या. तुसडी, विक्षिप्त, कजाग, कारस्थानी, कपटी, खुनशी, फटकळ, भांडकुदळ, कुचकी, खवचट, खाष्ट, खडूस अशी कितीतरी विशेषणे पडद्यावर तोर्‍यात मिरवणार्‍या अणि मराठीसकट हिंदीतल्या ‘व्हिलन्सची बाप’ ठरलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजेच उषा नाडकर्णी...


उषा नाडकर्णी यांचा जन्म कर्नाटक येथे १३ सप्टेंबर, १९४६ रोजी झाला. परंतु, आई-वडील मूळचे मुंबईचे असल्यामुळे त्यांचं संपूर्ण शिक्षण मुंबईमध्येच झालं. त्यांच्या वडिलांचे नाव सदानंद नाडकर्णी, तर त्यांची आई एक मराठी शिक्षिका होती. त्यांनी आनंद नाडकर्णी यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना ‘आयुष’ नावाचा एक मुलगा आहे. ४० वर्षं चित्रपटसृष्टीत काम करून त्यांनी रसिकप्रेक्षकांची दाद मिळवली. त्यांना अभिनयाची आवड लहानपणापासून होती. गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन त्यांना अभिनय करण्याची प्रेरणा मिळाली. अभिनयक्षेत्रात आपण काहीतरी योगदान द्यावं, असं त्यांना वाटू लागलं. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा त्या अभिनयापासून थोड्या दुरावल्या, कारण त्यांना मुलांची भयंकर भीती वाटत होती. पण, उषाताईंच्या बोलण्याचा परिणाम असा झाला की, नंतर मुले त्यांना घाबरायची. हौशी रंगमंचापासून स्पर्धांमध्ये नंतर व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचं आगमन झालं आणि त्यांचं पहिलंच नाटक राज्य नाटक स्पर्धेत तुफान गाजलं. त्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. ‘बिरला क्रीडा’मध्ये अनेक नाटकांच्या तालमी रंगायच्या, त्यावेळेस अनेक कलावंतांकडून त्यांना अभिनयाचे धडे शिकायला मिळाले.
उषा नाडकर्णी यांनी जेव्हा आपलं करिअर याच क्षेत्रात करायचे ठरवले, तेव्हा त्यांच्या आईने या गोष्टीला विरोध केला. हे क्षेत्र मुलींसाठी बरोबर नाही, असा त्यांचा समज होता. परंतु, घाबरून न जाता उषाताईंनी एका नाटकामुळे त्यांच्या आई-वडिलांचा विश्वास संपादित केला. त्या नाटकाचे वर्षभरात बरेच प्रयोग झाले आणि त्या एका नाटकाच्या भूमिकेने त्यांना वर्षभरात सात पारितोषिक मिळाली. नंतर त्यांची खर्‍या अर्थाने अभिनयाची वाटचाल सुरू झाली. अनेक बड्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. रमेश पवारलिखित ‘गुरू’ या नाटकातील त्यांची भूमिका बरीच गाजली. १९७९साली डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’ हा पहिला चित्रपट त्यांच्या वाट्याला आला. यात शांताबाईंची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी साकारली आणि त्यांच्यासोबत होते अभिनेते निळू फुले. ‘पूर्ण सत्य’, ‘प्रतिभा’, ‘धुमाकूळ’ हे गाजलेले चित्रपट त्यांच्या वाट्याला आले. ‘पुरुष’ या नाटकातून त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी मिळाली. नाना पाटेकरांसोबत छोटी; पण महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली. याव्यतिरिक्त ‘महासागर’, ‘आमच्या या घरात’ यांसारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी अभिनय केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. ‘सतरंज’ या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, ‘गुंडाराज’ या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटात उषा यांनी पार्वती चौहान ही भूमिका साकारली होती. या सिनेमातील त्यांच्या पात्राचे विशेष कौतुक करण्यात आले होते.
मराठीमध्ये उषा यांनी ‘धुमाकूळ’, ‘माहेरची साडी’, ‘पक पक पकाक’, ‘आई मला माफ कर’, ‘सखी’, ‘अगडबम’, ‘देऊळ’, ‘यल्लो’, ‘वक्रतुंड महाकाय’, ‘स्लॅमबुक’, ‘व्हेंटिलेटर’ अशा चित्रपटात काम केले, तर ‘वास्तव’, ‘ये तेरा घर, ये मेरा घर’, ‘क्रिष्णा कॉटेज’, ‘वन टू थ्री’, ‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘रुस्तम’, ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’, ‘जाने क्यू दे यारों’ अशा हिंदी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. उषा यांच्या छोट्या पडद्यावरील प्रवासाबाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी ‘रिश्ते’, ‘थोडी सी जमीन, थोडा सा आसमान’, ‘विरुद्ध’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कुछ इस तरह’, ‘कैरी’, ‘मधुबाला - एक इश्क एक जुनुन’, ‘मिसेस पम्मी प्यारेलाल’, ‘भ से भडे’, ‘रिश्तों का मेला’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘मोलकरीण बाई - मोठी तिची सावली’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. २०१८मध्ये ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्ये तर ‘खतरा खतरा’ या रिएलटी शोमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. ‘मराठी बिग बॉस’ या शोमधील त्यांचा वावर स्वभावाप्रमाणे दिसून आला. यावेळी त्यांची सहकलाकरांसोबत भांडणेदेखील व्हायची. पण, ‘टीआरपी’च्या गणितात हेच सूत्र जमून यायचे. या शोमध्ये उषाताई खर्‍या अर्थाने पुन्हा नव्याने कळल्या. आतापर्यंतच्या सर्वच भाषेतील ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वात ज्येष्ठ स्पर्धकाचा मान उषा नाडकर्णी यांना मिळाला. ‘बिग बॉस’च्या घरातील हा एक विक्रमच आहे.
१९९०च्या दशकातला ‘माहेरची साडी’ हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला. या सिनेमामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांना आई आणि सासू या भूमिकांसाठी बर्‍याच भूमिका मिळाल्या. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता ‘गुंडाराज.’ त्यानंतर अनेक हिंदी चित्रपट त्यांच्या वाट्याला चालून आले. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’ या चित्रपटातील भूमिका उषाताईंनी साकारली. कोणतीही भूमिका करताना जीव ओतून काम करायचं हे त्यांचं नेहमीचं तत्त्व. त्यामुळे त्यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच लक्षात राहतात. नंतर त्यांनी छोट्या पडद्यावरही आगमन केलं. दूरदर्शनवरील ‘ज्ञानदीप’ ही त्यांची पहिली मालिका नंतर ‘आडोस पडोस’ या हिंदी मालिकेमुळे त्यांनी हिंदीच्या छोट्या पडद्यावरही छाप पाडली. त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘नशीबवान.’ त्यातील त्यांची मोलकरणीची भूमिका सर्वांना इतकी आवडली की, त्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘विशेष अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला.

नकारात्मक भूमिकेसाठी विशेष म्हणजे ‘खाष्ट सासू’ म्हणून उषा प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘माहेरची साडी’ या चित्रपटातील त्यांची सासूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी अशाच प्रकारच्या भूमिका साकारल्या. सोबतच ‘सिंहासन’, ‘गुंडाराज’, ‘वास्तव’, ‘ये तेरा घर ये मेरा घर, ‘क्रिष्णा कॉटेज’, ‘वन टू थ्री’, ‘अगडबंब आणि ‘येल्लो’ या चित्रपटांत त्यांनी काम केलं. ‘गुरू’, ‘महासागर’, ‘पुरुष’, ‘आम्ही बिघडलो’, ‘पाहुणा’ आणि ‘आमच्या या घरात’ या नाटकांतही त्यांनी अभिनय केला आहे. हिंदी मालिका ‘पवित्र रिश्ता’मधील उषा यांची सविता देशमुख ही भूमिकाही खूप गाजली. या भूमिकेसाठी त्यांना टीव्हीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उषा नाडकर्णी यांना मराठी आणि हिंदी या सिनेसृष्टीत त्यांच्या जवळच्या व्यक्ती प्रेमाने ‘आऊ’ म्हणतात. या ‘आऊ’ नावातली गंमत उषाताई यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितली. ‘नशीबवान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उषा नाडकर्णी यांचा मुलगा त्यांच्यासोबत होता. तो त्यांना ‘आऊ’ ‘आऊ’ अशी हाक मारत असे.
त्यामुळे संपूर्ण टीम, सेटवरील सगळी मंडळी उषा नाडकर्णी यांना ‘आऊ.. आऊ..’ अशी हाक मारू लागले. मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये हिंदी कलाकारांसारखीच वागणूक दिली जाते. मात्र, भेदभाव केला जातो तो मानधन देताना. मराठी कलाकारांना हिंदी कलाकारांच्या तुलनेत अतिशय कमी मानधन दिले जात असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी पूर्वी व्यक्त केली होती. “अभिनेता सुशांतसिंह राजपूतचं जे घडलं ते अनपेक्षित होतं. ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेत त्यांनी सोबत काम केलंय. तो असं करील असं कधीचं वाटलं नव्हतं. त्याची प्रगती होत असल्याची माहिती मिळत होती. मात्र, सुशांतचे असे अचानक झाल्याने धक्का बसला,” असे त्या सांगतात. त्यावेळी त्या हताश झाल्या होत्या. एका मुलाला सिनेमासृष्टीत कुणाचेही बॅकिंग नसताना स्वतःचे करिअर उभे करताना अगदी जवळून पाहिले होते, त्याची स्वप्नदेखील त्यांनी ऐकली होती आणि आता ती स्वप्न पूर्ण होत असताना त्याने हे काय केले? म्हणून त्यांना त्रास झाला. ‘अगडबम’, ‘देऊळ’, ‘येल्लो’, ‘वक्रतुंड’, ‘महाकाय’, ‘पक पक पकाक’ या चित्रपटातील उषाताईंच्या भूमिका आजही लक्षात राहतात. या वयातदेखील त्यांना अनेक सिनेमांमध्ये संधी मिळाली. ‘भूतनाथ रिटर्न’, ‘आर राजकुमार’, ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’, ‘रुस्तम’ या चित्रपटांतही उषाताई झळकल्या. त्यांनी अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. ४० वर्षं आपल्या भूमिका जीवंत ठेवणार्‍या या सहजसुंदर बिनधास्त व्यक्तिमत्त्व असलेल्या उषाताईंना म्हणजेच लाडक्या ‘आऊ’ यांना त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आभाळभर शुभेच्छा.
Powered By Sangraha 9.0