मुंबई : मुंबई प्रीमिअर लीग टी- २० क्रिकेट मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एमपीएलचे तिसरा पर्व पुढे ढकलल्याची माहिती मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी दिली. नार्वेकरांची चेअरमनपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंत्रणांवर असलेला ताण लक्षात घेता मालिकेचे तिसरे पर्व तूर्त न आयोजित करण्याचा निर्णय मिलिंद नार्वेकर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष विजय पाटील यांनी संयुक्तपणे घेतला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवरुन यांसंबंधी माहिती दिली. प्रत्येकाची सुरक्षितता लक्षात घेत पुढील आदेशापर्यंत मुंबई प्रीमिअर लीग टी २० मालिका भरवणार नसल्याचे पत्रक जारी करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी क्रिकेटच्या क्षेत्रातही आपली इनिंग सुरु केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रे नार्वेकरांनी डिसेंबर २०२० मध्ये हाती घेतली होती. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी मिलिंद नार्वेकर यांच्याकडे होती.