इस्त्रायलनंतर आता अमेरिकेमध्ये मास्क वापरणे बंधनकारक नाही !

    दिनांक  28-Apr-2021 12:58:29
|
mask _1  H x W:
वाॅशिंग्टन - अमेरिकेच्या आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने मंगळवारी मास्क वापरण्यासंबंधीच्या नियमांमध्ये शिथिलता आणली. कोरोना लसीकरणाचे डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना आता मास्क वापरण्याचे बंधन राहिलेले नाही. केवळ गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क घालणे आवश्यक असल्याचे आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने म्हटले आहे.
 
 
 
अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणाने वेग पकडला आहे. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमण नियंत्रणात येत असल्याने अमेरिकेच्या आरोग्य संस्थांनी नियमांमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे. चेहऱ्यावर लावण्यात येणाऱ्या मास्कबाबतच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. ज्या अमेरिकन नागरिकांना कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना घराबाहेर फिरताना मास्क घालणे बंधनकारक असणार नाही. एकट्याने चालणे, धावणे, हायकिंग, दुचाकी चालविताना आणि स्वतःच्या घरातील सदस्यांसह पार्टी करताना मास्क घालण्याची आवश्यकता असणार नाही. स्टेडियम, सी.डी.सी. सारख्या गर्दीच्या मैदानी जागांमध्ये मात्र मास्क लावणे गरजेचे असणार आहे.
 
 
 
इस्त्रायलनंतर अमेरिका हा मास्क वापरण्याची सक्ती दूर करणारा दुसरा देश ठरला आहे. गेल्या आठवड्यात इस्त्रायलने देशातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण पू्र्ण केल्यानंतर मास्क वापरण्याचे बंधन हटवले होते. जगातील बहुतेक देशांमध्ये आता लसीकरणाच्या पक्रियेने वेग पकडला आहे. नागरिकांचे लसीकरण पूर्ण करुन लाॅकडाऊन आणि मास्क वापरण्यासंबंधीचे नियम शिथिल करण्याकडे बहुतांश देशाचा कल आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.