राष्ट्र नावाच्या चेतनेची व्यक्तिरूप अभिव्यक्ती म्हणजे श्रीराम : विवेक घळसासी

28 Apr 2021 16:01:04

Vivek _1  H x W


मुंबई : “वाल्मिकी रामायणातील राम हा मानव आहे. दशरथनंदन आहे ही गोष्ट लक्षात ठेवून आपण रामाच्या जीवनाकडे बघितले पाहिजे. आपण एखाद्या महापुरुषाला देवत्व बहाल करतो आणि घराच्या, मंदिराच्या एका कोनाड्यात त्याला जागा देतो. राष्ट्र नावाच्या चेतनेची व्यक्तिरूप अभिव्यक्ती म्हणजे श्रीराम आहेत,” असे प्रतिपादन भारतीय संस्कृती आणि संत साहित्याचे भाष्यकार विवेक घळसासी बोलत होते.
 
 
‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’च्या वतीने श्रीरामोत्सवानिमित्त ‘श्रीराम जीवनदर्शन’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या ‘ऑनलाईन’ व्याख्यानात ‘विवेक घळसासी’ बोलत होते. घळसासी म्हणाले की, “आपण अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या जयंत्या, उत्सव, भंडारा सुरू करतो.
 
 
यातून त्या महापुरुषाच्या जीवनाचा उद्देश्य आपल्या विस्मरणात जातो. श्रीरामांच्या संपूर्ण जीवनाकडे बघितल्यावर असे लक्षात येते की, एखाद्या सामान्य मानवाप्रमाणेच त्यांनी सतत संघर्ष केला आहे. त्यांनी आपल्या अलौकिक कार्यातून या राष्ट्राचे चैतन्य जागविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता.”
 
 
पुढे बोलताना घळसासी म्हणाले की, “राष्ट्र नावाची चेतना ज्या व्यक्तिमत्त्वातून प्रकट झाली त्या चेतनेचे नाव राम आहे. राम आणि कृष्ण यांचे जीवनचरित्र मांडले की, चारही बाजूला कोल्हेकुई सुरू होते. भगवाकरण! भगवाकरण झाले! या अपप्रचाराने सामान्य माणूस भ्रमीत होतो. पण, भगवाकरण म्हणजे नेमके काय हेच कुणी समजून घेत नाही.
 
भगवाकरण म्हणजे त्याग, तपस्या, संयम, समर्पण आणि देशभक्ती या जीवनमूल्यांचे बीजारोपण आहे.” ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ‘ऑनलाईन’ व्याख्यानाला महाराष्ट्रातील असंख्य लोकांनी फेसबुक आणि युट्यूबद्वारे हजेरी लावली.



Powered By Sangraha 9.0