पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती! - शिक्षण मंत्री

03 Apr 2021 16:21:35

varsha gayakawad _1 


इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेणार


मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी सगळेच हतबल झाले होते. अनेक शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थी यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पहिली ते आठवी यांच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी मागणी केली होती. त्यावरूनच आता गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे अर्थात सरसकट पास करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे.
 
 
 
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "कोविड- १९ महामारीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिक्षा (DIKSHA) आधारित “शाळा बंद…पण शिक्षण आहे” अशा स्वरूपात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना रोज एका विषयाचा घटक देऊन शिक्षण सुरू रहावे म्हणून प्रयत्न सुरू होते. तसेच इयत्ता निहाय यु टयुब चॅनल, जिओ टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले होते. तसेच राज्यातील शिक्षकही या परिस्थितीत ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात विविध उपक्रमाव्दारे शिक्षण सुरू ठेवत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन स्वरूपाचे सुरू ठेवण्यात आले होते व याला राज्यातील शिक्षकांनी उत्तम स्वरूपात प्रतिसाद दिला."
 
 
 
तसेच पुढे गायकवाड म्हणाल्या की, या स्थितीत शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधील कोविड १९ ची अपवादात्मक परिस्थिती पाहता इ. १ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तिच्या शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.इ. १ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्याना वर्गोन्नती देत असताना विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अर्थात SCERT, पुणे मार्फत निर्गमित करण्यात येतील. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल असेही गायकवाड म्हणाल्या.
 

 
Powered By Sangraha 9.0